सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय दहावा
सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव । न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः ॥14॥
ते आतां वाक्यसूर्यकर तुझे फाकले । आणि ऋषीं मार्ग होते जे कथिले । तयां आघवयांचेंचि फिटलें । अनोळखपण ॥163॥ जी ज्ञानाचें बीज तयांचे बोल । माझिये हृदयभूमिके पडिले सखोल । वरि इये कृपेची जाहाली वोल । म्हणोनि संवादफळेंशीं उठलें ॥164॥ अहो नारदादिकां संतां । त्यांचिया युक्तिरूप सरिता । मी महोदधि जालां अनंता । संवादसुखाचा ॥165॥ प्रभु आघवेनि येणें जन्में । जियें पुण्यें केलीं मियां उत्तमें । तयांचीं न ठकतीचि अंगीं कामें । सद्गुरु तुवां ॥166॥ एऱ्हवीं वडिलवडिलांचेनि मुखें । मी सदा तूंतें कानीं आइकें । परि कृपा न किजेचि तुवा एकें । तंव नेणवेचि कांहीं ॥167॥ म्हणोनि भाग्य जैं सानकूळ । जालिया केले उद्यम सदां सफळ । तैसें श्रुताधीत सकळ । गुरुकृपा साच ॥168॥ जी बनकरू झाडेंसी जीवेंसाटीं । पाडूनि जन्में काढी आटी । परि फळेंसी तैंचि भेटीं । जैं वसंतु पावे ॥169॥ अहो विषमा जैं वोहट पडे । तैं मधुर तें मधुर आवडे । पैं रसायनें तैं गोडे । जेव्हां आरोग्य देंहीं ॥170॥ कां इंद्रियें वाचा प्राण । यां जालियांचें तैंचि सार्थकपण । जैं चैतन्य येउनि आपण । संचरे माजीं ॥171॥ तैसें शब्दजात आलोडिलें । अथवा योगादिक जें अभ्यासिलें । तें तैंचि म्हणों ये आपुलें । जैं सानकूळ गुरु ॥172॥ ऐसिये जालिये प्रतीतीचेनि माजें । अर्जुन निश्चयाचीं नाचतुसें भोजें । तेवींचि म्हणे देवा तुझें । वाक्य मज मानलें ॥173॥ तरि साचचि हें कैवल्यपती । मज त्रिशुद्धी आली प्रतीती । जे तूं देवदानवांचिये मती- । जोगा नव्हसी ॥174॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जी जन्मलेपण आपुलें, हें आजि मियां डोळां देखिलें…
अर्थ
हे केशवा, हे जे मला तू सांगतोस, ते सर्व मी सत्य समजतो. हे भगवान्, देव अथवा दानव (यापैकी कोणीही) तुझे स्वरूप जाणत नाहीत. ॥14॥
आता ती तुझी वाक्यरूपी सूर्याची किरणे माझ्या हृदयावर येऊन पडली आणि मग पूर्वी ऋषींनी जे उपाय सांगितले होते, त्या सर्वांचाच अपरिचितपणा नाहीसा झाला. ॥163॥ महाराज, त्यांचे वाक्यरूपी ज्ञानबीज माझ्या हृदयरूपी खोल जमिनीत पेरले गेले आणि त्यावर या आपल्या कृपेचा ओलावा झाला, म्हणून त्यास हे (तुम्हा-आम्हांमधील संवादरूपी) फल प्राप्त झाले. ॥164॥ अहो देवा, नारदादी संतांच्या युक्तिरूपी नद्यांना मी संवादरूपी सुखाचा समुद्र झालो. ॥165॥ महाराज, या जन्मासह पूर्वीच्या सर्व जन्मात मी जी उत्तम पुण्ये केली, त्यांच्याकडे माझी कामगिरी शिल्लक राहिली नाही. कारण त्यांनी (पुण्यांनी) तुझ्यासारखा योग्य सद्गुरू जोडून दिला. ॥166॥ एरवी मी वाडवडिलांच्या मुखाने तुझे वर्णन नेहमी कानाने ऐकत होतो, पण तुमची एकाची कृपा झाली नव्हती, तेथपर्यंत मला काहीच कळले नाही. ॥167॥ म्हणून ज्यावेळेला दैव अतिशय अनुकूल असते, त्या वेळेला हातात घेतलेले सर्व उद्योग नेहमी फलद्रूप होतात, त्याप्रमाणे गुरूंची कृपा झाली म्हणजे ऐकलेले आणि पढलेले सर्व ज्ञान आपले काम करते. ॥168॥ महाराज, माळी झाडांविषयी जिवापाड मेहनत करून जन्म काढतो, परंतु ज्यावेळेला वसंत ऋतू येतो, त्याच वेळेला फळांची भेट होते. ॥169॥ महाराज, ज्यावेळेला विषमज्वराला उतार पडतो, त्यावेळेला गोड असलेले पदार्थ गोड लागू लागतात आणि ज्यावेळेला देहात आरोग्य प्राप्त होते, त्याच वेळेला घेतलेले भस्मादिक औषध चांगले परिणामकारक आहे, असे ठरते. ॥170॥ अथवा चैतन्य (ज्या वेळेला जीव) आपण होऊन शरीरात स्वत: प्रवेश करते, त्याच वेळेला इंद्रिये, वाचा आणि प्राण ही सर्व असल्याचे सार्थक होते. ॥171॥ त्याप्रमाणे अध्ययन केलेली सर्व शास्त्रे किंवा अभ्यास केलेली योगादिक साधने, ज्यावेळेला गुरू अनुकूल होतात, त्याच वेळेला आपली आहेत, असे म्हणता येते. ॥172॥ भगवंताचे खरे स्वरूप कळल्याच्या अशा अनुभवमदांत निश्चयाच्या संतोषाने नाचत असता अर्जुन म्हणाला, देवा, आपले बोलणे मला पटले. ॥173॥ हे मोक्षाच्या मालका श्रीकृष्णा, खरोखर मला निश्चयाने हा अनुभव आलेला आहे की, तू देव अथवा दैत्य यांच्या बुद्धींना आकळण्यासारखा नाहीस. ॥174॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : एऱ्हवीं नारदु अखंड जवळां ये, तोही ऐसेंचि वचनें गाये…


