माधवी जोशी माहुलकर
पुंडलिकाने आर्ततेने विठ्ठलाला साद घातली अन् विठ्ठल रुक्मिणीला काहीही न सांगता, तिला न भेटता नेहमीप्रमाणे तरातरा चालत गेला त्याला भेटायला! खरंतर, विठ्ठल हे श्रीकृष्णाचे रुप! द्वारकेतून श्रीकृष्णावर रुसून रुक्मिणी दिंडीरवनात म्हणजेच पंढरपूरात येऊन राहिली… तिचा रुसवा काढण्यासाठी विठ्ठलाचे रूप असलेला श्रीकृष्ण पंढरपूरला आला होता. पण तिचा रुसवा काढण्यापेक्षा त्याला त्याच्या परम भक्ताला पुंडलिकाला भेटणे महत्त्वाचे वाटले. आपल्याला भेटायला आलेला आपला नवरा कुठे दिसेना म्हणून तीपण निघाली त्याला शोधायला… मनाशीच तिने अटकळ बांधली की, आपला नवरा नक्की पंढरपूरात पुंडलिकाच्या घरी गेला असणार! कारण, पुंडलिकाच्या विठ्ठल भक्तीच्या कहाण्या तीपण रोज ऐकत होतीच. त्याने विठू दर्शनाचा जणू ध्यासच घेतला होता.
विठ्ठलाची सवय रुक्मिणीला चांगलीच माहीत होती. त्याला त्याच्या कुठल्याही भक्ताने व्याकुळ होऊन हाका मारल्या की, स्वारी कासावीस होऊन त्याच्या भेटीला जाणारच, हे तिला पक्कं ठाऊक होतं! भक्तांच्या हाकेला धावून जाणार नाही, तो विठ्ठल कसला? तिचा अंदाज अगदी अचूक होता. तिचे ते सावळे ध्यान पुंडलिकाच्या दरवाज्याजवळ पुंडलिक बाहेर येण्याची वाट पाहात उभे होते, परंतु पुंडलिक आपल्या म्हाताऱ्या मायबापाची सेवा करण्यात इतका मग्न होता की, त्याचे आराध्यदैवत प्रत्यक्ष विठ्ठल त्याला भेटण्याकरिता त्याच्या दारी आले होते, हेपण त्याच्या ध्यानीमनी नव्हते! त्या वेळेस विठ्ठलाचे नाम जरी सतत त्याच्या मुखी होते तरी, अचानक प्रगटलेल्या विठ्ठलाकडे पाहण्याची फुरसत पुंडलिकाला नव्हती. हे दृश्य पाहून रुक्मिणीला जरा रागच आला. तिचा पांडुरंगच तिथे ताटकळत उभा होता आणि त्याला सोबत घेऊन गेल्याशिवाय तिला चैन पडणार नव्हते… म्हणून मग तीपण तिथेच नाईलाजाने विठ्ठलाच्या शेजारी, पण जरा अंतर राखून उभी राहिली.
हेही वाचा – नागपूरची प्रसिद्ध काळी पिवळी मारबत!
पांडुरंगाने पुंडलिकाच्या दाराजवळ प्रवेश करताच एका दिव्य आभामंडलाने त्याचे घर व्यापून गेले होते, पुंडलिकाचे नाव पुकारून आपण त्याच्या दारात उभे असल्याची वर्दी विठ्ठलाने त्याला दिली, प्रत्यक्ष ते सगुण रूप दारात उभे पाहून पुंडलिकाच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहायला लागले… पण त्या वेळेस त्याचे म्हातारे आई-वडील झोपी गेले होते आणि पुंडलिक त्यांचे पाय दाबत त्यांची सेवा करत होता. पुंडलिकाची द्विधा मन:स्थिती झाली होती. विठुरायाची गळाभेट घ्यायला उठावे म्हटलं तर, आई-बाबांची झोप मोडून त्यांच्या सेवेत खंड पडेल आणि दारात उभ्या असलेल्या परब्रम्हाचे स्वागत केले नाही तर, तो देव नाराज होऊन निघून जाईल या विचारांनी पुंडलिक अस्वस्थ झाला. काय करू आणि काय नको? या अवस्थेत असतानाच त्याने विठ्ठलाला “तू आहे तिथेच उभा रहा, आई-बाबांची झोप पूर्ण झाली की, मी बाहेर येतोच!” असे सांगितले आणि देवाच्या पायाला माती लागू नये म्हणून पुंडलीकाने घरातील एक वीट विठ्ठलला उभे राहण्याकरिता दिली. तर, आपल्या मागे मागे आलेल्या आणि बाजूला उभ्या असलेल्या रुक्मिणीकरिताही विठ्ठलाने पुंडलिकाकडे आणखी एक वीट मागितली आणि ती दुसरी वीट हळूच तिच्याकडे सरकवली. त्याची ही कृती पाहून रुक्मिणीने रागाने नाक मुरडले खरे, पण विठ्ठलाचे हे नेहमीचेच! असे तऱ्हेवाईक वागणे तिच्या अंगवळणी पडले होते. रागावलेल्या रुखमाईने विठ्ठलाचे मन राखत ती वीट निमूटपणे आपल्या पायाखाली सरकवली. कारण, आज काहीही करून तिला विठ्ठलाला मोकळे सोडायचे नव्हते. तिला तसे कमरेवर हात ठेवून विटेवर उभे राहताना पाहून विठ्ठलाच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य पसरले…
विठ्ठलाला हे माहीत होतं की, त्याची रुक्मिणी सतत त्याच्या सोबत राहणारी, कधीच पाठ न सोडणारी त्याची सावली आहे. त्यालादेखील तिच्याशिवाय कुठे करमायचं? जितका वेळ आपण पुंडलिकाचे दारात उभे राहू तितका वेळ रुक्मिणीपण तिथेच तिष्ठत उभी राहणार, हे विठ्ठलाला पक्के ठाऊक होतं. सावली कधी शरीराची साथ सोडते होय?
त्या दोघांना उभे रहायला विटा देऊन पुंडलिक मात्र आई-वडिलांच्या सेवेत इतका गुंतला की, बाहेर प्रत्यक्ष परब्रम्ह सपत्नीक उभे ठाकले आहे, याचाही त्याला विसर पडला. परंतु “पुंडलिका भेटी परब्रम्ह आले” याची वार्ता गावोगावी, कानोकानी विठ्ठलाच्या भक्तजनांपर्यंत पोहचली आणि मग काय आपल्या लाडक्या कान्होबाच्या दर्शनाला, त्याला याची देही याची डोळा पाहायला गावोगावची भक्तांची मांदियाळी वाळवंटी जमा होऊ लागली. दिंड्या पताका हाती झेंडे घेतलेल्या त्या गोतावळ्यात तेव्हापासून विठ्ठल असा काही अडकला, त्याच्या भोळ्याभाबड्या भक्तीरसात असा काही रंगला की, त्याला कशाचेच भान राहीले नाही… आपण कसल्या कामाकरिता इथे आलो होतो, हेही तो विसरला! आपल्या बाजूला रखुमाईपण आहे, हेसुद्धा त्याच्या लक्षात राहिले नाही. आपल्या भक्तांमध्ये कायम स्वरुपी राहण्याकरिता आणि त्यांचा सहवास मिळण्याकरिता पुंडलिकाच्या घरात त्याने दिलेल्या विटेवरच तो प्रगट होऊन राहिला.
हेही वाचा – थंडी अन् विदर्भातील रोडगे पार्टी!
आजही तो पांडुरंग पुंडलिकाच्या त्याच विटेवर कमरेवर हात ठेवून आपल्या भक्तांची काळजी घेत उभा आहे आणि त्याच्यासोबत रुक्मिणीपण त्याच्यावर थोडी रुसलेली का असेना, परंतु आता विठ्ठल आपल्या जवळच राहणार या भावनेने सुखावून जात, त्याच्या भक्तांना सांभाळण्याचे आपले आद्यकर्तव्य बजावत तिथेच त्याच्या बाजूला, पण थोडी लांब उभी आहे. विठ्ठल रुक्मिणीला चांगलाच ओळखून होता. तिने कितीही त्रागा केला, राग व्यक्त केला तरी, ती विठ्ठलाच्या प्रत्येक कृतीत सामील असायची. विठ्ठलाची सोबत तिलाही सतत हवी असायची. त्यामुळे आपण जिथे जाऊ, तिथे ही सोबत राहणार, हे त्याला पक्कं माहीत होतं. तिच्या सोबतीनेच तो जगदोद्धाराचा हा भार पेलू शकत होता आणि त्याने मांडलेला पसारा आवरण्यातच रुक्मिणी धन्यता मानत होती… त्याला या कामात ती नेहमीच मदत करणार होती. या विश्वासावरच ती आपल्या सावळ्याची सावली बनून त्याच्यासारखीच कमरेवर हात ठेवून भीमेकाठी आजही उभी आहे.
तिला विठ्ठलाचा अभिमानही आहे की, त्याच्या या काळ्यासावळ्या रूपाने भल्याभल्यांना मोहीत केले आहे. तो भूतलावरील दीनांचा नाथ आहे. तो तिथे शंख, चक्र, गदा, पद्म घेऊन उभा नाहीये तर, तो निःशस्त्र होऊन त्याच्या भक्तांकरिता त्यांची माऊली म्हणून उभा ठाकला आहे. त्याचे ज्ञानोबा, नामा, तुकोबा, मुक्ताई, जनाई, गोरोबा, चोखोबा, एकनाथासारख्या लेकरांना तो एकटा सोडून जाऊ शकत नाही. तो लेकुरवाळा आहे… त्या सर्वांच्या विश्वासामुळे आणि भक्तीमुळे विठ्ठल स्वतःच आजतागायत त्याच्या लेकरांच्या मोहपाशात इतका अडकून पडला की, काही केल्या पंढरपुरातून त्याचा पायच निघत नाही आणि त्यामुळे त्याने वाळवंटी मांडलेल्या या खेळाचा पसारा काही कमी होत नाही… हा भवतापाचा पसारा आवरायचा म्हणून सावळ्याची सावली बनून राहिलेली रुक्मिणीपण त्याची पाठ काही सोडत नाही!
विठ्ठल । विठ्ठल । विठ्ठल ।


