भाग – 2
आभाला जाऊन वर्ष होत आलं होतं. “आई परत कधी येणार?” हा प्रश्न इराने विचारणं बंद केलं. काय विचार असतील त्या इवल्याश्या मनात? का पोरकी झालेली मुलं अकाली शहाणी होतात? आई दुसरं लग्न कर म्हणून मागे लागली होती. मी आभाला विसरणं शक्य नव्हतं… पण इराला आता आईची गरज आहे, असं वाटायला लागलं.
नेत्राची आणि माझी ओळख होऊन देखील वर्ष झालं. रोजची लोकलमधली भेट, तिचं साधं व्यक्तिमत्त्व, तिचे संस्कार मला तिच्याकडे आकर्षित करायला लागले. इराला नेत्रासारखी आई हवी, असं मनात यायला लागलं. पण हा माझा स्वार्थी विचार होता. मला नेत्रा लाइफ पार्टनर म्हणून का निवडेल? एक विधुर, एका मुलीचा बाप असलेला मी!
मनातले विचार बाजूला सारले.
अचानक एक दिवस नेत्राचा फोन आला. “मल्हार, मी लग्न करतेय. पत्रिका तुला व्हॉट्सॲपवर पाठवते. तुला यायचं आहे.”
“ओह ग्रेट! मुलगा कुठला?” मी विचारलं.
“लोणावळ्यात आमची भेट झाली. अमर काळे नाव आहे. काकांच्या क्लिनिकमध्ये ट्रीटमेंटसाठी तो येत होता. खोपोलीत त्यांचं घर आहे, पण अमर नागपूरला जॉब करतो. आमचे विचार जुळले, आवडीनिवडी जुळल्या आणि लग्नाचा निर्णय घेतला. माझ्यापेक्षा वयाने जरा मोठा आहे. आठ वर्षांचे अंतर आहे, पण प्रेम करताना वय कुठे येतं रे?” नेत्राच्या आवाजात आनंद, उत्सुकता सगळंच मला जाणवलं.
“खूप आनंदाची बातमी दिलीस. आय विश यु द बेस्ट!”
“थँक्स मल्हार! काकू आणि इराला पण घेऊन ये.”
नेत्राचं लग्न ठरलं याचा मला आनंद झालाच होता, पण कुठेतरी मनात एक सल राहिला.
नेत्राच्या लग्नाला, मी, आई आणि इरा तिघेही गेलो होतो. नेत्राची निवड छानच होती. मुलगा फारच हॅन्डसम होता. कुठल्याही मुलीने प्रेमात पडावं असाच! नेत्रा सुखी व्हावी, असं मला मनापासून वाटत होतं.
०००
पुणे-नागपूर प्लॅटफॉर्मवर गाडी लागली होती. गाडी सुटायला पाच मिनिटे अवकाश होता. मी धावतच बोगीत चढलो. सीट नंबर बघत जागेवर बसलो. इराला भेटायला नागपूरला निघालो होतो. बारावीत उत्तम गुण मिळवून इराने नागपूरच्या मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतली होती. लोणावळ्याची नोकरी सोडून मी ट्युशन्स सुरू केल्या होत्या. इराची आई आणि वडील दोन्ही होऊन तिचं संगोपन केलं. आईने दुसऱ्या लग्नासाठी खूप आग्रह केला, पण आभानंतर मनात भरली ती नेत्राच! मी बॅगेला चेन लावली आणि परत सीटवर बसणार इतक्यात एका स्त्रीचा मला धक्का लागला. मी वळून बघितलं आणि अवाक् झालो. ती नेत्रा होती.
“नेत्रा! व्हॉट अ प्लेझंट सरप्राइज!” मी ओरडलोच.
“मल्हार, किती दिवसांनी भेटतो आहेस. माझ्या लग्नानंतर दोन-तीनदा भेटलास तेवढंच!”
“अगं, तुम्हा राजा-राणीला कशाला डिस्टर्ब करायचं? म्हणून नाही भेटलो…” मी असं बोलल्यावर नेहा पाच मिनिटे शांत होती.
“इरा आणि काकू कशा आहेत?”
“दोघी मजेत. इराने बारावीनंतर नागपूरच्या मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतलाय. तिलाच भेटायला मी निघालोय. आई आता थकलीय. सध्या तिला माझ्या मावस बहिणीकडे सोडून आलोय. तू कशी आहेस?” मी तिला विचारलं.
“मी ठीक!” माझी नजर टाळत नेत्रा म्हणाली.
मी विषय वाढवला नाही. नेत्राची सीट पलीकडल्या कंपार्टमेंटमध्ये होती. आम्ही दोघांनी एकत्रच जेवण केलं. नागपूरला उतरल्यावर भेटल्याशिवाय जाऊ नको, असं नेत्राला सांगितलं. इराची आणि तिची भेट मला घडवायची होती.
हेही वाचा – या डोळ्यांची दोन पाखरे…
रात्री मला जाग आली. झोप येत नव्हती. मोबाइल बघत होतो आणि अचानक भयंकर आवाज होऊन मी खाली पडलो. माझा बर्थ खालचा होता. माझ्या अंगावर मधल्या बर्थ मधला माणूस पडला. बोगी विचित्र हलायला लागली. प्रवाशांचा भयंकर आरडाओरडा ऐकू यायला लागला आणि दहा मिनिटांतच बोगी रुळावरून घसरून आडवी झाली. माझ्या अंगावर दोघे-तिघे पडले होते. उठायचा प्रयत्न करत होते, पण घसरून पडत होते. भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. बायकांचे किंचाळणे, लहान मुलांचे रडणे, बाहेर पडण्यासाठी धडपड… सगळंच भयावह होतं. त्या परिस्थितीत मला अचानक नेत्राची आठवण आली पण मी काहीच करू शकत नव्हतो. पंधरा मिनिटांनी आम्हाला त्या बोगीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. मला उचलून स्ट्रेचरवर ठेवलं. डाव्या पायातून कळा येत होत्या. उजव्या हाताच्या मनगटाचे हाड तुटून तो लुळा पडला होता. काही लोकं तीव्र जखमी झाले होते. आम्हाला भुसावळला एक दवाखान्यात दाखल केलं. मोबाइल, सामान सगळंच उद्ध्वस्त झालं होतं. इराची काळजी वाटायला लागली. डोळ्यांतून घळाघळा पाणी यायला लागलं. पण माझं नशीब चांगलं, ज्या एजंटकडून मी तिकीट काढलं होतं, त्याला इराचा पण मोबाइल नंबर दिला होता. त्यामुळे इरा संध्याकाळीच भुसावळला पोहोचली. मला बघून तिला रडू फुटलं. माझा डावा पाय आणि उजवं मनगट फ्रॅक्चर होतं.
“बाबा, काय झालं रे हे?”
“इरा, बेटा मी जिवंत आहे, यासाठी देवाचे आभार मान. आज एक काम करशील? नेत्रामावशी माझ्याच बोगीत होती. जरा चौकशी करशील का तिची?” मी इराला काकुळतीने म्हणालो.
इरा सगळे वॉर्ड फिरून आली पण तिला नेत्रा दिसली नाही. माझ्या मनात धस्स झालं. दोन दिवस भुसावळच्या हॉस्पिटलमध्ये राहून आम्ही प्रायव्हेट गाडीने नागपूरला आलो. नेत्रा डोक्यातून जात नव्हती. पुण्याला तिच्या घरी फोन करावा का? मागे नेत्राने मला घरचा लँडलाइन नंबर दिला होता. मी तो नंबर फिरवला…
कोणीच उचलत नव्हतं.
दीड महिन्याने माझं प्लास्टर काढणार होते. इराने माझ्यासाठी एक तात्पुरता भाड्याचा एक फ्लॅट बघितला. नाईलाज होता. ती हॉस्टेलमधून माझ्या जवळ रहायला आली. पंधरा दिवसांनी मी परत नेत्राच्या मोबाइलवर फोन केला. फोन तिच्या वडिलांनी उचलला…
“काका, मल्हार बोलतोय. नेत्रा माझ्याच बोगीत होती. ती…”
“खिडकीच्या काचा फुटून त्याचे बारीक तुकडे नेहाच्या डोळ्यात गेले. प्रचंड रक्तस्राव झाला. दोन्ही पाय फ्रॅक्चर आहेत. नशीब, पोरगी वाचली. पण दृष्टीने अधू झाली. ऑपरेशन केलं तरी पूर्वीची दृष्टी येणार नाही.”
“ती नागपूरला आहे का पुण्यात?”
“नागपूर?”
“तिचे मिस्टर नागपुरात होते ना!”
“नेत्राचा लग्नानंतर दोनच वर्षांत घटस्फोट झाला. तिला अमरने फसवलं होतं. त्याचं लग्न झालेलं होतं आणि त्याला एक मुलगी पण होती…”
“मग आत्ता ती नागपूरला कशासाठी जात होती?”
“सेमिनार होतं तिचं! नागपूरच्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये!”
“ओह! काका, मी पुण्यात आलो की, घरी येऊन जाईन.”
नेत्राने मला हे काहीही सांगितलं नव्हतं. ती नागपूरला तिच्या घरी निघालीय हीच माझी समजूत होती, त्यामुळे मी देखील फारसे प्रश्न विचारले नाहीत. तिच्या आयुष्यात इतकी उलथापालथ झाली होती आणि मी अनभिज्ञ होतो.
हेही वाचा – पुरस्कार… एक नवा हुरूप देणारा!
दोन महिन्यांनी पुण्यात आल्यावर मी नेत्राला भेटायला गेलो. तिच्या डोळ्यावर अजूनही काळा चष्मा होता.
“नेत्रा, इतकं सगळं घडलं तरी बोलली नाहीस काही! आपली मैत्री तेवढी नक्कीच होती गं!”
नेत्रा काहीच बोलत नव्हती. चष्म्यातून तिच्या गालावर एक अश्रू ओघळला.
“मी जे बोलणार आहे ते किती योग्य आहे, आणि तुला ते आवडेल का? याबद्दल मी साशंक आहे. पण तरीही बोलतो. नेत्रा, तू इराची आई होऊन, माझी सहचारिणी म्हणून माझ्या आयुष्यात आलीस तर, मला खूप आनंद होईल. हे लग्नाचं वय नाही, पण मला एक मैत्रीण म्हणून तू कायमची हवी आहेस. विचार कर, आग्रह नाही.”
नेत्रा काहीच बोलली नाही.
“टेक युअर टाइम नेत्रा… आणि मनापासून निर्णय घे. जो घेशील तो मला मान्य आहे.”
जीवनाचा विरोधाभास तरी कसा! नेत्रा नावाच्या व्यक्तीचे डोळेच अधू झाले होते. पण मी तिला माझ्या डोळ्यांनी आयुष्याचा आनंद द्यायला तयार होतो. आता निर्णय नेत्राला घ्यायचा होता…!
समाप्त


