आरेन
यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाची सुरुवात निराशाजनक झाली आहे. सलामीला मुंबई इंडियन्सने नमवल्यानंतर, दुसऱ्या सामन्यात त्यांना सनरायझर्स हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला होता. यानंतर, या संघाच्या कामगिरीवर सातत्याने टीका होतच आहे, परंतु कर्णधार अजिंक्य रहाणेही सर्वांचा टार्गेट बनला आहे. स्वत: रहाणेने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ‘एक विशिष्ट अजेंडा ठेवल्याप्रमाणे माझ्यावर टीका केला जात आहे,’ असे त्याचे म्हणणे आहे.
‘आयपीएल’मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून 65 धावांनी झालेल्या दारुण पराभवानंतर रहाणेच्या स्ट्राइक रेटवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत. 227 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताचा संघ 16 षटकांत 161 धावांवर गारद झाला. या हंगामातील त्यांचा हा सलग दुसरा पराभव आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणेवर वेगात धावा करत नसल्याबद्दल टीका होत आहे. गुरुवारी झालेल्या या सामन्यात 10 चेंडूंत केवळ 8 धावा करणाऱ्या कोलकाताच्या या कर्णधाराने टीकाकारांचा खरपूस समाचार घेतला. या चर्चेमागे एक विशिष्ट अजेंडा आणि मत्सराची भावना असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा – युवराजने मागितली धोनी, कपिल देव यांची माफी; नेमकं काय घडलं?
रहाणे म्हणाला, “मला वाटते की, 2020पासून आतापर्यंत माझा स्ट्राइक रेट सर्वोत्तम राहिला आहे. जे लोक माझ्याबद्दल बोलत आहेत, ते कदाचित सामने पाहत नाहीत किंवा त्यांच्या मनात माझ्याविरुद्ध काही विशिष्ट अजेंडा आहे.” सध्या भारतीय संघातून बाहेर असलेल्या या खेळाडूने सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत मुंबईकडून खेळताना 10 डावांत 161.57च्या स्ट्राइक रेटने 391 धावा केल्या होत्या. गेल्या वर्षी अजिंक्य रहाणेने कोलकाता संघाकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. असे असले तरी, मधल्या षटकांमध्ये अपेक्षित वेगाने धावा करण्यात रहाणेला अपयश आले आहे.
सलग दोन पराभवामुळे कोलकाता संघ आता दडपणाखाली आला आहे. त्यांना आता सलग काही सामने घरच्या मैदानावर खेळायचे आहे. कोलकाता आता 6 एप्रिलला पंजाब किंग्जविरूद्ध खेळणार असून त्यानंतर 9 एप्रिलला लखनऊ सुपरजायंट्स संघाविरूद्ध भिडेल. हे दोन्ही सामने जिंकून संघाची गाडी विजयी मार्गावर आणण्याचे आव्हान कर्णधार रहाणेपुढे आहे. यानंतर कोलकाता संघ 14 एप्रिलला चेन्नई येथे चेन्नई सुपरकिंग्ज संघाविरूद्ध खेळेल.
हेही वाचा – सूर्यनमस्कार अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य


