Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : पाहा पां नवल कैसे चोज, कें उपदेशु केउतें झुंज…

Dnyaneshwari : पाहा पां नवल कैसे चोज, कें उपदेशु केउतें झुंज…

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.

अध्याय सहावा

जया सोहंभाव हा अटकु । मोक्षसुखालागोनि रंकु । तयाचिये दिठीचा झणें कळंकु । लागेल तुझिया प्रेमा ॥115॥ विपायें अंहभाव ययाचा जाईल । मी तेंचि हा जरी होईल । तरि मग काय कीजेल । एकलेया ॥116॥ दिठीचि पाहतां निविजे । कां तोंड भरोनि बोलिजे । नातरी दाटुनि खेंव दीजे । ऐसें कोण आहे ॥117॥ आपुलिया मना बरवी । असमाई गोठी जीवीं । ते कवणेंसि चावळावी । जरी ऐक्य जाहलें ॥118॥ इया काकुळती जनार्दनें । अन्योपदेशाचेनि हातासनें । बोलामाजि मन मनें । आलिंगूं सरलें ॥119॥ हें परिसतां जरी कानडें । तरी जाण पां पार्थ उघडें । कृष्णसुखाचेंचि रुपडें । वोतलें गा ॥120॥ हें असो वयसेचिये शेवटीं । जैसें एकचि विये वांझोटी । मग ते मोहाची त्रिपुटी । नाचों लागे ॥121॥ तैसें जाहले अनंता । ऐसें तरि मी न म्हणतां । जरी तयाचा न देखतां । अतिशयो एथ ॥122॥ पाहा पां नवल कैसे चोज । कें उपदेशु केउतें झुंज । परि पुढें वालभाचें भोज । नाचत असे ॥123॥ आवडी आणि लाजवी । व्यसन आणि शिणवी । पिसें आणि न भुलवी । तरी तेंचि काइ ॥124॥ म्हणऊनि भावार्थु तो ऐसा । अर्जुन मैत्रियेचा कुवासा । कीं सुखें श्रृंगारलिया मानसा । दर्पणु तो ॥125॥ यापरी बाप पुण्यपवित्र । जगीं भक्तिबीजासि सुक्षेत्र । तो कृष्णकृपे पात्र । याचिलागीं ॥126॥ हो कां आत्मनिवेदनातळींची । जे पीठिका होय सख्याची । पार्थु अधिष्ठात्री तेथिंची । मातृका गा ॥127॥ पासींचि गोसावी वर  न वानिजे । मग पाइकाचा गुण घेईजे । ऐसा अर्जुनुचि तो सहजें । पढिये हरी ॥128॥

हेही वाचा – Dnyaneshwari : जयाचें नांव तीर्थरावो, दर्शनें प्रशस्तीसि ठावो…

अर्थ

जे ‘मी ब्रह्म आहे’ अशा बोधात अडकले आहेत आणि जे मोक्षसुखाकरिता दीन झाले आहेत, अशांच्या दृष्टीचा काळिमा तुझ्या प्रेमाला कदाचित् लागेल ॥115॥ कदाचित् याचा मीपणा जाईल आणि हा जर मीच होईल, तर मग मी एकट्याने काय करावे? ॥116॥ डोळ्यांनीच पाहून शांत व्हावे किंवा तोंड भरून बोलावे अथवा कडकडून आलिंगन द्यावे, असे (दुसरे) कोण आहे? ॥117॥ जी गोष्ट आपल्या मनाला चांगली वाटते आणि जीवात मावत नाही अशी गोष्ट, जर अर्जुनाचे आपणाशी ऐक्य झाले तर, कोणास सांगावी? ॥118॥ या काळजीने अन्योपदेशाच्या हातवटीने (साधूंच्या वर्णनाने) बोलण्यामध्ये, श्रीकृष्णांनी अर्जुनाचे अर्जुनत्व कायम ठेऊन आपल्या मनाने अर्जुनाच्या मनास आलिंगन दिले ॥119॥ हे ऐकण्यास जरी अवघड वाटले तरी असे समज की, अर्जुन हा श्रीकृष्णाच्या सुखाचीच ओतलेली उघड मूर्ति आहे. ॥120॥ हे राहू द्या. ज्याप्रमाणे वय झाल्यावर एखाद्या वांझ स्त्रीला एकुलते एक मूल झाले असता, त्या स्त्रीच्या रूपाने मग मूर्तिमंत मोहच वावरतो (तशी देवाची स्थिती झाली). ॥121॥ अर्जुनाविषयी देवाच्या प्रेमाचा अतिरेक जर मी पाहिला नसता तर, मी असे (वांझोट्या बाईसारखे) देवाला झाले, असे म्हटले नसते. ॥122॥ आश्चर्य पाहा की, भगवंताचे अर्जुनाच्या ठिकाणी प्रेम कसे आहे! कसला युद्धप्रसंग आणि कोणत्या ठिकाणी हा उपदेश! (युद्धाचा प्रसंग ही अत्यंत विक्षेपाची जागा असल्यामुळे आत्मज्ञानाचा उपदेश करण्याला अगदी अयोग्य. परंतु अर्जुनाच्या प्रेमामुळे भगवंतांनी वेळेच्या योग्यतेकडे लक्ष न देता आत्मज्ञानाचा उपदेश केला). परंतु निश्चयेकरून श्रीकृष्ण ही अर्जुनाच्या प्रेमाची मूर्तीच अगर चित्रच नाचत आहे. ॥123॥ प्रेम आहे आणि ते लाज उत्पन्न करते, तर ते प्रेम कसले? तसेच, व्यसन आहे आणि त्याने जर शीण होत असेल तर ते व्यसन कसले? वेड आहे, परंतु भ्रम पाडत नाही, तर ते वेड कसले? ॥124॥ म्हणून इतक्या बोलण्याचा अभिप्राय एवढाच की, अर्जुन हा भगवंताच्या सख्यभक्तीचा आश्रय आहे अथवा सुखाने श्रृंगारलेल्या (भगवंताच्य़ा) मनाचा तो आरसाच आहे. ॥125॥ याप्रमाणे तो अर्जुन धन्य असून पुण्याने पावन आहे. या जगात भक्तिरूप बी पेरण्यास तो चांगले शेत आहे आणि म्हणून कृष्णकृपेला तो पात्र झाला आहे. ॥126॥ अथवा आत्मनिवेदनरूपी भक्तीच्या खालची जी सख्यभक्तीची भूमिका आहे, त्याची अर्जुन ही मुख्य देवता आहे. ॥127॥ शेजारीच असलेल्या प्रभूचे वर्णन टाकून द्यावे आणि भक्तांच्या गुणांचे वर्णन करावे, इतका अर्जुनच स्वाभाविक रीतीने देवास आवडतो ॥128॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : तो ज्ञानियांचा बापु, देखणेयांचे दिठीचा दीपु…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!