सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय दहावा
तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् । ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥10॥
तयां मग जें आम्हीं कांहीं । द्यावें अर्जुना पाहीं । ते ठायींचीच तिहीं । घेतली सेल ॥130॥ कां जे ते जिया वाटा । निगाले गा सुभटा । ते सोय पाहोनि अव्हांटा । स्वर्गापवर्ग ॥131॥ म्हणोनि तिहीं जें प्रेम धरिलें । तेंचि आमुचें देणें उपाइलें । परि आम्हीं देयावें हेंहि केलें । तिहींची म्हणियें ॥132॥ आतां यावरी येतुलें घडे । जें तेंचि सुख आगळें वाढें । आणि काळाची दिठी न पडे । हें आम्हां करणें ॥133॥ लळेयाचिया बाळका किरीटी । गवसणी करूनि स्नेहाचिया दिठी । जैसी खेळतां पाठोपाठीं । माउली धांवे ॥134॥ तें जो जो खेळ दावी । तो तो पुढें सोनयाचा करूनि ठेवी । तैसी उपास्तीची पदवी । पोषित मी जायें ॥135॥ जिये पदवीचेनि पोषकें । ते मातें पावती यथासुखें । हे पाळती मज विशेखें । आवडे करूं ॥136॥ पैं गा भक्तासि माझें कोड । मज तयाचे अनन्यगतीची चाड । कां जे प्रेमळांचें सांकड । आमते घरीं ॥137॥ पाहें पां स्वर्ग मोक्ष उपायिले । दोन्ही मार्ग तयांचिये वाहणी केले । आम्हीं आंगही शेषा वेंचिलें । लक्ष्मीयेसीं ॥138॥ परि आपणपेंवीण जें एक । तें तैसेंचि सुख साजुक । सप्रेमळांलागीं देख । ठेविलें जतन ॥139॥ हा ठायवरी किरीटी । आम्ही प्रेमळु घेवों आपणपयासाठीं । या बोलीं बोलिजत गोष्टी । तैसिया नव्हती गा ॥140॥
हेही वाचा – Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न
अर्थ
याप्रमाणे (माझ्या ठिकाणी) सतत युक्त असलेल्या आणि प्रीतिपूर्वक (माझी) भक्ती करणार्या त्यांना, मी अशा प्रकारची बुद्धी देतो की, जिच्या योगाने ते माझ्या समीप येतील ॥10॥
अर्जुना, असे समज की, मग त्यांना आम्ही जे काही (निरतिशय प्रेम) द्यावयाचे, तो उत्तम भाग ते आपल्या ठिकाणी, आम्ही देण्याच्या अगोदरच कमावून बसलेले असतात. ॥130॥ कारण की अर्जुना, ते ज्या वाटेने निघाले, त्या मार्गाशी स्वर्ग आणि मोक्ष यांची तुलना केली असता, त्या आडवाटा वाटतात. ॥131॥ म्हणून त्यांनी जे प्रेम धरले, तेच आमचे देणे, त्यांनी आपल्या कमाईने मिळविले. (अशा रीतीने) आमचे काम त्यांनीच केले; पण ते आम्ही दिले, असे त्यांनीच (जगात) प्रसिद्ध केले ॥132॥ आता यानंतर इतके घडेल की, ते प्रेमसुख अधिक वाढावे आणि त्यावर काळाची दृष्टी पडू नये, हे आम्हाला करावे लागते. ॥133॥ अर्जुना, ज्याप्रमाणे आई ही आपल्या प्रेमाच्या दृष्टीचे पांघरूण करून आपल्या आवडत्या मुलाच्या मागे, ते मूल खेळत असताना धावते, ॥134॥ ते बालक जो जो खेळ दाखवील, तो तो खेळ ती आई त्याच्यापुढे सोन्याचा करून ठेवते. त्याचप्रमाणे माझ्या भक्तांच्या उपासनेचा अधिकार मी वाढवीत जातो. ॥135॥ उपासनेच्या ज्या स्थितीच्या पोषणाने ते भक्त मला अनायासाने प्राप्त होतील, अशा तर्हेने पालन करणे मला विशेष आवडते. ॥136॥ अरे, भक्ताला माझे कौतुक असते आणि त्याच्या एकनिष्ठेची मला इच्छा असते. कारण की, प्रेमळ भक्तांची आमच्या घरी कमतरता आहे. ॥137॥ अर्जुना पाहा, उपायांनी प्राप्त करून घेण्याचे स्वर्ग आणि मोक्ष हे दोन रस्ते आम्ही त्यांच्या (स्वर्गेच्छु आणि मुमुक्षु यांच्या) रहदारीस खुले केले. आम्ही शेषाला लक्ष्मीसह आमचे शरीर देखील विकून टाकले ॥138॥ परंतु ज्यात मी पणाचा लेश नाही, असे जे एक ताजे प्रेमसुख, ते तसेच प्रेमळ भक्तांकरिता जतन करून ठेवले आहे, असे समज. ॥139॥ अर्जुना, येथपर्यंत (वर सांगितल्याप्रमाणे) आम्ही आपलेपणा देऊन प्रेमळ भक्तांचा अंगीकार करतो. या गोष्टी शब्दांनी सांगाव्यात, अशा प्रकारच्या नाहीत. ॥140॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जैसी कमळकळिका जालेपणें


