नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते!
अजून नवीन लिखाण घेऊन तुमच्यासाठी हजर होतेय.
देवाने किडे, मुंग्या, पक्षी, प्राणी, फुले, फळे, मानव या सगळ्यांची निर्मिती केली. मानवाची निर्मिती जरा जास्तच मन लावून केली. स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुसक लिंगी अशी वर्गवारी झाली.
नपुसक लिंगीच्या वाट्याला खूपच अवहेलना आली.
Correct, हाच आजचा विषय.
हिजडा, छक्का, two in one, अर्धनारी नटेश्वर… सतत काहीबाही बोलून त्यांना त्रासच दिला गेला. आज उलगडूया त्यांची कहाणी!
एकेदिवशी कॉल आला. ताई एक फिल्म करतोय. कदाचित शॉर्टफिल्म म्हणा किंवा माहितीपट. तृतीयपंथीयांच्या आयुष्यावर आहे. त्यांच्या वस्तीमध्येच शूट करायचंय. फिल्म कराल का? थोडीशी चलबिचल झाली. तृतीयपंथीयांच्या वस्तीत जाऊन शूट करायचं? भीती सुद्धा वाटली. पण विषय, कथा छान होती. शिवाय, पैसेही मिळणार होते. मी ‘हो’ म्हणाले.
विरार पूर्वेला रेल पटरी नावाचा एरिया आहे. तिथे रिक्षाने गेले. दुर्गा बार, हातभट्टीच्या दारूचं दुकान आणि लोकल नॉन-व्हेजेटरियन हॉटेल होते. त्याच्या बाजूने आतमध्ये एक रस्ता जातो. त्या रस्त्याने चालत निघाले. सुरुवातीला दोन-चार पॉश बंगले लागले. चालत पुढे निघाले तशा चाळी दिसायला लागल्या. त्यात काही छोट्या-मोठ्या फॅक्टरी होत्या आणि पुढे वस्तीमध्ये जाण्यासाठी पायवाट होती. फार अस्वच्छ नव्हतं, पण तशी झोपडपट्टीच. वस्ती आली. शूटिंगचं सामान लाइट्स, कॅमेरा… सगळं नेहमीचं वातावरण…
वस्ती म्हटली तरी, ती घरं मात्र छान स्वच्छ, नीटनेटकी, टीव्ही, फ्रीज, एसी… असंच एक प्रशस्त एक मजली घर होतं. बाहेर छान आंगण. जिथे आम्ही शूट करणार होतो. तिथे एक गोरीपान, देखणी वयस्कर स्त्री बसली होती. काळा पेटीकोट आणि काळी कुर्ती परिधान केलेली. लसूण सोलत होती. तोंडात पान होतं. प्रसन्न चेहरा, पण काहीतरी वेगळं वाटलं. त्यांच्या घऱी शूट करायचं म्हणजे आता त्यांच्याशी थोडा संवाद साधायला हवा.
‘नमस्कार,’ म्हटलं आणि त्या ‘ये बाळ बस’ म्हणाल्या. तेव्हा मला कळलं की, ही स्त्री नाही, तर किन्नर आहे. थोडीशी घाबरले. कारणही तसंच आहे. लहानपणीच्या ऐकीव घटना, गोष्टी… की, ती माणसं वाईटच असतात. मुले पळवतात, त्यांच्यासारखं बनवतात. भिकारी बनवतात. पण इथं तर ती 90 वर्षांची सायरा अम्मा ही त्या वस्तीची मालकीण आणि तिथे राहणाऱ्या तृतीयपंथीयांची ‘गुरुमाय’… मला ‘ये बाळ बस,’ असं म्हणत होती. स्वच्छ काचेच्या ग्लासात पाणी मागवून दिलं. माझी चौकशी केली. मला त्या थोडक्या काळात लक्षात आले की, नाही यार, तीसुद्धा हाडामांसाची माणसे आहेत. वाईट माणसे नाहीत. उलट आपल्यापेक्षा थोडी जास्त प्रेमळ, संवेदनशील, प्रेमाच्या दोन शब्दांसाठी आसुसलेली माणसंच आहेत.
शूट सुरू झालं. आम्हाला त्यांचा काहीही त्रास नव्हता. सगळं छान सुरू होतं. लंच ब्रेक झाला. जेवणाचं ताट माझ्यासमोर आलं. पहिला घास खाल्ला आणि डोळ्यात पाणी आलं. आई गंSS किती तीखट होतं. सायरा अम्माने बघितलं. पटकन उठून माझ्यापाशी आली. माझ्या हातातलं ताट काढून घेतलं. मला थांब म्हणून किचनमध्ये गेली. 10 मिनिटांनी बाहेर आली. येताना हातात स्वत: बनवलेली ताकाची कढी होती. उत्तम चविष्ट. मी पोटभर कढीभात जेवले. युनिटमधले एकजण बोलले सुद्धा, ‘ताई, नशिबवान आहात. तृतीयपंथीयाने शिजवलेलं अन्न सगळ्यांना मिळत नाही.’
पुढले दोन-तीन दिवस मी अम्माच्या हातचं जेवत होते. तीन-चार दिवसांत मी सायरा अम्माची मुलगी झाली होते आणि तिथे राहणाऱ्या तरुण तृतीयपंथीयांची मम्मी! काय तो आदर, किती ते प्रेम! सर्वसाधारण माणसांसारखं नव्हतंच ते. त्यांच्यात मत्सर हा प्रकार नव्हताच. त्यांचे रुटिन ऐकले तर आश्चर्यच वाटेल. पहाटे पाच वाजता उठून, चहा, अंघोळ आणि देवपूजा करून घराबाहेर पडायचं, मांगतीसाठी. शुभकार्य जिथे असतील तिथे जाऊन गाणी म्हणायची. नाच करायचा. पैसे घ्यायचे आणि खूप सारे आशीर्वाद देऊन दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत घरी परत यायचं. आल्यावर अंघोळ करून स्वयंपाक बनवायचा, जेवून मग झोपणे, टीव्ही पाहाणे, गप्पा-टप्पा, आराम… एकदा दुपारी घरी आले की, परत घराबाहेर जायचं नाही. थेट दुसऱ्या दिवशी. शिस्तप्रिय युनिट होतं.
आजही त्यातल्या काहीजणी रस्त्यात भेटतात. पण ओळख दाखवू की नको, असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर असतात. कारण, माझ्या आजूबाजूच्या लोकांनी माझी खिल्ली उडवू नये म्हणून! मी मात्र कसलीही भिडभाड न ठेवता रस्त्यात उभी राहून त्यांशी प्रेमाने गप्पा मारते. कारण, तेवढे प्रेम आणि आदर मला त्यांच्याकडून मिळतो. त्यांनाही तो मिळणं हा त्यांचा हक्क आहे.
अम्माचे मला नियमितपणे कॉल यायचे. माझी चौकशी करण्यासाठी… किती ते प्रेम! मी जमेल तशी वस्तीत जायची. माहेरवाशिणीला तिची आई वानोळा देते ना तशी अम्मा मला पिशव्या भरून कांदे, बटाटे, भाज्या, ड्राय फिश अगदी भरभरून द्यायची. प्रेमही तेवढंच.
सायरा अम्माचं जेवण म्हणजे सकाळ-संध्याकाळ एकच मेन्यू… दोन रोटी, एक प्लेट सुकं मटण आणि एक क्वार्टर. त्यात कधी बदल झाला नाही.
तेव्हा माझी एक सीरियल कलर्स वाहिनीवर सुरू होती – ‘लागी तुझसे लगन’. खूप लोकप्रिय सीरियल. दत्ता भाऊंची सीरियल म्हणायचे. मी त्यात एक छान ट्रॅक केला. अम्मा आणि तिच्या पोरी रोज न चुकता माझी सीरियल बघायच्या. एका एपिसोडमध्ये मी आजारी पडते आणि मला एम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये नेतात, असा सीन झाला. अम्माने तो एपिसोड पाहिला आणि फक्त हंगामा केला.
‘आत्ताच्या आत्ता ड्रायव्हरला बोलवा. चला सगळ्यांनी हॉस्पिटलमध्ये. माझी हर्षा एडमिट आहे…’ काही मुलींनी तिला समजवायचा प्रयत्न केला की, ‘अम्मा वह नाटक हैं. मम्मी को कुछ नहीं हुआ.’ पण कोणाचं काहीही ऐकून घेण्याची तिची मन:स्थिती नव्हती. त्या रात्री ना ती क्वार्टर प्यायली, ना जेवली आणि ना कोणाला जेवू दिलं. सगळे उपाशी झोपले.
भल्या पहाटे मला कॉल आला. ती माझ्याशी बोलली. मी ठणठणीत आहे, घरीच आहे, हे ऐकून तिचा जीव भांड्यात पडला. तिने सगळ्यांना चहा बनवून दिला. हे असे निष्पाप अन् निर्व्याज प्रेम मिळायला भाग्य लागते!
पण एकेदिवशी मला अनोळखी नंबरवरून फोन आला. अम्मा कोमात आहे, हॉस्पिटलमध्ये येऊन भेटून जा. तिला जरी काही कळणार नसलं तरी, मला तर कळणारच होतं ना! मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. साधारणपणे 94-95 वर्षांची अम्मा आधीच पुढल्या प्रवासाला निघून गेली होती. कसलीही संवेदना नसलेलं तिचं शरीर मात्र सुटकेची धडपड करत जिवंत होतं.
वय वर्ष 7-8चा अकोल्यातल्या पाटलाचा गोरा गोंडस मुलगा, स्कर्ट घालून, लिपस्टीक लावून गावातल्या पारावर तमाम गावकऱ्यांसमोर गिरक्या घेऊन नाचत होता. वडिलांना कळलं मात्र, सगळ्या गावासमोर त्या लेकराला लाथाबुक्क्यांनी खूप मारलं. पोरगं बेशुद्ध पडलं. बाप निघून गेला. सगळे लोक आपापल्या घरी परतले. त्या लेकराला शुद्ध आली आणि त्याने मुंबईचा रस्ता धरला. कसा जगला, वाढला आणि सायरा अम्मा म्हणून नाव झालं.
एक कॉल आला मम्मी सायरा अम्मा गेली. पायाखालची जमीन सरकणे म्हणजे काय? आभाळ कोसळणे म्हणजे काय? आयुष्यात पोकळी निर्माण होणे म्हणजे काय? हे एका क्षणात कळलं. ‘मी निघते,’ असे म्हणाले, पण समोरून सांगितलं की, ‘नको येऊस. दोन दिवसांपूर्वीच गेली. दफन भी कर दिया…’
मी पुन्हा कधीच वस्तीत गेले नाही. अम्माशिवायचं ते माझं माहेर आता उजाड झालंय. तिथून वाहणारा प्रेमाचा, मायेचा झरा आता कायम स्वरुपी आटलाय…
(क्रमश:)