पूर्वार्ध
सकाळी नेहमीप्रमाणे मी व्हॉट्सॲप मेसेज चेक करत बसलो होतो आणि श्रीनिवासचा मेसेज दिसला… त्याने लिहिले होते की,
‘Guruji, I have not missed the Bus. Will both meet you soon.’
सकाळी सकाळी हा मेसेज वाचून मला आश्चर्याचा धक्काच बसला आणि पठ्ठ्याने अखेर बाजी मारली याचा आनंद देखील वाटला. आमच्या Business Square या टोलेजंग इमारतीतील सर्वच्या सर्व म्हणजे 20 मजल्यावर विविध कंपन्यांची कार्यालये होती, जी अहोरात्र चालू असायची. तिथे काम करणाऱ्यांसाठी तळमजल्यावर एक भलं मोठं कॉफी शॉप होतं. तिथेच साधारण वर्षभरापूर्वी माझी आणि श्रीनिवासची ओळख झाली होती. नंतर वरचेवर आम्ही भेटत गेलो आणि आमच्यातील वयाचे अंतर बाजूला ठेवून आम्ही छानपैकी मित्र झालो.
श्रीनिवास मुळचा चेन्नईचा. अतिशय हुशार आणि तल्लख बुद्धीचा मुलगा. संगणकीय क्षेत्रात एका नावाजलेल्या कंपनीत लहान वयातच मोठ्या हुद्द्यावर काम करणारा. त्याच्या कंपनीला एका आंतरराष्ट्रीय कंपनीकडून खूप मोठे कंत्राट मिळाले होते आणि त्या सर्व कामावर लक्ष देण्यासाठी त्याची मुंबईत बदली करण्यात आली होती. कंपनीकडून त्याच्या राहण्याची आणि जेवणाखाण्याची सोय करण्यात आली होती…
एकदिवस कॉफी शॉपमध्ये श्रीनिवासने त्याच्या कंपनीत काम करणाऱ्या एका मराठी मुलीबद्दल मला भावूक होऊन काही गोष्टी सांगितल्या आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. ‘साहेब’ चक्क प्रेमात पडले होते, पण ते व्यक्त कसं करायचं, ते साहेबांना समजत नव्हते. याबाबत पुढे कसं काय करायचे, याबद्दल त्याला मार्गदर्शन हवे होते. मला वडा सांबार आणि वडापाव यांना एकत्र आणायचे होते!
हेही वाचा – गुलामगिरीच्या जोखडात अडकलेले…
झालं, मी शिक्षक आणि तो विद्यार्थी, अशी आमची प्रेमाची शाळा सुरू झाली. त्याला आवडणाऱ्या मुलीचा स्वभाव, आवडीनिवडी अशा विविध गोष्टींची माहिती मी त्याला काढायला सांगितली. त्याने दिलेल्या माहितीनुसार मी त्याला मार्गदर्शन करायला लागलो. श्रीनिवास मनमोकळेपणाने बोलायला खूप घाबरायचा सुरुवातीला… पण हळूहळू का होईना सहा महिन्यांच्या माझ्या कठोर परिश्रमातून तो बऱ्यापैकी न घाबरता व्यक्त व्हायला लागला. आठवड्यातून एकदा भेटून तो त्याची प्रगती मला सांगायचा. एकूणच काय गाडी बऱ्यापैकी रूळावर येत असतानाच त्याच्या प्रेमकहाणीमध्ये एका खलनायकाचा प्रवेश झाला आणि श्रीनिवास मूळापासून हादरला. त्या मुलीच्या घरी तिच्या आईवडिलांनी तिच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केली होती.
आता शेवटच्या टप्प्यात आली होती त्याची प्रेमकहाणी… मी त्या दोघांना तिच्या घरी जाऊन सगळ्या परिस्थितीची कल्पना द्यायला सुचवले. सुदैवाने, मुलगी तिच्या निर्णयावर ठाम होती. त्यामुळे विशेष त्रास होणार नाही, असे मला सुरुवातीला वाटले होते. पण कहाणीला अचानक कलाटणी मिळाली. कारण, मुलीच्या आईवडिलांनी श्रीनिवासला निव्वळ मद्रासी म्हणून नापसंत केले. आता तर जीवनमरणाचा प्रश्न उभा राहिला होता. त्याही परिस्थितीत मी श्रीनिवासची मानसिक स्थिती सांभाळली. एक मद्रासी आहे ही गोष्ट वगळता श्रीनिवासच्या बाबतीत नाही म्हणण्यासारखे खरं म्हणजे काहीच नव्हते. अत्यंत देखणा, सुस्वभावी, सुसंस्कृत मुलगा होता तो. त्याचे आईवडील उच्च शिक्षित होते. चेन्नईमध्ये स्वतःचा बंगला होता. त्यांच्या समाजात त्या कुटुंबाला मानाचे स्थान होते. खरंतर, आजकालच्या जमान्यात मुलीच्या आईवडिलांना आणखी काय हवं असतं. मुलीच्या सुखाचा विचार करून त्यांनी खरं म्हणजे श्रीनिवासला जावई म्हणून स्विकारायला हरकत नव्हती.
पण मग सगळं सुरळीत पार पडलं तर, मग ती प्रेमकथा कसली? आईवडील आणि मुलगी आपापल्या मतांवर ठाम होते आणि तिढा दिवसेंदिवस वाढत चालला होता. मी देखील श्रीनिवाससोबत मुलीच्या आईवडिलांना भेटून त्यांचे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्यांनी हा प्रश्न विनाकारण प्रतिष्ठेचा बनवून ठेवला होता. त्यांचा नकार कायम होता.
हेही वाचा – मानसिक आधार देणारा सलाइनचा स्टँड!
गेले सहा महिने ही कोंडी काही सुटण्याची चिन्हे दिसत नव्हती आणि त्यामुळे मी आतल्या आत खूप दुःखी झालो होतो. माझी तळमळ श्रीनिवासला समजत होती. इतकं होऊनही तो निरंतर आशावादी होता.
असेच दिवस चाललेले असताना श्रीनिवासच्या काल रात्री आलेल्या मेसेजमुळे मी आनंदी झालो. मी न राहवून सकाळी सकाळी त्याला फोन केला आणि त्याचं अभिनंदन केले. क्षणभर त्याला काही बोलताच येईना. पण नंतर स्वतःला सावरून घेत तो म्हणाला…
“Guruji, All this is because of You. Will both meet you soon to tell you how this miracle has happened. Need Your Blessings for my onward journey.”
लग्नाच्या गाठी देव स्वर्गात बांधतो हे जे काही म्हणतात ते खोटं नाही हे श्रीनिवासकडे बघून मला मनोमन पटले. मी त्या दोघांची आतुरतेने वाट बघतोय आता. तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या श्रीनिवासमागे असेल याची मला खात्री आहे… शेवटी वडा सांबार आणि वडा पाव एकत्र येऊन सांबार वडा तयार होणार, यासारखी आणखी आनंदाची गोष्ट कोणती माझ्या आयुष्यात?
क्रमश:


