सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय दहावा
सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन । अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥32॥ अक्षराणामकारोSस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च । अहमेवाक्षयः कालो धाताSहं विश्वतोमुखः ॥33॥
जैसी अवघींचि नक्षत्रें वेंचावीं । ऐसी चाड उपजेल जैं जीवीं । तैं गगनाची बांधावी । लोथ जेवीं ॥259॥ कां पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा । तरि भूगोलुचि काखे सुवावा । तैसा विस्तारु माझा पहावा । तरि जाणावें मातें ॥260॥ जैसें शाखांसी फूल फळ । एकिहेळां वेटाळूं म्हणिजे सकळ । तरी उपडुनियां मूळ । जेवीं हातीं घेपे ॥261॥ तेवीं माझे विभूतिविशेष । जरी जाणों पाहिजेती अशेष । तरी स्वरूप एक निर्दोष । जाणिजे माझें ॥262॥ एऱ्हवीं वेगळालिया विभूती । कायिएक परिससी किती । म्हणोनि एकिहेळां महामती । सर्व मी जाण ॥263॥ मी आघवियेचि सृष्टी । आदिमध्यांतीं किरीटी । ओतप्रोत पटीं । तंतु जेवीं ॥264॥ ऐसिया व्यापका मातें जैं जाणावें । तैं विभूतिभेदें काय करावें । परि हे तुझी योग्यता नव्हे । म्हणोनि असो ॥265॥ कां जे तुवां पुसिलिया विभूती । म्हणोनि तिया आईक सुभद्रापती । तरी आतां विद्यांमाजीं प्रस्तुती । अध्यात्मविद्या ते मी ॥266॥ अगा बोलतयांचिया ठायीं । वादु तो मी पाहीं । जो सकलशास्त्रसंमतें कहीं । सरेचिना ॥267॥ जो निर्वचूं जातां वाढे । आइकिलियां उत्प्रेक्षे सळु चढे । जयावरी बोलतयांचीं गोडें । बोलणीं होती ॥268॥ ऐसा प्रतिपादनामाजीं वादु । तो मी म्हणे गोविंदु । अक्षरांआंतु विशदु । अकारु तो मी ॥269॥
हेही वाचा – Dnyaneshwari : ययां नरांमाजीं राजा, तो विभूतिविशेष माझा…
अर्थ
हे अर्जुना, सर्व सृष्ट वस्तूंचा आदि, अंत तसाच मध्य मी आहे. विद्यांमध्ये अध्यात्मविद्या मी आहे आणि वादविवाद करणारांचा वाद मी आहे. ॥32॥ अक्षरांमध्ये अकार मी आहे आणि समासांमध्ये द्वंद्वसमास मी आहे. क्षयरहित काल मी आहे. सर्व जगाला उत्पन्न करणारा विश्वमुखी पुरुष मी आहे. ॥33॥
आकाशातील एकूण एक नक्षत्रे टिपून घ्यावीत, अशी ज्या वेळेला अंत:करणात इच्छा उत्पन्न होईल, त्यावेळेला आकाशाचेच गाठोडे बांधणे ज्याप्रमाणे बरे, ॥259॥ किंवा पृथ्वीच्या परमाणूंची मोजदाद करावी, अशी जर इच्छा असेल तर, ही सर्व पृथ्वीच बगलेत घालावी, त्याप्रमाणे माझी व्याप्ती जर पाहावयाची असेल तर, माझेच ज्ञान करून घ्यावे. ॥260॥ फांद्यांसकट फुले आणि फळे ही सर्व एका वेळेतच हस्तगत व्हावी, असे जर मनात असेल, तर जसे त्या झाडाचे एक मूळ उपटून हातात घेतले पाहिजे, ॥261॥ त्याप्रमाणे माझ्या मुख्य मुख्य विभूती जर सर्वच जाणण्याची इच्छा असेल तर, एक माझेच दोषरहित स्वरूप जाणावे. ॥262॥ एरवी वेगवेगळ्या विभूती तू किती ऐकणार? म्हणून बुद्धिमान अर्जुना, एकदाच समज की, हे सर्व मी आहे. ॥263॥ ज्याप्रमाणे वस्त्रांमध्ये आडवे उभे एक सूतच भरलेले असते, त्याप्रमाणे या सर्व जगाच्या आरंभी, मधे आणि शेवटी अर्जुना, मीच सर्व भरलेला आहे. ॥264॥ अशा सर्वव्यापक असलेल्या मला जाणले असता, मग वेगवेगळ्या विभूती सांगून काय करावयाच्या आहेत? परंतु एवढी तुझी योग्यता नाही, म्हणून हे असू दे. ॥265॥ किंवा ज्याअर्थी तू विभूती विचारल्यास त्याअर्थी अर्जुना, मी सांगत आहे, त्या तू ऐक. तर आता प्रस्तुत सर्व विद्यांमध्ये जी अध्यात्मविद्या आहे, ती माझी विभूती आहे. ॥266॥ अरे बाबा, सर्व शास्त्रांचे एकमत होऊन कधीच न संपणारा असा जो वक्त्यांमधील वादविवाद, तो मी आहे, असे समज. ॥267॥ वादातील विषयांचा निश्चय करू लागले असता, तो वाद वाढतो आणि जो ऐकला असता तर्कास जोर येतो, आणि ज्या तर्कावर बोलणारांची गोड भाषणे (मात्र) होतात, (पण निर्णय काहीच लागत नाही.) ॥268॥ याप्रमाणे प्रतिपादनामध्ये जो वाद चालतो, ती माझी विभूती आहे, असे श्रीकृष्ण म्हणाले. सर्व अक्षरांमध्ये स्पष्ट असे ‘अ’ अक्षर, ती माझी विभूती आहे. ॥269॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जेणें देवांचा मानु गिंवसिला, धर्मासि जीर्णोद्धार केला…


