दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 11 एप्रिल 2026; वार : शनिवार
- भारतीय सौर : 21 चैत्र शके 1948; तिथि : नवमी 24:37; नक्षत्र : उत्तराषाढा 13:38;
- योग : सिद्ध 18:37; करण : तैतिल 12:00;
- सूर्य : मीन; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:26; सूर्यास्त : 18:54;
- पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिन विशेष
प्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी
टीम अवांतर
प्रख्यात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा जन्म 11 एप्रिल 1951 रोजी पुणे येथे झाला. रिचर्ड ॲटेनबरो यांनी निर्मिलेल्या गांधी (1982) या चित्रपटातील कस्तुरबांच्या भूमिकेमुळे त्यांना चित्रपटजगतात ख्याती मिळाली. त्यांनी सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून बी.एस्सी. ही पदवी संपादन केली. त्यानंतर नवी दिल्ली येथील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ येथे त्यांनी तीन वर्षांचे अभिनय प्रशिक्षण घेतले. भरतनाट्यम् नृत्य व कथ्थक या अभिजात भारतीय नृत्यप्रकारांचे सुरेंद्र वडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रशिक्षण घेतले.
रोहिणी हट्टंगडी यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मराठी रंगभूमीवर झाली. रामदास भटकळ यांनी कस्तुरबा गांधी यांच्या जीवनावर आधारित लिहिलेल्या जगदंबा या नाटकाच्या एकपात्री प्रयोगात रोहिणीताईंनी कस्तुरबांची केलेली भूमिका लक्षणीय होती. पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित खंडोबाचं लगीन या नाटकातील त्यांची मुरळीची भूमिकाही लक्षवेधी ठरली. व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी कस्तुरीमृग, लपंडाव, लफडासदन, डंख, मित्राची गोष्ट, रथचक्र आदी नाटकांतून महत्त्वाच्या भूमिका केल्या.
हेही वाच – हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!
त्यांनी विविध भाषांमधील नाट्यप्रयोगांमध्ये निरनिराळ्या भूमिका केल्या. त्यात प्रेमचंद यांच्या गोदान (१९३६) या कादंबरीवर आधारित होरी या नाटकातील ‘धनिया’; कर्नाटकातील यक्षगान या लोकनाट्यातील भीष्मविजयमधील ‘अंबा’; इबारगी या जपानी काबुकी पद्धतीच्या नाटकातील ‘मावशी’; अंधायुगमधील ‘गांधारी’ इत्यादी त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. एका म्हाताऱ्याचा खून या नाटकाचे त्यांनी दिग्दर्शन केले. जपानी काबुकी नाट्यप्रकारामध्ये काम करणाऱ्या त्या पहिल्या आशियाई महिला होत.
रोहिणीताईंचा विवाह 28 मे 1977 रोजी प्रसिद्ध दिग्दर्शक जयदेव हट्टंगडी यांच्याबरोबर झाला. त्यांना एक मुलगा असून त्याचे नाव असीम आहे. जयदेव आणि रोहिणी हट्टंगडी यांनी प्रयोगशील नाटके सादर करण्यासाठी मुंबई येथे ‘कलाश्रय’ ही संस्था काढली.
रोहिणी हट्टंगडी यांनी पुढे हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. अरविंद देसाई की अजीब दास्तान, चक्र, अर्थ, सारांश, अग्निपथ इत्यादी. चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. दाक्षिणात्य भाषेतील अनेक चित्रपट त्यांनी केले. छोट्या पडद्यावरील ‘चार दिवस सासूचे’ ही मालिका गाजली. शिवाय, ‘होणार सून मी ह्या घरची’ ह्या मालिकेतील त्यांची भूमिकाही लोकप्रिय झाली.
त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. राज्य-नाट्यस्पर्धेमध्ये चार वेळा प्रमाणपत्र, रौप्यपदक असे अभिनयाचे पुरस्कार; कस्तुरीमृग या व्यावसायिक नाटकातील भूमिकेकरिता सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा नाट्यदर्पण पुरस्कार, अर्थ आणि अग्निपथ या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचे फिल्मफेअर अवॉर्ड; पार्टी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार; संगीत नाटक अकादमी अवॉर्ड; विष्णुदास भावे पुरस्कार असे विविध सन्मान त्यांना प्राप्त झाले. त्यांचा गांधी हा चित्रपट ऑस्करसाठी निवडला गेला. या चित्रपटातील कस्तुरबांच्या भूमिकेसाठी ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्सतर्फे त्यांना सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
आजचे राशीभविष्य
मेष – काम करण्याच्या पद्धतीत बदल केले आणि सुव्यवस्थितपणे आखणी केली, तर कामे अधिक वेगाने पूर्ण करता येतील. कोणाशी वाद झाला तरी रागावर नियंत्रण ठेवा. काही जातकांच्या संदर्भात प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते, पण त्यातूनही बाहेर पडाल. अनुभवी आणि जाणकार व्यक्तीच्या मदतीने संततीच्या करिअरसंबंधी समस्या सोडवू शकाल.
वृषभ – कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य असेल. कौटुंबिक सुसंवादी वातावरण टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही उचललेले पाऊल प्रभावी ठरेल. कुटुंबातील प्रत्येकजण एकमेकांच्या भावना समजून घेईल. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर वेळ वाया घालवू नये. व्यावसायिकांना थोडासा निष्काळजीपणासुद्धा पश्चात्ताप करण्यास कारणीभूत ठरू शकतो.
मिथुन – उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कार्यालयीन काम नेहमीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे होईल. व्यवसायातील जोडीदार तुमचे भरभरून कौतुक करतील. वडिलोपार्जित मालमत्तेतून तुमचा वाटा मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे संपत्तीत वाढ होईल. तथापि, खर्चही नियंत्रणात ठेवा.
कर्क – तुमच्या इच्छा पूर्ण होतील. व्यवसायानिमित्त परदेश प्रवास करावा लागू शकतो, जो खूप फायदेशीर ठरेल. कार्यालयात जबाबदारीचे काम मिळण्याची शक्यता आहे, जे पूर्ण केल्यास भविष्यात त्यांचा फायदा होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील; त्यांना ग्राफिक डिझाइन शिकण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती स्थिर असेल.
सिंह – व्यावहारिक दृष्टिकोन ठेवल्यास, तुमच्या संतुलित वृत्तीचा फायदा होईल. तुम्ही काही वेळ एकांतात किंवा धार्मिक स्थळी घालवाल. तुमच्या भविष्यकालीन योजनांना घरातील वडिलधाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. आज तुम्हाला कसली तरी भीती वाटू शकते, पण काळजी करण्याची गरज नाही; हे कदाचित जास्त विचार करण्यामुळे असू शकते.
कन्या – कामाच्या ठिकाणी इतर कर्मचाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवल्याने त्यांची कार्यक्षमता सुधारेल. तर, तुमचे काम वेळेच्या आधीच पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभातही वाढ होईल. घरात सुखद आणि सकारात्मक वातावरण राहील. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. नवीन ओळखी होतील, त्याचा भविष्यात फायदा होईल.
तुळ – आर्थिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल. भूतकाळातील चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, याची खात्री करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. करिअर प्रगतीपथावर राहील. स्वतःला नवीन जबाबदाऱ्यांसाठी तयार कराल. क्षमतेनुसार, तुम्हाला आज महत्त्वपूर्ण संधी देखील मिळू शकते. जशी तुमची क्षमता वाढेल, तशा संधीही वाढतील.
वृश्चिक – जवळच्या व्यक्तीसोबत कामासंदर्भात असलेला गैरसमज दूर होईल. ज्या गोष्टींमध्ये सर्वाधिक रस आहे, त्यावर लक्ष केंद्रित केल्याने आनंद मिळेल. नवीन लोकांच्या संपर्कात याल आणि त्यांच्याकडून काहीतरी नवीन शिकायला मिळेल. भावनांच्या आहारी न जाता तुम्ही हुशारीने वागल्यास, परिस्थिती तुमच्या बाजूने असेल.
हेही वाचा – आराध्या तन्वीसह मोठ्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी गेली खरी…
धनु – आजचा दिवस कुटुंबासाठी एखादी आनंदाची बातमी घेऊन येणारा असेल. आजचा संपूर्ण दिवस तुम्ही कुटुंबासोबत घालवाल. इतरांना प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल. आजूबाजूचे काही लोक तुमच्या निर्णयांना विरोध करू शकतात. अशावेळी रागावर मात्र नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. आर्थिक स्थिती स्थिर राहील.
मकर – कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतील. संततीकडून एखादी चांगली बातमी मिळेल. आज व्यवसायाच्या दृष्टीने नवीन कल्पना सुचतील. नवीन लोकांना भेटणे आणि त्यांच्याशी बोलणे फायदेशीर ठरेल. एखाद्या समस्येवर तोडगा निघाल्याने दिलासा मिळेल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. जोडीदारासोबत रात्रीच्या जेवणासाठी बाहेर जाल, ज्यामुळे नात्यातील गोडवा वाढेल.
कुंभ – कार्यालयीन सहकारी तुम्हाला सहकार्य करतील, त्यामुळे तुमची कामे लवकर पूर्ण होतील. पुढील काही दिवसांत तुम्हाला मदत करणारी व्यक्ती भेटेल, ज्यामुळे तुमची नियोजित कामे सहजपणे पूर्ण होतील. कोणत्याही गोष्टीवर घाईने प्रतिक्रिया देऊ नका. आधी परिस्थिती समजून घ्या आणि मग विचारपूर्वक आपले मत मांडा. यामुळे लोकांमध्ये तुमचे महत्त्व वाढेल.
मीन – आज दिवसाची सुरुवात नव्या उत्साहाने होईल. घरातील कामे पूर्ण करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल. मित्रांसोबत वैयक्तिक समस्या शेअर करणे टाळा. काही लोकांच्या चुकीच्या बोलण्यामुळे तुमचा मानसिक त्रास वाढू शकतो, मात्र कालांतराने परिस्थिती सुधारेल. कुटुंबात सलोखा टिकवून ठेवण्यात यशस्वी व्हाल.


