कधी कधी एखादा विचार भटकून भटकून थकतो
आणि मग एका संध्याकाळी तो कायमचा थांबतो.
हो थांबतो! कारण त्याला वाटतं,
“माझं थकलेपण आता स्वतःच्याच सावलीत विसावतंय…!”
कित्येक वर्षं उलटून गेली होती.
कविता आता आता वेगळ्या कविता लिहू लागली होती, डायरीशिवाय!
कविता फक्त कविता उरली नव्हती…
कथा, कविता, अनुभव, आणि कधीही न झालेल्या त्यांच्या संवादांचं साहित्य!
आयुष्य आता इतकं मोजकं आणि सुटसुटीत झालं होतं,
की त्यात फक्त आवश्यक नसलेल्या फक्त दोनच गोष्टी उरल्या होत्या…
त्यातली एक डायरी! जिचं शेवटचंच एक पान कोरं राहून गेलं होतं…
तेवढीच एक खंत.
आणि शब्दांच्या मागे सतत धावणारी त्यांची ती डायरी हातात घेतलेली सावली.
हेही वाचा – भय
डायरीत आता काही अधिक लिहिलं जायचं नाही…
कदाचित ती फक्त लिहीलेल्या कविता जगत होती.
आठवतं अजूनी,
एकाच दिवसात कित्येक कडवी आणि शेर,
जे आयुष्य ती डायरी जगली होती…
आता वर्षभरात एक दोन ओळींपर्यंत डायरीचं आयुष्य सीमित उरलं होतं.
अजूनही काही ओळी मनाच्या तळाशी रेंगाळत असताना…
ती त्या पुन्हा लिहिलेल्या…
त्याच त्या आठवओळींना दूर हाकलून देऊ शकत नव्हती.
डायरीलाही ठाऊक होतं की, तो आता ख़यालही उरला नव्हता..
फक्त रद्दीत घालावीशी न वाटलेली ती डायरी होती.
डायरीशिवाय आणखी इतकं असहाय्य झालेलं
आणखी कोणी, कोणीही पाहिलेलं नव्हतं.
डायरी आणि कविता दोघेही एकाच शहरात होते.
पण आता ते एकमेकांच्या आयुष्यात नव्हते
फक्त जवळजवळच्या समांतर रेषांमध्ये होते.
एकदा प्रदर्शनात कवितेने स्वतः लिहिलेली शेवटची एक कविता कॅनव्हासवर वाचली.
न ओळखू येणारं ते चित्र!
तरीही तिने त्याच्या विस्कटलेल्या कॅनव्हासवर विस्कटलेली शैली बघून
कवितेने तिची स्वतः लिहिलेली कविता ओळखली.
ही माझीच डायरी. कुणास ठाऊक कुठल्या हक्कांनं कवितेनं हा दावा केला.
तिला वाटलंच होतं,
ती डायरी तिची असूनही कुणा अज्ञात हाती सोपवली गेली असेल.
पण शेवटचं पान मात्र आजही कोरंच असेल.
हेही वाचा – एकटं टाकून…
“मैं अब भी वहीं हूँ,
जहाँ तुमने छोड़ा था।
फर्क बस इतना है,
अब वहाँ मैं अकेला नहीं हूँ।
ती एकट्याने तो न लिहिलेला कॅनव्हास वाचू लागली…
अंगावर सर्रकन काटा आला आणि तिला डायरी आठवली.
ती डायरी आजही तिच्या आसपास कोठेच नव्हती…
पण त्या डायरीचा कॅनव्हास मात्र
तिथेच प्रदर्शनात मांडून तिष्ठत राहिला होता.
आयुष्यभर डायरीनं आपली पानं आणखी खूप काही गोष्टी
अश्रूंसह लपवल्या होत्या…
मग हा कॅनव्हास असा प्रदर्शनात मांडण्याइतकी ती डायरी धीट कशी झाली?
एखादी डायरी स्वतःला इतकी बदलू शकते?
कवितेनं एक दिवस गाठलेच त्या डायरीला…
विनानिमंत्रण!
त्याच त्या जुन्या मळकट बाकावरच्या कॅफेमध्ये!
जिथे कविता आणि डायरी यांच्या एकेकाळी दोघं एकत्र
मूक संवादात, अक्षरात विरघळले होते.
ती अजूनही त्याच कोपऱ्यात पडलेली मळकट अस्ताव्यस्त डायरी!
त्या डायरीच्या डोळ्यांत पूर्वीसारखी बेचैनी नाही.
उलट एक अपार शांती होती…
जणू ती आता स्वतःच्याच वादळांत हरवून, दमून, कंटाळून गेलीय.
तेच एक शेवटचे पान आजही रिकामे.
कविता काहीच बोलली नाही. केवळ एकेक कागद चाळू लागली.
डायरी क्षीण हसली.
एक अस्सल, थकलेल्या हृदयातून उमटलेलं हसू!
“कधी वाटलं होतं का की डायरीशिवायही हे अवघं आयुष्य कवितेला जगता येईल?
पण आता लक्षात येतं,
काही कविता डायरीचा भाग होतच नाहीत.
पण नव्या कवितांच्या, कॅनव्हासच्या छटा तर होतातच ना?
कवितेनं विचारलंच शेवटी…
डायरी काही बोलली नाही.
डायरीत फक्त कविताच कविता!
तरीही कुठलंही उत्तर नाही..
आता उत्तरंच नाहीत.
फक्त परिस्थितीचा शांतपणे केलेला स्वीकार आहे.
भटकलेले विचारही एक दिवस थांबतात.
पण डायरी – एक प्रश्न विचारायचा आहे,
हे सांगताना मात्र थकली नाही. एक प्रश्न उरलाच होता.
“विचारू?” डायरीनं कळवळून कवितेची नजर टाळतच विचारलं…
“विचारू” हा काही प्रश्न नाही,
पण काही प्रश्नांना विचारण्याआधीच उत्तर द्यावी लागतात…
नेहमीप्रमाणे कविता हळूवार काही बोलली.
ज्यांच्यासाठी कविता भरकटतात कधीकधी त्यांच्याच आठवणीत स्थिरावतात…!
“पाचोळा असतात कविता…
कुठे उधळतील, कुठल्या वादळाच्या शेवटानंतर कुठेतरी जाऊन कोसळतील…
नियती असं अधिक काही ठरवत नाही
तुझं शेवटचं पान लिहू?
हो म्हण ना! कवितेनं बळेबळे डायरीजवळ ओढली.
हृदयाजवळ घट्ट धरली.
शेवटचंच कोरं पान थरथरलं.
पण केवळ एक टिंब लिहून कविता तिथेच थांबली.
कधीकधी एखादी कविता संपल्यानंतर
तीन तीन टिंबं दिली जात नाहीत.
एकच टिंब!
पूर्णविरामातही कविता उरतेच, पण कदाचित
हे ठाउकच नसतं कवितांना…!
आज म्हणूनच
डायरीचं नवं कोरं चित्र,
कवितेनं ओळखलं!
कॅनव्हासवर विस्कटलेला कलरवॉश आणि त्यावर एकच टिंब…
पूर्णविराम!


