अध्याय पंधरावा
जें पाताळींचेंही निधान । दावील कीर अंजन । परी होआवे लोचन । पायाळाचे ॥34॥ तैसें मोक्ष देईल ज्ञान । येथें कीर नाहीं आन । परी तेंचि थारे ऐसें मन । शुद्ध होआवें ॥35॥ तरी विरक्तीवांचूनि केहीं । ज्ञानासि तगणें नाहीं । हें विचारूनि ठाईं । ठेविलें देवें ॥36॥ आतां विरक्तीची कवण परी । जे येऊनि मनातें वरी । हेंही सर्वज्ञें श्रीहरी । देखिलें असे ॥37॥ जे विषें रांधिली रससोये । जैं जेवणारा ठाउवी होये । तैं तो ताटचि सांडूनि जाये । जयापरी ॥38॥ तैसी संसारा या समस्ता । जाणिजे जैं अनित्यता । तैं वैराग्य दवडितां । पाठी लागे ॥39॥ आतां अनित्यत्व या कैसें । तेंचि वृक्षाकारमिषें । सांगिजत असे विश्वेशें । पंचदशीं ॥40॥ उपडिलें कवतिकें । झाड येरी मोहरा ठाके । तें वेगें जैसें सुके । तैसें हें नव्हे जाण ॥41॥ याचि एकेपरी । रूपकाचिया कुसरी । सारीतसे वारी । संसाराची ॥42॥ करूनि संसार वावो । स्वरूपीं अहंते ठावो । होआवया अध्यावो । पंधरावा हा ॥43॥ आतां हेंचि आघवें । ग्रंथगर्भींचें चांगावें । उपलविजेल जीवें । आकर्णिजे ॥44॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : येवढें एक सौभग, वळघे वाचेचें आंग
अर्थ
द्रव्यांजन हे जमिनीत खोल पुरलेले देखील द्रव्य निश्चयेकरून दाखवतील, परंतु ते घालण्यास पायाळाचे डोळे पाहिजेत. ॥34॥ त्याप्रमाणे ज्ञान मोक्ष देईल, यात खरोखरच अन्यथा नाही, पण ते ज्ञान टिकेल, असे मन शुद्ध पाहिजे. ॥35॥ तर वैराग्यावाचून कोठेही ज्ञान टिकावयाचे नाही, हे देवाने आपल्याशी विचार करून ठेवले आहे. ॥36॥ आता वैराग्याचा असा कोणता प्रकार आहे की, जो आपण होऊन येऊन मुमुक्षूच्या मनाला माळ घालील? हे देखील सर्व जाणणार्या श्रीहरीने विचार करून पाहिले आहे. ॥37॥ ज्याप्रमाणे विष घालून तयार केलेले अन्न जेव्हा जेवणारास माहीत होते, तेव्हा तो जसा त्याच्यापुढे असलेले अन्न वाढलेले पात्रच टाकून निघून जातो ॥38॥ त्याप्रमाणे या सर्व संसाराला अनित्यता आहे, असे ज्या वेळेला कळेल, त्यावेळी वैराग्याला घालवून दिले तरी, ते वैराग्य आपण होऊन साधकाच्या पाठीमागे लागेल. ॥39॥ आता या संसाराला क्षणभंगुरपणा कसा आहे, तेच वृक्षाच्या रूपकाने जगाचे स्वामी श्रीकृष्णपरमात्मा पंधराव्या अध्यायात सांगतात. ॥40॥ सहज उन्मळून पडलेले झाड, शेंडा खाली व बूड वर असे पडले असता, ते जसे लवकर सुकते, त्याप्रमाणे हा संसारवृक्ष नाही, हे लक्षात ठेव. ॥41॥ याच एका प्रकारच्या (म्हणजे संसार हाच कोणी एक, बूड वर व शेंडा खाली असलेला वृक्ष आहे अशा) रूपकाच्या चातुर्याने (भगवान) जन्ममृत्युरूपी संसाराची येरझार संपवतात. ॥42॥ संसाराचे मिथ्यात्व दाखवून, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी (जीवाच्या) अहंतेचे ठिकाण होण्याकरिता हा पंधरावा अध्याय आहे. ॥43॥ आता ग्रंथातील हेच सर्व चांगले सिद्धांत विस्ताराने स्पष्ट सांगण्यात येतील. ते तुम्ही (श्रोत्यांनी) मन लावून ऐकावे. ॥44॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : आधणीं घातलिया हरळ, होती अमृताचे तांदुळ


