सुकी बटाट्याची भाजी उरली तर माझ्या घरी त्याचे आलू पराठे किंवा बटाटेवडे होतात! आलू पराठे करण्याकरता यामध्ये एक-दोन मसाल्यांचा चवीनुसार वापर केला तर या उरलेल्या बटाट्याच्या भाजीचे सुद्धा चवदार पराठे तयार होतात. परंतु आज मी ताजे आलू पराठे आणि बटाटेवडे करण्याची कृती सांगणार आहे.
आलू पराठा
साहित्य
- मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे – पाच ते सहा
- आलं- लसणाची पेस्ट – दोन चमचे
- हिरवी मिरची – चार (बारीक कापलेल्या)
- धणे पावडर – एक चमचा
- जिरे पावडर – एक चमचा
- आमचूर पावडर – अर्धा चमचा
- हळद – एक चमचा
- तिखट – दोन ते अडीच चमचे
- मीठ – चवीनुसार
- कणीक – दोन वाट्या
- मैदा – अर्धी वाटी
- रवा – एक टेबल स्पून
- गरजेनुसार बटर किंवा तेल
- भाजलेले बेसन – एक चमचा
- कोथिंबीर – बारीक चिरलेली मूठभर.
कृती
- प्रथम उकडलेल्या बटाट्याची साले काढून घ्यावीत आणि बटाटा हाताने छान कुस्करून घ्यावा.
- एका कढईत अगदी दोन टेबल स्पून तेल घालून त्यामध्ये हे कुस्करलेले बटाटे थोडे परतून घ्यावेत. जेणेकरून त्यातील अतिरिक्त पाणी निघून जाईल.
- नंतर या कुस्करलेल्या बटाट्यात सर्व मसाले म्हणजेच आले लसणाची पेस्ट, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, एक चमचा तिखट, प्रत्येकी एक चमचा धणे आणि जिरे पावडर, आमचूर पावडर, हळद टाकावी. बारीक चिरलेली मूठभर कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून हे सारण दहा मिनिटे थंड व्हायला ठेवावे.
- तोपर्यंत दोन वाट्या कणीक आणि अर्धा वाटी मैदा, एक टेबल स्पून रवा एकत्र करून त्यात गरजेनुसार मीठ आणि जिरे, ओवा टाकावा.
- नंतर त्यामध्ये कडकडीत तेलाचे मोहन टाकून त्या पीठाचा मऊसर गोळा मळून ठेवावा.
- त्यानंतर थंड झालेल्या बटाट्याच्या सारणाचे गोळे करून ठेवावे.
- कणकेच्या पीठाचे गोळे करून त्याला हातानेच गोल गोल करत मध्यभागी खोलगट ठेवून कडेने दाबत वाटीसारखा आकार द्यावा आणि त्यामध्ये हे बटाट्याचे सारण भरून कडेने दाबत ही पारी बंद करावी.
- नंतर सारण भरलेल्या कणकेच्या गोळ्याला पोळपाटावर ठेवून हलके दाब द्यावा आणि गोल पराठा लाटून तो निर्लेपच्या तव्यावर बटर किंवा तेल सोडून सर्व बाजूंनी खरपूस भाजून घ्यावा.
- हा चमचमीत आलू पराठा गोड दही, पुदीना-कोथिंबीरीची चटणी, टोमॅटो चिली सॅास किंवा आंब्याच्या लोणच्याबरोबर सर्व्ह करावा.
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… दाणेभात अन् ठेचा
बटाटावडा
सारणासाठी साहित्य
- उकडलेले बटाटे : चार मोठे (मॅश केलेले)
- हिरव्या मिरच्या आणि आलं- लसणाची पेस्ट
- भाजलेल्या धणे आणि बडीशेपेची भरडपूड – दोन चमचे
- लाल तिखट – दोन ते तीन चमचे
- मोहरी – अर्धा छोटा चमचा
- कढीपत्ता – 8-10 पाने,
- हळद – पाव छोटा चमचा
- हिंग – पाव छोटा चमचा
- मीठ – चवीनुसार
- बेसन – दोन चमचे
- तेल – एक मोठा चमचा (फोडणीसाठी)
- कोथिंबीर – एक छोटी वाटी (बारीक चिरलेली)
- अर्ध्या लिंबाचा रस किंवा एक चमचा आमचूर पावडर (ऐच्छिक)
पीठाच्या घोळाकरिता साहित्य
- बेसन – एक कप
- हळद – पाव छोटा चमचा
- लाल तिखट – पाव छोटा चमचा
- खाण्याचा सोडा – पाव छोटा चमचा (ऐच्छिक)
- मीठ – चवीनुसार
- पाणी – आवश्यकतेनुसार (घट्टसर पीठ भिजवण्यासाठी)
- तेल – तळणासाठी
कृती
- एका कढईत एक मोठा चमचा तेल गरम करा. तेल तापल्यावर त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडली की, त्यात हिंग आणि कढीपत्ता टाका. त्यानंतर आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालून काही सेकंद परता.
- आता त्यात हळद आणि तिखट, बडीशेप आणि धण्याची भरड घालून मिक्स करा आणि लगेच मॅश केलेले बटाटे टाका.
- चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून सर्व मिश्रण चांगले एकजीव करा आणि दोन-तीन मिनिटे मंद आचेवर परता.
- यानंतर यात दोन चमचे भाजलेले बेसन टाकून सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्या आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या.
- त्यानंतर त्याचे छोटे-छोटे मध्यम आकाराचे गोळे तयार करून ठेवा.
- एका बाऊलमध्ये बेसन, हळद, लाल तिखट, सोडा आणि मीठ एकत्र करा. त्यात थोडे-थोडे पाणी घालत घट्टसर पीठ भिजवून घ्या. बेसनात सोडा वापरायचा नसेल तर कडकडीत तेलाचे मोहन घाला.
- लक्षात असू द्या की, हे पीठ जास्त पातळ नसावे, ते थोडे घट्टसरच भिजवावे जेणेकरून ते बटाट्याच्या गोळ्यांना व्यवस्थित चिकटेल.
- मध्यम आचेवर कढईत तेल चांगले गरम करा.
- आता तयार केलेले बटाट्याचे गोळे बेसनाच्या पिठात नीट बुडवून घ्या, जेणेकरून त्यावर पिठाचा पूर्ण थर येईल आणि हे गोळे गरम तेलात हळूवार सोडा.
- सोनेरी रंग येईपर्यंत ते व्यवस्थित तळून घ्या.
- तळलेले वडे पेपर नॅपकिनवर काढा, त्यामुळे अतिरिक्त तेल निघून जाईल.
- गरमागरम बटाटावडा पुदिना चटणी, चिंच-खजुराची चटणी किंवा तळलेल्या हिरव्या मिरच्यांसोबत सर्व्ह करा.
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… तुरीच्या उसळीतील दिवसे!
टीप्स
- आवडत असल्यास अर्ध्या लिंबाचा रस किंवा एक चमचा आमचूर पावडर टाका,
- हा वडा तुम्ही पावासोबत खाऊन घरच्या घरी ‘वडापाव’चा आनंदही घेऊ शकता!
- प्रत्येक शहरानुसार किंवा गावानुसार या वड्याची चव बदलत जाते.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


