वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
पुढती अस्तवेना ऐसें । जया पाहलें अद्वैतदिवसें । मग आपणपांचि आपण असे । अखंडित ॥105॥ ऐसिया दृष्टी जो विवेकी । पार्था तो एकाकी । सहजें अपरिग्रही जे तिहीं लोकीं । तोचि म्हणऊनि ॥106॥ ऐसियें असाधारणें । निष्पन्नाचीं लक्षणें । आपुलेनि बहुवसपणें । कृष्ण म्हणे ॥107॥ तो ज्ञानियांचा बापु । देखणेयांचे दिठीचा दीपु । जया दादुलयाचा संकल्पु । विश्व रची ॥108॥ प्रणवाचिवे पेठे । जाहलें शब्दब्रह्म माजिठें । तें जयाचिये यशा धाकुटें । वेढूं न पुरे ॥109॥ जयाचेनि आंगिकें तेजें । आवो रविशशीचिये वणिजे । म्हणऊनि जग हें वेसजे- । वीण असे तया ॥110॥ हां गा नांवचि एक जयाचें । पाहतां गगनही दिसे टांचे । गुण एकेक काय तयाचे । आकळशील तूं ॥111॥ म्हणोनि असो हें वानणें । सांगों नेणों कवणाचीं लक्षणें । दावावीं मिषें येणें । कां बोलिलों तें ॥112॥ ऐकें द्वैताचा ठावोचि फेडी । ते ब्रह्मविद्या कीजेल उघडी । तरि अर्जुनु पढिये हे गोडी । नासेल हन ॥113॥ म्हणोनि तें तैसे बोलणें । नव्हे सपातळ आड लावणें । केलें मनचि वेगळवाणें । भोगावया ॥114॥
हेही वाचा – Dnyaneshwari : देखें मेघौनि सुटती धारा, तिया न रुपती जैसिया सागरा…
अर्थ
पुन्हा मावळणार नाही अशा ऐक्यरूपी दिवसाने ज्यास उजाडले आहे आणि जो मग निरंतर आपण आपल्या ठिकाणीच (निमग्न) असतो. ॥105॥ अशा दृष्टीने जो विवेकी आहे अर्जुना, तो एकाकी आहे. कारण तिन्ही लोकांत तोच आहे. म्हणून तो सहज परिग्रहशून्य असतो. ॥106॥ (ज्ञानेश्वर महाराज म्हणतात) अशी प्राप्त पुरुषांची लोकोत्तर लक्षणे कृष्ण आपल्या सर्वज्ञतेने सांगतात. ॥107॥ जो (श्रीकृष्ण) ज्ञानी लोकांत श्रेष्ठ आहे, सर्व पाहाणार्यांच्या दृष्टीचा जो प्रकाशक आहे आणि ज्या समर्थांचा संकल्प विश्वाची उभारणी करतो ॥108॥ ॐकाराच्या पेठेत तयार झालेले वेदरूपी वस्त्र हे ज्याच्या सहा गुणांपैकी एक जे यश, त्या यशाला अपुरे पडल्यामुळे वेढू शकले नाही, (वेदांकडून ज्या श्रीकृष्णाच्या यशाचे सुद्धा संपूर्ण वर्णन होऊ शकले नाही) ॥109॥ ज्याच्या (श्रीकृष्णाच्या) अंगातील तेजाने सूर्य-चंद्रांच्या व्यापाराला जोर आहे, तर मग जग हे त्याच्या प्रकाशावाचून प्रकाशित आहे काय? ॥110॥ (ज्ञानेश्वर महाराज आपल्या मनाला म्हणतात, हे मना) ज्या भगवंताच्या नामाचे माहात्म्य पाहिले असता, त्याच्यापुढे आकाशही कमी दिसते. त्या भगवंताचे एक एक गुण तू कसे जाणशील? ॥111॥ म्हणून हे वर्णन करणे पुरे. (या संतांची) लक्षणे सांगण्याच्या निमित्ताने देवाने कोणाची लक्षणे सांगितली आणि ती का सांगितली, हे मला सांगता येत नाही. ॥112॥ (पण मला असे वाटते) ऐका, द्वैताचा ठावठिकाणा नाहीसा करणारे असे जे आत्मज्ञान, ते उघड उघड व्यक्त केले तर, अर्जुन मला आवडतो ही प्रेमाची गोडी खरोखर नाहीशी होईल. ॥113॥ म्हणून भगवंत तसे बोलले नाहीत. परंतु मधे अगदी बारीक असा पडदा ठेवला. (म्हणजे साधूच्या अद्वैतस्थितीच्या वर्णनाने अप्रत्यक्ष रीतीने महावाक्याचा बोध केला आणि अशा रीतीने देवभक्त यांची) मने प्रेमसुख भोगण्याकरिता वेगळी ठेवली. ॥114॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जयाचें नांव तीर्थरावो, दर्शनें प्रशस्तीसि ठावो…


