सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय नववा
जिहीं विभूतीं ययां समस्तां । लोकांतें व्यापूनि आहाती अनंता । तिया प्रधाना नामांकिता । प्रगटा करीं ॥186॥
कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन् । केष् केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ॥17॥
जी कैसें मियां तूंतें जाणावें । काय जाणोनि सदा चिंतावें । जरी तूंचि म्हणों आघवें । तरि चिंतनचि न घडे ॥187॥ म्हणोनि मागां भाव जैसे । आपुले सांगितले तुवां उद्देशें । आतां विस्तारोनि तैसे । एक वेळ बोलें ॥188॥ जयां जयां भावांचां ठायीं । तूंतें चिंतितां मज सायासु नाहीं । तो विवळ करूनि देईं । योगु आपुला ॥189॥
विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन । भूयः कथय तृप्तिर्हि श्रृण्वतो नास्ति मेऽमृतम् ॥18॥
आणि पुसलिया जिया विभूती । त्याही बोलाविया भूतपती । एथ म्हणसी जरी पुढती । काय सांगों ॥190॥ तरी हा भाव मना । झणें जाय हो जनार्दना । पैं प्राकृताही अमृतपाना । ना न म्हणवे जी ॥191॥ जें काळकूटाचें सहोदर । जें मृत्युभेणें प्याले अमर । तरि दिहाचे पुरंदर । चौदा जाती ॥192॥ ऐसा कवण एक क्षीराब्धीचा रसु । जया वायांचि अमृतपणाचा आभासु । तयाचाही मिठांशु । जे पुरे म्हणों नेदी ॥193॥ तया पाबळेयाही येतुलेवरी । गोडियेचि आथि थोरी । मग हें तंव अवधारीं । परमामृत साचें ॥194॥ जें मंदराचळु न ढाळितां । क्षीरसागरु न डहुळितां । अनादि स्वभावता । आइतें आहे ॥195॥ जें द्रव ना नव्हे बद्ध । जेथ नेणिजती रस गंध । जें भलतयांही सिद्ध । आठवलेंचि फावे ॥196॥
हेही वाचा – Dnyaneshwari : प्रभु आघवेनि येणें जन्में, जियें पुण्यें केलीं मियां उत्तमें…
अर्थ
कृष्णा, ज्या विभूतींनी सर्व लोकांस व्यापून टाकलेले आहे, त्या मुख्य मुख्य आणि नामांकित विभूती आपण सांगाव्या. ॥186॥
हे योगिन्, सर्वदा तुझे चिंतन करण्याची इच्छा करणारा जो मी, त्या मी तुला कसे जाणावे? हे भगवन्, कोणकोणत्या भावांमध्ये (विभूतींमध्ये) मी तुझे चिंतन करणे शक्य आहे? ॥17॥
कृष्णा मी तुला जाणावे कसे? आणि काय म्हणून नेहमी चिंतन करावे? कारण तूच सर्व आहेस, असे जर म्हटले तर, चिंतनच घडणार नाही. ॥187॥ म्हणून मागे (सातव्या आणि नवव्या अध्यायांत आणि या अध्यायाच्या आरंभी) ज्या आपल्या विभूती तू थोडक्यात सांगितल्यास, त्याच आता एक वेळ विस्ताराने सांग. ॥188॥ ज्या ज्या विभूतींच्या ठिकाणी तुझे स्मरण होण्याला मला अडचण पडणार नाही, तो आपला विभूतीयोग तू मला स्पष्ट करून दाखव. ॥189॥
जनार्दना, आपला योग आणि विभूती पुन्हा विस्ताराने मला कथन कर. कारण (एकदा ऐकूनही) तुझे हे अमृतमय भाषण ऐकण्याची माझी तृप्ती होत नाही. ॥18॥
आणि ज्या विभूती मी विचारल्या, त्यादेखील हे जगन्नाथा, मला सांगाव्यास. या प्रसंगी वारंवार काय सांगावयाचे आहे, असे जर म्हणशील, ॥190॥ तर कृष्णा, अशी कल्पना कदाचित तुझ्या मनात येईल, पण ती येऊ देऊ नकोस. अहो महाराज, सामान्य असलेले अमृतही प्यावयास लागले असता नको म्हणवत नाही. ॥191॥ जे (अमृत) कालकूट विषाचे सख्खे भावंड आहे आणि जे (अमृत) मृत्यूच्या भीतीने देव प्याले, तरीसुद्धा ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा इंद्र होऊन जातात. ॥192॥ असा कोणी एक क्षीरसमुद्रातील रस, ज्याला व्यर्थच अमृतपणाचा आळ आला आहे, त्याची गोडी देखील सेवन करणाऱ्याला आता “हे पुरे” असे म्हणू देत नाही. ॥193॥ इतक्या हलक्या दर्जाच्या असलेल्या अमृताला त्याच्या गोडीने जर एवढे महत्त्व आले आहे; मग पाहा, हे तर खरोखर परमामृत आहे. ॥194॥ परमामृत प्राकृत अमृताप्रमाणे मंदर नावाच्या पर्वताला न हलवता आणि क्षीरसमुद्राचे मंथन न करता स्वभावत:च मूळचे नित्यसिद्ध आहे. ॥195॥ जे परमामृत पातळ नाही आणि घट्टही नाही, ज्या परमामृतामध्ये रस (गोडी) आणि गंध (वास) ही आढळून येत नाहीत, जे परमामृत नित्यप्राप्त असल्यामुळे स्मरण केल्याबरोबर वाटेल त्याला मिळते (अनुभवाला येते). ॥196॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जरी थोरी तुझी पाहत आहों…


