सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय दहावा
हां हो सूर्य म्हणे काय जगातें । अंधारें दवडा कां परौतें । केवीं धसाळ म्हणे देवा तूंतें । तरी अधिक हा बोलु ॥320॥ तुझें नांवचि एक कोण्ही वेळे । जयांचिये मुखासि कां काना मिळे । तयांचिया हृदयातें सांडुनि पळे । भेदु जी साच ॥321॥ तो तूं परब्रह्मचि असकें । मज दैवें दिधलासि हस्तोदकें । तरी आतां भेदु कायसा कें । देखावा कवणें ॥322॥ जी चंद्रबिंबाचां गाभारां । रिगालियावरीही उबारा । परी राणेपणें शारङ्गधरा । बोला हें तुम्हीं ॥323॥ तेथ सावियाचि परितोषोनि देवें । अर्जुनातें आलिंगिलें जीवें । मग म्हणे तुवां न कोपावें । आमुचिया बोला ॥324॥ आम्हीं तुज भेदाचिया वाहाणीं । सांगितली जे विभूतींची कहाणी । ते अभेदें काय अंतःकरणीं । मानिली कीं न मनें ॥325॥ हेंचि पहावयालागीं । नावेंक बोलिलों बाहेरिसवडिया भंगीं । तंव विभूती तुज चांगी । आलिया बोधा ॥326॥ येथ अर्जुन म्हणे देवें । हें आपुलें आपण जाणावें । परि देखतसें विश्व आघवें । तुवां भरलें ॥327॥ पैं राया तो पांडुसुतु । ऐसिये प्रतीतीसि जाहला वरैतु । या संजयाचिया बोला निवांतु । धृतराष्ट्र राहे ॥328॥ कीं संजयो दुखवलेनि अंतःकरणें । म्हणतसे नवल नव्हे दैव दवडणें । हा जीवें धाडसा आहे मी म्हणें । तव आंतुही आंधळा ॥329॥ परि असो हें तो अर्जुनु । स्वहिताचा वाढवितसे मानु । कीं याहीवरी तया आनु । धिंवसा उपनला ॥330॥ म्हणे हेचि हृदयाआंतुली प्रतीती । बाहेरी अवतरो कां डोळ्यांप्रती । इये आर्तीचां पाउलीं मती । उठती जाहली ॥331॥ मियां इहींच दोहीं डोळां । झोंबावें विश्वरूपा सकळा । एवढी हांव तो दैवाआगळा । म्हणऊनि करी ॥332॥ आजि तो कल्पतरूची शाखा । म्हणोनि वांझोळें न लगती देखा । जें जें येईल तयाचिया मुखा । तें तें साच करीतसे येरु ॥333॥ जो प्रल्हादाचिया बोला । विषाहीसकट आपण जाहला । तो सद्गुरु असे जोडला । किरीटीसी ॥334॥ म्हणोनि विश्वरूप पुसावयालागीं । पार्थ रिगता होईल कवणें भंगीं । तें सांगेन पुढिलिये प्रसंगी । ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा ॥335॥
॥ दहावा अध्याय समाप्त ॥
हेही वाचा – Dnyaneshwari : पैं पर्जन्याचिया धारां, वरी लेख करवेल धनुर्धरा…
अर्थ
सूर्य काय लोकांना असे म्हणतो की, मला यावयाचे आहे, म्हणून तुम्ही अंधाराला बाजूला सारा. (सूर्यापुढे जसा अंधार नाही, तसा तुमच्या स्वरूपापुढे भेद नाही, असे असून तुम्ही ‘भेद टाक’ म्हणून अविचाराने सांगता,) पण तुम्हाला दांडगे कसे म्हणावे? कारण तो अधिक प्रसंग होतो. ॥320॥ कोणत्याही वेळी तुझे नावच त्यांच्या मुखात येईल अथवा कानावर पडेल, त्यांच्या अंत:करणाला भेद खरोखर टाकून पळतो. ॥321॥ असा जो तू पूर्ण परब्रह्म, तो मला माझ्या दैवाने हातावर उदक सोडून दान दिल्याप्रमाणे प्राप्त झाला आहेस. तर आता भेद हा कसला, कोठे आणि कोणी पाहावयाचा आहे? ॥322॥ अहो महाराज, चंद्रबिंबाच्या मध्यभागात प्रवेश केल्यावरही ‘उकडते’ असे जर म्हटले, तर ते शोभेल काय? परंतु हे श्रीकृष्णा आपण आपल्या मोठेपणात असे बोलत आहात. ॥323॥ त्यावेळी देवाने सहजच अतिशय संतुष्ट होऊन अर्जुनाला मनापासून आलिंगन दिले आणि मग म्हटले, अर्जुना, आमच्या बोलण्याबद्दल रागावू नकोस. ॥324॥ आम्ही भेदाच्या मार्गाने जी तुला विभूतींची कथा सांगितली, ती अभेदभावाने तुझ्या मनाला पटली की नाही, ॥325॥ हेच पहाण्याकरिता आम्ही क्षणभर बाह्य दृष्टीच्या रीतीने बोलून पाहिले, तो आम्हास असे आढळाले की, आम्ही सांगितलेल्या विभूती तुला चांगल्या समजल्या. ॥326॥ यावर अर्जुन देवाला म्हणाला, मला तुम्ही सांगितलेल्या विभूती समजल्या की नाही, हे तुमचे तुम्ही समजा. पण माझा अनुभव जर म्हणाल तर असा आहे की, हे सर्व विश्व तुमच्याच स्वरूपाने भरलेले आहे. ॥327॥ संजय म्हणाला, धृतराष्ट्रा, त्या अर्जुनाने अशा प्रकारच्या अनुभूतीला माळ घातली. त्या संजयाच्या बोलण्यावर धृतराष्ट्र स्वस्थ राहिला. ॥328॥ संजय हा अंत:करणात वाईट वाटून (मनात) म्हणाला, असले भग्य आले असता ते दवडणे, हे आश्चर्य नाही काय? धृतराष्ट्र अंत:करणाने समजदार आहे, असे मला वाटत होते. पण (त्यास मी अर्जुनाच्या बोधाची थोरवी सांगत असता हा अगदी स्तब्ध आणि उदासीन आहे यावरून) मला असे वाटते की, हा धृतराष्ट्र जसा चर्मचक्षूंनी आंधळा आहे, तसा अंत:करणातही ज्ञानचक्षूंनी आंधळा आहे. ॥329॥ (ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,) पण हे संजयाचे बोलणे राहू द्या. तो अर्जुन आपल्या हिताचे प्रमाण वाढवीत आहे (कशावरून?) तर हा विभूतींचा अनुभव त्याला मिळाल्यावर सुद्धा त्याला दुसरी एक अचाट इच्छा उत्पन्न झाली. ॥330॥ अर्जुन आपल्याशी असे म्हणावयास लागला की, हा (सर्व विश्वात एक भगवंताचेच स्वरूप व्याप्त आहे) माझ्या अंत:करणातील अनुभव माझ्या बाह्य दृष्टीला दिसावा, अशा इच्छेच्या प्रवृत्तीने माझ्या बुद्धीने उचल घेतली. ॥331॥ मी याच दोन डोळ्यांनी सर्व विश्वरूप पाहावे, एवढी मोठी इच्छा तो दैवाने थोर म्हणून करीत होता. ॥332॥ आज अर्जुन कल्पतरूची फांदी आहे. म्हणून त्या फांदीला वांझ फुले येणार नाहीत, असे समजा. जे जे अर्जुन म्हणेल, ते ते श्रीकृष्ण परमात्मा खरे करीत आहे. ॥333॥ प्रल्हादाने (माझा नारायण सर्व पदार्थांत व्याप्त आहे, असे हिरण्यकशिपूस) सांगितल्याकारणाने जो विषाहीसकट सर्व पदार्थ आपण झाला, असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो अर्जुनाला सद्गुरु लाभला होता. ॥334॥ म्हणून ‘मला विश्वरूप दाखवा’ हे श्रीकृष्णास विचारावयास अर्जुन कोणत्या पद्धतीने सरसावेल ते मी पुढल्या प्रसंगी सांगेन, असे निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. ॥335॥
॥ दहावा अध्याय समाप्त ॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…


