Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : जें दुर्मतीचें मूळ, जें कुमार्गाचें फळ…

Dnyaneshwari : जें दुर्मतीचें मूळ, जें कुमार्गाचें फळ…

अध्याय आठवा

येरी शरीराचिया सलिलीं । असतेपण हेंचि साउली । वांचूनि चंद्रिका ते ठेली । चंद्रींच आहे ।।138॥ ऐसे जे नित्ययुक्त । तयासि सुलभ मी सतत । म्हणऊनि देहांतीं निश्चित । मीचि होती ॥139॥ मग क्लेशतरूची वाडी । जे तापत्रयाग्नीची सगडी । जे मृत्युकाकासि कुरोंडी । सांडिली आहे ॥140॥ जें दैन्याचें दुभतें । जें महाभयातें वाढवितें । जें सकळ दुःखाचें पुरतें । भांडवल ॥141॥ जें दुर्मतीचें मूळ । जें कुमार्गाचें फळ । जें व्यामोहाचें केवळ । स्वरूपचि ॥142॥ जें संसाराचें बैसणें । जें विकाराचें उद्यानें । जें सकळ रोगांचें भाणें । वाढिलें आहे ॥143॥ जें काळाचा खिचउशिटा । जें आशेचा आंगवठा । जन्ममरणाचा वोलिंवटा । स्वभावें जें ॥144॥ जें भुलीचें भरिंव । जें विकल्पाचें वोतिंव । किंबहुना पेंव । विंचवाचें ॥145॥ जें व्याघ्राचें क्षेत्र । जें पण्यांगनेचें मैत्र । जें विषयविज्ञानयंत्र । सुपूजित ॥146॥ जें लावेचा कळवळा । निवालिया विषोदकाचा गळाळा । जें विश्वासु आंगवळा । संवचोराचा ॥147॥ जें कोढियाचें खेंव । जें काळसर्पाचें मार्दव । जे गोरीचें स्वभाव । गायन जें ॥148॥ जें वैरियाचा पाहुणेरु । जें दुर्जनाचा आदरु । हें असो जें सागरु । अनर्थाचा ॥149॥ जें स्वप्नीं देखिलें स्वप्न । जें मृगजळें सासिन्नलें वन । जें धूम्ररजांचें गगन । ओतलें आहे ॥150॥ ऐसें जें हें शरीर । तें ते न पवतीची पुढती नर । जे होऊनि ठेले अपार । स्वरूप माझें ॥151॥

हेही वाचा – Dnyaneshwari : तैसें ॐ हें स्मरों सरे, आणि तेथेंचि प्राणु पुरे…


अर्थ

एरवी चंद्राच्या चांदण्याचा भास जरी पाण्यात झाला, तरी ते चांदणे चंद्राच्याच ठिकाणी असते, त्याप्रमाणे शरीररूप पाण्यात जरी तो भक्त दिसला, तरी तो नुसता भासमात्र आहे. वास्तविक तो माझ्या स्वरूपीच आहे. ॥138॥ याप्रमाणे जे माझ्या ठिकाणी नित्य जडलेले असतात, त्यांना मी नेहमी जवळ आहे. म्हणून ते देह पडल्यावर खात्रीने मीच होतात. ॥139॥ नंतर जे (शरीर) दु:खरूप वृक्षांची बाग आणि अध्यात्मादी तीन तापरूपी विस्तवाची शेगडी आणि मृत्युरूपी कावळ्यास उतरून टाकलेला बळी आहे. ॥140॥ जे दैन्य प्रसवणारे आहे, जे मरणाला पोसते आणि जे सर्व दु:खांचे पुरेसे भांडवल आहे ॥141॥ जे दुष्टबुद्धीचे उत्पत्तिस्थान आणि वाईट क्रियांचे फल आहे, जे केवळ मूर्तिमंत गाढ अविवेकच आहे, ॥142॥ जे संसाराची बैठक आहे, जे विकाररूपी झाडांचा बगिचा आहे, आणि जे सर्व रोगांचे वाढलेले ताट आहे, ॥143॥ जे मृत्यूचे खाऊन उरलेले अन्न आहे, जे मूर्तिमंत आशा आहे, जे जन्म आणि मृत्यूची स्वाभाविक वाहती वाट आहे. ॥144॥ जे भ्रमाचे भरलेले आणि संशयाचे ओतलेले आहे, फार काय सांगावे? जे विंचवाचे पेव आहे, ॥145॥ जे शरीर, वाघाचे वसतीस्थान आहे, जे वेश्येच्या स्नेहाप्रमाणे (दिखाऊ) आहे, जे विषयांचा अनुभव करून देणारे सुपूजित यंत्रच आहे, ॥146॥ जे राक्षसांची दिखाऊ कळकळ आहे, जे निवालेल्या विषाचा घोट आहे, जे सावाचे सोंग घेतलेल्या चोराचा मिळवलेला विश्वास आहे, ॥147॥ जे रक्तपित्याचे आलिंगन आहे, जे हटकून मारणार्‍या सापाचा मऊपणा आहे आणि जे पारध्याचे स्वाभविक गायन आहे ॥148॥ जे शत्रूचा पाहुणचार आहे, जे दुष्ट लोकांचा सन्मान आह; हे राहू द्या, जे (सर्व) अनर्थांचा समुद्र आहे ॥149॥ जे (शरीर) स्वप्नात पाहिलेले स्वप्न आहे अथवा मृगजळाच्या पाण्याने भरास आलेले रान आहे, किंवा जे शरीर म्हणजे धुराच्या कणांचे बनविलेले आकाश आहे, ॥150॥ असे (अनर्थकारक आणि खोटे) जे शरीर ते, जे पुरुष माझे अमर्याद स्वरूपच होऊन राहिलेले आहेत, त्यास पुन्हा प्राप्त होत नाही. ॥151॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : देहवैकल्याचा वारा, झणें लागेल या सकुमारा…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!