संगीता भिडे (कमल महाबळ)
साधारण 1958-59ची घटना आहे. माझं वय तेव्हा 9-10 वर्षांचं. आमचं वास्तव्य भुसावळ येथे एका चाळीत. चाळीत कोणालाच घराची दारं बंद ठेवायची सवय नव्हती. चाळीत अठरापगड जाती… पण नाती अशी की जणू एकाच कुटुंबातली माणसं आहेत.
तो दिवस बैल पोळ्याचा होता. हा सण खान्देशात फारच थाटामाटात साजरा केला जातो. बैलांनाही शेतकरी खूप सजवतात, त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. दुपारी बारा-साडेबाराची वेळ होती. आई गरम गरम पुरणपोळ्या आम्हाला (माझे वडील, मी आणि माझे दोघे धाकटे भाऊ) वाढत होती. आम्ही आस्वाद घेऊन पोळ्यांवर ताव मारत होतो. तेवढ्यात दाराशी एक कर्कश्श पण केविलवाणा आवाज आला.
‘ओ माय, ओ ताई, आज सणाचा दिस, काई शिळंपाकं असलं तर वाढव माय! दोन दिसापास्नं लेकरू उपाशी हाय बघ.’ तात्यांनी एका ताटलीत गरम पुरणपोळी घेतली आणि मला ती भिकारणीला वाढायला सांगितली. पितृआज्ञा होती… निमूटपणे घेऊन गेले, पण डोक्यात मात्र विचारांचा गुंता… ‘भिकारणीला काय गरम पोळी, तीही पुरणाची? असं कोणी देते का?’ तिच्या फुटक्या थाळीत पुरण पोळी दिली. वास तिच्या नाकात गेला असावा… हाताने चाचपली… गरम लागली आणि तिच्या अंध डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. ‘माय, येवडं गरम कोनी बी देत नाही आमास्नी… तुजं लई भलं होईल बग, माजं मोटं लेकरू घरला उपाशी हाय बग, देशील येक पोली अजून?’
हेही वाचा – संस्कार आणि स्त्रिया
एव्हाना मी पूर्ण विरघळले होते. निमूटपणे आणखी एका पोळी आणून दिली. तिच्याकडे बघून माझेच डोळे भरून आले. जेमतेम लाज राखली जाईल, अशी लक्तरं झालेली साडी देहाभोवती गुंडाळलेली, वर अनेक ठिगळ लावलेलं पोलकं. कडेवर एक कळाहीन लेकरूं. अनेक दिवसांत देहाला पाण्याचा स्पर्शही झाला नसावा, असा कळकट देह…
तिनं पुन्हा एकदा पोटभर आशीर्वाद दिला, ‘ताई, तुजं समदं भलं होईल बघ. देव तुजं भलं करो?’ असं म्हणून कुठेही भीक न मागता निघून गेली. (ती तृप्त झाली होती का?)
हेही वाचा – ऋतुरंग
संस्कृतीचा खरा अर्थ मला त्या दिवशी समजला. तात्यांनी अन् आईनेही (तिने पोळी देण्यास अजिबात नकार दिला नाही) आपल्या कृतीतून आमच्यापर्यंत तो पोहोचवला. इतकंच नाही तर, आजी-आजोबांच्या अशा अनेक आठवणी त्यांनी आम्हाला सांगितल्या. घराजवळच समाजातील उपेक्षित जनाबाईची पोरं आजारी असली की, त्यांना गरम ताजा गुरगुट्या भात दिला जायचा, ही त्यातलीच एक आठवण.
छोटासाच प्रसंग पण आम्हाला जीवनभराचा संदेश देऊन गेला. ‘माणुसकीचा झरा कधी आटू देऊ नये. कोणाचीही कधीही अवहेलना वा हेटाळणी करू नये.’