नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
गेल्या लेखात मी डॉगी ब्रँडीबद्दल जुजबी बोलले होते. आज खरंतर खूप काही बोलणार आहे. एका संवादिकेबरोबर जे बोलणं झालं त्याबद्दल! आता त्यावर किती विश्वास ठेवायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. वास्तविक, माझ्या ब्रँडीची खरी संवादिका वेगळी होती. पण संवादिका म्हणून ही दुसरीच मुलगी पुढे आली आणि मला शॉक देऊन गेली. मला अजून कळत नाहीये की, मी दुःख मानावं की आनंद?
त्या नवीन संवादिकेने मला सांगितलं की, ब्रॅण्डी ही गेल्या जन्माची तुमची फॅमिली मेंबर होती. तुम्हा सगळ्यांवर तिचं खूप प्रेम करणं आणि तुमच्याकडून खूप प्रेम करून घेणं राहिलं होतं. त्यासाठी तिने पुनर्जन्म घेतला. तुमच्या संपूर्ण कुटुंबावर तिने माया केलीच. पण तुम्हा सगळ्यांकडून प्रेम वसूल करून घेतलं… मी त्या नवीन संवादिकेला नाव विचारलं. तिने खूप काही साधना केल्यानंतर मला नाव सांगितलं. पण पुढला एक आठवडा ती स्वतः खूप अशक्त होऊन राहणार होती. त्यासाठी तिने माझ्याकडून एक रुपया पण घेतला नाही. नाव ऐकलं आणि मी कसं रीॲक्ट व्हावं कळेचना! दुःख तर होतंच, पण समाधानही वाटत होतं…
तिने सांगितल्याप्रमाणे मी ब्रँडीच्या सवयी आठवायला सुरुवात केली. तिला मी, माझा नवरा, मुलगा, मुलगी प्रचंड आवडायचे. तिने (ब्रँडीने) स्वतः सांगितलं की, आई खूप चांगली आहे, प्रेमळ आहे. पण मला बाबा जास्त आवडतो. माझा जावई घरी आलेला तिला चालत होता. पण माझी सून जेव्हा लग्न होऊन आली, तेव्हा मात्र तिच्यावर लक्ष ठेऊन होती. ही किचनमध्ये काय करते? घरभर का फिरते? तिच्या चेहऱ्यावर ते दिसायचं. मग ती हळूच झोपेच सोंग करून तिला बघत रहायची. मग तिलाच समजलं की, ही या घरातच राहणार आहे. आता हिच्यावर लक्ष ठेवायची गरज नाही!
हेही वाचा – ब्रँडी… उरल्या फक्त आठवणी!
माझे आई-वडील घरी आलेले तिला आवडायचे. पण भाऊ, वाहिनी, भाचा आले की, ती जास्त खूश असायची. बहीण, तिचा नवरा, मुलगा आले की तिला आनंद व्हायचा. ती खूश असली की तिचे दोन्ही कान उभे राहायचे. माझी आत्या, काका त्यांची मुले घरी आलेली तिला आवडायचं. माझे मामा तिचे लाड करायचे. त्यांच्या येण्याने ती खूश असायची. तिला गोड खाणे, आइस्क्रीम, मासे खूप प्रिय! चिकन लिव्हर आणि मटन भेजासाठी ती वेडी होती. केळी आवडीने खायची. तिच्या जेवणाच्या वेळी कोणी परकं माणूस घरी आलं असेल तर ती, चक्क त्यांच्याकडे पाठ करून जेवायची!
गेल्यावर्षी पूर्ण आयुष्यभरीचा आंबा खाऊन घेतला. जाण्याच्या महिनाभर आधी ती रोज संध्याकाळी चहा प्यायला मागायची आणि मी देत होते… जाण्याच्या काही महिने आधी तिच्या पायाने तिला बराच त्रास दिला होता…
हेही वाचा – मोठी आई अन् तिने लहानांचा राखलेला सन्मान!
काय आणि किती गोष्टी आठवत होत्या. ज्या तिच्या मागच्या जन्माशी जुळत होत्या. हे मी कोणालाच सांगू शकत नव्हते. उगाच कोणालाही इमोशनल ब्लॅकमेल केलं असे वाटायचं! म्हणून मी तिचं नाव जाहीर केलं नव्हतं… आम्ही तिला दफन न करता हिंदू स्मशानभूमीमध्ये अग्नी दिला. शेवटपर्यंत तिचे कान उभे होते. मी रडत असताना माझा मुलगा एवढंच म्हणाला, “आई तिचे कान बघ अजूनही उभे आहेत. ती खूश आहे. तू शांत हो ती स्वामी आजोबांकडे रुजू झाली.” ॲम्ब्युलन्समधून बाहेर पडताना माझ्या पायाजवळून मोठा काळा मुंगळा गेला. स्वामींनी या गोष्टीची प्रचिती दिली…
गुरुजींनी तिचं दहावं, बारावं, तेरावं केलं आणि तेव्हाच तिच्या संवादिकेचा मेसेज आला की, “प्लीज आप ब्रँडी के पिछले जनम का नाम अपने फॅमिली को बता दीजिये…” अजूनही मी संभ्रमात आहे… सांगावं की नाही? काय करावं समजत नाही. एवढं सगळं वाचून माझ्या कुटुंबीयांना ती कोण होती, ते कळेलच. तुम्ही सांगा. मी काय करू? नाव सांगू का? सगळ्यात महत्त्वाचं साम्य म्हणजे दोन्ही जन्मात तिच्यावर अग्निसंस्कार बारशीला म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीला झाला!
Love you ब्रँडी


