आराधना जोशी
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात भरपूर प्रमाणात तुरीच्या ओल्या शेंगा हमखास पाहायला मिळतात. याच ओल्या दाण्यांची वैदर्भीय पद्धतीची आमटी कशी करतात ते बघू या.
साहित्य
- ओल्या तुरीचे दाणे – 1 मोठी वाटी
- तेल – 2 टेबलस्पून
- लसूण पाकळ्या – 8 ते 10
- उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या – 2 ते 3
- किसलेलं सुकं खोबरं – 2 टेबलस्पून
- मोहरी – अर्धा टीस्पून
- जिरं – अर्धा टीस्पून
- हिंग – पाव टीस्पून
- कढीलिंब – 5 ते 6 पाने
- हळद – पाव टीस्पून
- गोडा मसाला – पाव टेबलस्पून
- कोथिंबीर – चिरलेली मूठभर
- पाणी – आवश्यकतेनुसार
- मीठ – चवीनुसार
पुरवठा संख्या : 4 व्यक्तींसाठी
तयारीस लागणारा वेळ : 30 मिनिटे
शिजवण्याचा वेळ : 10 मिनिटे
एकूण वेळ : 40 मिनिटे
(तुरीचे दाणे आधीच सोलून ठेवले असतील तर तयारीला 5 ते 7 मिनिटे पुरेशी आहेत.)
हेही वाचा – Recipe : लो कार्ब वेजी टोस्ट
कृती
- तुरीच्या शेंगा व्यवस्थित सोलून त्यातले चांगले तुरीचे ओले दाणे काढून घ्या.
- सुक्या खोबऱ्याचा कीस खरपूस भाजून घ्या.
- खोबरं भाजलेल्याच कढईत एक चमचा तेल गरम करून घ्या.
- यात सोलून घेतलेल्या लसणाच्या 6 ते 7 पाकळ्या, उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या छान परतून घ्या.
- लसणीचा कच्चा वास गेला म्हणजे त्यात सोललेले तुरीचे दाणे घाला आणि परतून घ्या.
- साधारणपणे 5 मिनिटांनी दाणे हाताला परतताना हलके लागतात. त्यावेळी गॅस बंद करा.
- दाणे थंड झाले की भाजून घेतलेलं सुकं खोबरं आणि कढईतील मिश्रण मिक्सरमध्ये घाला. त्यात मूठभर कोथिंबीर घालून हलकेच फिरवून घ्या. अगदी बारीक करू नये.
- या मिश्रणात थोडंसं पाणी घालून परत एकदाच मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
- परत एकदा कढईत 1 टेबलस्पून तेल घाला. तेल गरम झालं की, त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की जिरं आणि हिंग घाला. जिरं फुललं की, लसणाच्या दोन पाकळ्या बारीक चिरून फोडणीत घाला.
- लसूण तेलात चांगला परतला गेला की, मग त्यात कढीलिंबाची पाने घाला. मग हळद, गोडा मसाला घालून परत एकदा छान परतून घ्या.
- परतलेल्या या मसाल्यात वाटून घेतलेलं तुरीच्या दाण्यांचे मिश्रण घाला.
- गरजेनुसार पाणी आणि चवीनुसार मीठ घालून आमटीला एक छान उकळी आली की, गॅस बंद करा.
- वाफाळत्या भातासोबत किंवा भाकरी चुरडून वरून ही आमटी घालून खाण्याची पद्धत आहे. ही गरमागरम आमटी नुसती सूप म्हणून घेऊ शकता.
विशेष आहार माहिती : शाकाहारी
हेही वाचा – Recipe : आवळ्याचे रसम
टिप्स
- विदर्भातील पारंपरिक पद्धतीत या आमटीला मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिली जात नाही. इथे थोडासा बदल करून फोडणी तयार केली आहे.
- हिरव्या मिरच्यांचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता.
- घरी जर पाटा वरवंटा असेल तर तेलात परतून घेतलेले तुरीचे दाणे त्यावर वाटून घ्या. चव आणखी खमंग येईल.
- मिश्रण मिक्सरमध्ये एकदा ओबडधोबड फिरवून झाले की, थोडेसे पाणी घालून परत एकदा वाटून घेतले की दाणे आणि पाणी छान एकत्र होते. चोथा – पाणी वेगवेगळे दिसत नाही.
- मिश्रण वाटताना त्यात कोथिंबीर घातलेली आहे. मात्र आमटी उकळल्यानंतर गॅस बंद करून वरून आणखी थोडी कोथिंबीर घालू शकता.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील. तथापि, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.


