सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
तो हा अकरावा अध्यायो । जो देवाचा आपणपें विसंवता ठावो । परि अर्जुन सदैवाचा रावो । जे एथही पावला ॥13॥ एथ अर्जुनचि काय म्हणों पातला । आजि आवडतयाही सुकाळु जाहला । जे गीतार्थु हा आला । मऱ्हाठिये ॥14॥ याचिलागीं माझें । विनविलें तें आइकिजे । तरी अवधान दीजे । सज्जनीं तुम्हीं ॥15॥ तेवींचि तुम्हां संतांचिये सभे । ऐसी सलगी कीर करूं न लभे । परि मानावें जी तुम्हीं लोभें । अपत्या मज ॥16॥ अहो पुंसा आपणचि पढविजे । मग पढे तरी माथा तुकिजे । कां करविलेनि चोजें न रिझे । बाळका माय ॥17॥ तेवीं मी जें जें बोलें । तें प्रभु तुमचेंचि शिकविलें । म्हणोनि अवधारिजो आपुलें । आपण देवा ॥18॥ हें सारस्वताचें गोड । तुम्हींचि लाविलें जी झाड । तरी आतां अवधानामृतें वाढ । सिंपोनि कीजे ॥19॥ मग हें रसभावफुलीं फुलेल । नानार्थ फळभारें फळा येईल । तुमचेनि धर्में होईल । सुकाळ जगा ॥20॥ या बोला संत रिझले । म्हणती तोषलों गा भलें केलें । आतां सांगें जें बोलिलें । अर्जुनें तेथ ॥21॥ तंव निवृत्तिदास म्हणे । जी कृष्णार्जुनांचें बोलणें । मी प्राकृत काय सांगों जाणें । परि सांगवा तुम्ही ॥22॥ अहो रानींचिया पालेखाइरा । नेवाणें करविजे लंकेश्वरा । एकला अर्जुन परी अक्षौहिणी अकरा । न जिणेचि काई ॥23॥ म्हणोनि समर्थ जें जें करी । तें न हो न ये चराचरीं । तुम्ही संत तयापरी । बोलवा मातें ॥24॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…
अर्थ
तो हा अकरावा अध्याय आहे की, जो देवाचे खास विश्रांतीचे ठिकाण आहे. पण अर्जुन हा दैववान पुरुषांचा राजा आहे, कारण की, तो तेथेही प्राप्त झाला आहे. ॥13॥ येथे अर्जुनच एकटा प्राप्त झाला आहे, असे काय म्हणावे? तर गीतार्थ मराठी भाषेत आल्याकारणाने आज वाटेल त्यालाही सुकाळ झाला आहे. ॥14॥ याचकरिता मी जी विनंती करीत आहे, ती तुम्ही ऐकावी. ती इतकीच की, तुम्ही संतांनी (मी कथा वर्णन करीत आहे) इकडे लक्ष द्यावे. ॥15॥ तसेच, तुम्हा संतांच्या सभेमध्ये अशी ही सलगी करणे, माझ्यासारख्यास खरोखर योग्य नाही, पण मी जे तुमचे लेकरू, त्या मला तुम्ही प्रेमाने मानावे म्हणून सलगी करतो. ॥16॥ अहो, आपणच राघूला शिकवावे आणि शिकवल्याप्रमाणे तो बोलू लागला म्हणजे आपणच पसंतीने मान डोलवावी, किंवा मुलाकडून एखादी गोष्ट करवून घेऊन मग त्याने केलेल्या कृत्याच्या कौतुकाने आई आपल्या मनात मुलाविषयी संतुष्ट होत नाही काय? ॥17॥ त्याप्रमाणे महाराज, मी जे जे प्रतिपादन करतो, महाराज, ते तुम्हीच शिकवलेले आहे. एवढ्याकरिता अहो संतजनहो, आपण शिकवलेले आपणच ऐकावे. ॥18॥ महाराज, हे सारस्वताचे सुंदर झाड आपणच लावले आहे, तर आता याकडे आपण लक्ष देणे, हेच कोणी एक अमृत ते शिंपून मोठे करावे ॥19॥ मग हे सारस्वताचे झाड नवरस भावरूपी फुलांनी फुलेल आणि नाना प्रकारच्या अर्थरूपी फळभाराने फळास येईल, आणि तुम्ही (लक्ष देणे रूप) धर्म केलात म्हणजे जगास (श्रवणसुखाचा) सुकाळ होईल. ॥20॥ या बोलण्यावर संत संतुष्ट झाले आणि म्हणाले, ज्ञानोबा, आम्ही संतुष्ट झालो, तू फार चांगले केलेस. आता त्या प्रसंगी अर्जुनाने जो प्रश्न केला, त्याचे व्याख्यान कर. ॥21॥ तेव्हा निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणाले, महाराज, कृष्ण आणि अर्जुन या दोघांमध्ये झालेले भाषण माझ्यासारख्या सामान्य पुरुषाला सांगण्याचे काय ठाऊक? परंतु ते माझ्याकडून सांगून घेण्याचे काम तुम्ही करीत आहात. ॥22॥ अहो, रानातील पाले खाणार्या वानरांकडून लंकेचा राजा जो रावण, त्याचा पराभव केला जावा; अर्जुन एकटाच होता, पण त्याने अकरा अक्षौहिणी सैन्य जिंकले नाही काय? ॥23॥ म्हणून समर्थ जे जे करील, ते ते चराचरात होणार नाही, असे नाही. त्याप्रमाणे तुम्ही संत समर्थ आहात, म्हणून तुम्ही जर मनात आणाल तर माझ्यासारख्या (नेणत्या) कडून (गूढ गीतार्थ) बोलवाल. ॥24॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : माजीं गीता सरस्वती गुप्त, आणि दोनी रस ते ओघ मूर्त…


