वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
हें असो कथा सांगें वेगीं । मग अर्जुन म्हणे सलगी । देवा इयें संतचिन्हें हन आंगीं । न ठकती माझां ॥139॥ एऱ्हवीं या लक्षणांचिया निजसारा । मी अपाडें कीर अपुरा । परि तुमचेनि बोलें अवधारा । थोरावें जरी ॥140॥ जी तुम्ही चित्त देयाल । तरी ब्रह्म मिया होईजेल । काय जहालें अभ्यासिजेल । सांगाल तें ॥141॥ हां हो नेणों कवणाची काहाणी । आइकोनि श्लाघत असों अंतःकरणीं । ऐसी जाहलेपणाची शिरयाणी । कायसी देवा ॥142॥ हें आंगें म्यां होईजो कां । येतुलें गोसावी आपुलेपणें कीजो कां । तंव हासोनि श्रीकृष्ण हो कां । करू म्हणती ॥143॥ देखा संतोषु एक न जोडे । तंवचि सुखाचें सैंघ सांकडें । मग जोडिलिया कवणीकडे । अपुरें असे ॥144॥ तैसा सर्वेश्वरु बळिया सेवकें । म्हणोनि ब्रह्मही होय तो कौतुकें । परि कैंसा भारें आतला पिके । दैवाचेनि ॥145॥ जो जन्मसहस्रांचियासाठीं । इंद्रादिकांही महागु भेटी । तो आधीनु केतुला किरीटी । जे बोलुहि न साहे ॥146॥ मग ऐका जें पांडवें । म्हणितलें ब्रह्म म्यां होआवें । तें अशेषही देवें । अवधारिलें ॥147॥ तेथ ऐसेंचि एक विचारिलें । जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले । परि उदरा वैराग्य आहे आलें । बुद्धीचिया ॥148॥ एऱ्हवीं दिवस तरी अपुरे । परी वैराग्यवसंताचेनि भरें । जे सोहंभाव महुरें । मोडोनि आला ॥149॥ म्हणोनि प्राप्तिफळीं फळतां । यासि वेळु न लागेल आतां । होय विरक्तु ऐसा अनंता । भरंवसा जाहला ॥150॥
हेही वाचा – Dnyaneshwari : पाहा पां नवल कैसे चोज, कें उपदेशु केउतें झुंज…
अर्थ
श्रोते म्हणतात, ते राहू दे, लवकर चालू विषय सांग. (यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,) मग अर्जुन सलगीने म्हणाला, कृष्णा ही संतांची लक्षणे माझ्या अंगात वसत नाहीत. ॥139॥ एर्हवी या लक्षणांच्या तात्पर्याचा विचार केला तर, मी खरोखर फारच अपुरा पडेन. परंतु ऐका, जर माझ्यात मोठेपणा यावयाचा असेल तर, तो तुमच्या बोलण्यानेच येईल. ॥140॥ महाराज, तुम्ही लक्ष द्याल तर मी ब्रह्म होईन आणि सांगाल तो अभ्यास करीन; न करायला काय झाले? ॥141॥ अहो देवा, आपण कोणती गोष्ट सांगता हे कळत नाही. (परंतु) ती ऐकून मनात मी त्यांची स्तुती करत आहे. अशी लक्षणे ज्यांच्या अंगात सिद्ध असतील, त्यांचे महत्त्व केवढे असेल बरे? ॥142॥ ते मी स्वत: व्हावे, एवढे प्रभू मी आपला आहे, असे समजून आपण करावे. तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणतात, एवढे का तुझे म्हणणे आहे? तर तसे करू बरे! ॥143॥ पाहा, जोपर्यंत एक समाधान प्राप्त झाले नाही, तोपर्यंत सुखाचा चोहोंकडे दुष्काळ असतो. पण एकदा संतोष प्राप्त झाल्यावर मग सुखाला कोठे कमी आहे? ॥144॥ त्याप्रमाणे सर्वशक्तिमान सर्वेश्वराचा अर्जुन सेवक आहे, म्हणून तो सहज ब्रह्मही होईल, पण अर्जुनाच्या दैवाच्या सामर्थ्याच्या भाराने श्रीकृष्ण कशाप्रकारे फलद्रूप झाला (ते पहा) ॥145॥ इंद्रादिकांना देखील हजारो जन्म घेतले तरी ज्याची भेट होणे दुर्लभ, तो (श्रीकृष्ण) अर्जुनाच्या किती आधीन झाला आहे! अर्जुन प्रश्न करीपर्यंत त्याला धीर धरवत नाही. ॥146॥ मग ऐका, अर्जुनाने ‘मी ब्रह्म व्हावे’, असे जे म्हटले ते श्रीकृष्णांनी सर्व ऐकले. ॥147॥ परंतु भगवंतांनी तेथे असा एक विचार केला की, ज्या अर्थी अर्जुनाला ब्रह्मत्वाचे डोहाळे लागले आहेत, त्या अर्थी याच्या बुद्धीच्या पोटात वैराग्यारूपी गर्भ राहिला आहे. ॥148॥ एऱ्हवी ब्रह्म होण्याला यास अद्याप दिवस कमी आहेत, परंतु वैराग्यरूपी वसंताच्या भराने ‘मी ब्रह्म आहे’ असा भावरूपी मोहोर दाट आला आहे. ॥149॥ म्हणून ब्रह्मप्राप्ती हे फळ येण्यास आता यास फार वेळ लागणार नाही, हा वैराग्यसंपन्न झाला आहे, अशी देवाची पूर्ण खात्री झाली. ॥150॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : देवकीया उदरीं वाहिला, यशोदा सायासें पाळिला…


