ईश्वराचा शोध घ्यायचा असेल तर, खरोखर आधी संसार सोडावा लागतो का? की संसार समजून घ्यावा लागतो? हा प्रश्न भारतीय किंवा खरेतर जगातील प्रत्येक समाजाला शतकानुशतके पडत आला आहे. ‘चित्रलेखा’ चित्रपटातील ‘संसार से भागे फिरते हो…’ हे गीत याच प्रश्नाला अत्यंत साध्या, पण अस्वस्थ करणाऱ्या शब्दांत आपल्यासमोर ठेवते. म्हणूनच हे गीत केवळ चित्रपटाचा भाग राहत नाही; ते जीवनाकडे पाहण्याची एक दृष्टी बनते.
पहिल्यांदा ऐकताना हे गाणे एखाद्या संन्याशाला उद्देशून गायलेले वाटते, पाहताना तर त्यावर शिक्कामोर्तबही होते. पण पुन्हा पुन्हा ऐकले की लक्षात येते, हा प्रश्न केवळ ‘कुमारगिरीं’ना (अशोक कुमार) विचारलेला नाही. तो आपल्या प्रत्येकाला विचारलेला आहे. आपण आयुष्यात कोणत्या ना कोणत्या गोष्टीपासून पळतच असतो. कधी जबाबदाऱ्यांपासून, नात्यांपासून, स्वतःच्या कमतरतांपासून, कधी वास्तवापासून, तर कधी स्वतःपासूनही! त्या अर्थाने हे गाणे संन्याशावर टीका करत नाही; ते पलायनावर प्रश्न उपस्थित करते.
हा प्रश्न समजून घ्यायचा असेल, तर ‘चित्रलेखा’ची कथा थोडी समजून घ्यावी लागते…
भगवतीचरण वर्मा यांच्या अजरामर कादंबरीवर आधारित या चित्रपटात एक विलक्षण तात्विक संघर्ष उभा राहतो. एका बाजूला आहेत योगी कुमारगिरी. तप, त्याग, वैराग्य आणि इंद्रियनिग्रह यावर त्यांचा नितांत विश्वास आहे. त्यांच्यासाठी संसार म्हणजे मोह, आणि मोह म्हणजे ईश्वरप्राप्तीतील सर्वात मोठा अडथळा. दुसऱ्या बाजूला आहे चित्रलेखा (मीना कुमारी). समाजाच्या दृष्टीने ती एक राजनर्तकी. परंतु तिचे व्यक्तिमत्व केवळ सौंदर्यापुरते मर्यादित नाही. ती विचार करते, प्रश्न विचारते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ती जीवनाला नाकारत नाही.
चित्रपटात एक प्रसंग येतो. चित्रलेखेच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून कुमारगिरी तिला आश्रमात येण्याचे निमंत्रण देतात. हे निमंत्रण आदराचे जितके आहे, तितकेच ते त्यांच्या तपशक्तीवरील आत्मविश्वासाचेही आहे. त्यांना वाटते, एक नर्तकी त्यांच्या वैराग्याला डळमळीत करू शकणार नाही. पण आयुष्याला नेहमीच माणसाचा आत्मविश्वास तपासायला आवडते.
हेही वाचा – पल भर में ये क्या हो गया…
चित्रलेखा आश्रमात येते. ती कोणालाही जिंकण्याचा प्रयत्न करत नाही. मोहिनी घालण्याचाही प्रयत्न करत नाही. ती जशी आहे तशीच राहते. आणि नेमके तेच कुमारगिरींसाठी सर्वात मोठी परीक्षा ठरते. त्यांना जाणवू लागते की, बाहेरच्या जगाचा त्याग करणे सोपे असते; पण मनातल्या इच्छा, आकर्षण, अहंकार आणि अस्वस्थतेचा त्याग करणे तितके सोपे नसते. खरा संघर्ष बाहेर नसतोच, तो आत असतो. याच वैचारिक वातावरणात हे गीत उमलते.
चित्रलेखा समोर उभी राहते आणि विचारते,
“संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे…”
या एका ओळीत साहिर संन्याश्याची खिल्ली उडवत नाही. तो केवळ एक साधा प्रश्न विचारतो. जर हा संसारही त्याच ईश्वराची निर्मिती असेल, तर त्याच्यापासून दूर जाऊन ईश्वर कसा सापडणार? सृष्टीला नाकारून स्रष्ट्यापर्यंत (निर्मात्यापर्यंत – ब्रह्मा) पोहोचण्याचा हा कोणता मार्ग?
भारतीय तत्वज्ञानात हा प्रश्न नवा नाही. उपनिषदे, भगवद्गीता, संत साहित्य, भक्तीपरंपरा, योगमार्ग… प्रत्येकाने याचे उत्तर वेगवेगळ्या प्रकारे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. पण साहिरची खासियत अशी की, तो कोणताही सिद्धांत मांडत नाही, तो कसला उपदेश करत नाही… तो कुणाच्याही श्रद्धेला आव्हान देत नाही. तो केवळ प्रश्न विचारतो. उत्तर आपल्यावर सोडतो!
म्हणूनच पुढे साहिर म्हणतो,
“ये पाप है क्या, ये पुण्य है क्या…”
किती सहज विचारलेला प्रश्न! पण त्याचे उत्तर देणे किती कठीण आहे. पाप आणि पुण्य हे खरोखरच शाश्वत असते का? की समाज, काळ आणि परिस्थिती त्यांचे अर्थ बदलत राहतात? जे एका काळात पाप मानले गेले, ते दुसऱ्या काळात कदाचित धैर्य ठरते… आणि जे एका समाजात पुण्य मानले जाते, ते दुसऱ्या समाजात अर्थहीन असू शकते.
चित्रपटाचाही हाच मुद्दा आहे. माणसाला त्याच्या कृतीवरून न्याय देणे सोपे असते; पण त्या कृतीमागची परिस्थिती समजून घेणे फार कठीण असते.
या गीतातील माझ्या सर्वांत आवडत्या ओळींपैकी एक म्हणजे,
ये भोग भी एक तपस्या है,
तुम त्याग के मारे क्या जानो…
या एका वाक्यात साहिर संपूर्ण आयुष्याचा अर्थ सांगून जातो. आपण तप म्हटले की, डोळ्यासमोर हिमालय, गुहा, ध्यान आणि मौन उभे राहते. पण संसार जगणेही कमी तप नाही. प्रेम करणे, नाती टिकवणे, अपयश स्वीकारणे, मोहांवर नियंत्रण ठेवणे, जबाबदाऱ्या निभावणे, प्रिय व्यक्ती गमावण्याचे दुःख पचवणे, पुन्हा उभे राहणे… हीदेखील एक तपश्चर्याच नाही का?
कदाचित म्हणूनच संत तुकाराम प्रपंच सोडून गेले नाहीत. ज्ञानेश्वरांनी जगाला माया म्हणून नाकारले नाही. भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला रणांगण सोडून हिमालयात जाण्यास सांगत नाहीत. उलट ते म्हणतात, कर्तव्यापासून पळून जाणे हा अध्यात्माचा मार्ग नाही.
साहिरचे गीत याच परंपरेत उभे राहते.
ज्येष्ठ संगीतकार रोशन यांनी या विचारांना ज्या सुरावटीत बांधले आहे, ती सुरावट शब्दांवर कधीच वर्चस्व दाखवत नाही. ती विचारांना साथ देते. लता मंगेशकर यांच्या स्वरात विलक्षण संयम आहे. कुठेही आक्रस्ताळेपणा नाही, उपदेशाचा सूर नाही. जणू चित्रलेखा गात नाही, तर शांतपणे विचार मांडते आहे. पडद्यावर मीना कुमारींच्या डोळ्यांतही विजयाचा आनंद दिसत नाही. कारण, त्या कुमारगिरींना हरवत नाहीत; त्या त्यांच्या मनात एक प्रश्न जागा करतात. कदाचित हेच या गीताचे मोठेपण आहे.
हेही वाचा – घरौंदा… निरंतर आत्मबोधाचा शोध
चित्रलेखा आणि कुमारगिरी यांच्यातील संघर्ष प्रत्यक्षात स्त्री आणि संन्यासी यांच्यातील संघर्ष नाही. तो दोन जीवनदृष्टींमधला संवाद आहे. एक दृष्टी जीवनाला टाळून सत्य शोधते; दुसरी जीवनाला स्वीकारून सत्य शोधते. चित्रपट कोणालाही पूर्णपणे बरोबर किंवा चूक ठरवत नाही. उलट तो सांगतो की, माणूस कितीही मोठा तपस्वी असला, तरी तो माणूसच असतो आणि माणूस म्हणून जगण्यात लाज नाही; त्यापासून पळण्यात मात्र प्रश्न आहे.
आज या गाण्याला साठपेक्षा अधिक वर्षे झाली. पण त्याचे महत्त्व कमी झालेले नाही. आजही आपण अनेकदा बाहेरच्या जगाला दोष देत स्वतःपासून दूर पळतो. शांतता शोधण्यासाठी ठिकाणे बदलतो, माणसे बदलतो, परिस्थिती बदलतो. पण मन मात्र तिथेच राहते. कुमारगिरींची लढाईही हीच होती. ती चित्रलेखेशी नव्हती; ती स्वतःशी होती. म्हणूनच हे गीत संपते, पण त्याचे प्रतिध्वनी मनात उमटत राहतात.
ईश्वराचा शोध नेमका कुठे घ्यायचा? जग सोडून? की जगाला समजून घेत, त्याला स्वीकारत, त्यातले सुख-दुःख समान भावाने जगत? या प्रश्नाचे उत्तर साहिर देत नाही. तो ते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यावर सोपवून जातात… आणि कदाचित म्हणूनच ‘संसार से भागे फिरते हो…’ हे केवळ हिंदी चित्रपटसृष्टीतील एक श्रेष्ठ गीत नाही; तर जगण्याचा अर्थ नव्याने विचारायला लावणारे एक कालातीत तत्वचिंतन आहे.


