सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय दहावा
जगाचीं शुभाशुभें लिहिती । प्राणियांचिया मानसाचा झाडा घेती । मग केलियानुरूप होती । भोगनियम जे ॥245॥ तयां नियमितयांमाजीं यमु । जो कर्मसाक्षी धर्मु । तो मी म्हणे रामु । रमापती ॥246॥
प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम् । मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् ॥30॥
अगा दैत्यांचियां कुळीं । प्रल्हादु तो मी न्याहाळीं । म्हणोनि दैत्यभावादिमेळीं । लिंपेचिना ॥247॥ पैं कळितयांमाजीं महाकाळु । तो मी म्हणे गोपाळु । श्वापदांआंतु शार्दुळु । तो मी जाण ॥248॥ पक्षिजातिमाझारीं । गरुड तो मी अवधारीं । यालागीं जो पाठीवरी । वाहों शके मातें ॥249॥
पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम् । झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जान्हवी ॥31॥
पृथ्वीचिया पैसारा- । माजीं घडी न लगतां धनुर्धरा । एकेंचि उड्डाणें सातांहि सागरां । प्रदक्षिणा करी जो ॥250॥ तयां वहिलियां गतिमंतां- । आंतु पवनु तो मी पांडुसुता । शस्त्रधरां समस्तां- । माजीं श्रीराम तो मी ॥251॥ जेणें सांकडलिया धर्माचेनि कैवारें । आपणपयां धनुष्य करूनि दुसरें । विजयलक्ष्मीये एक मोहरें । केलें त्रेतीं ॥252॥ पाठीं उभें ठाकूनि सुवेळीं । प्रतापलंकेश्वराचीं सिसाळीं । गगनीं उदो म्हणतया हस्तबळीं । दिधली भूतां ॥253॥ जेणें देवांचा मानु गिंवसिला । धर्मासि जीर्णोद्धार केला । सूर्यवंशीं उदेला । सूर्य जो कां ॥254॥ तो हतियेरुपरजितयांआंतु । रामचंद्र मी जानकीकांतु । मकर मी पुच्छवंतु । जळचरांमाजीं ॥255॥ पैं समस्तांही वोघां- । मध्यें जे भगीरथें आणितां गंगा । जन्हूनें गिळिली मग जंघा । फाडूनि दिधली ॥256॥ ते त्रिभुवनैकसरिता । जान्हवी मी पांडुसुता । जळप्रवाहां समस्तां- । माझारीं जाणें ॥257॥ ऐसेनि वेगळालां सृष्टीपैकीं । विभूती नाम सूतां एकेकी । सगळेन जन्मसहस्रें अवलोकीं । अर्ध्या नव्हती ॥258॥
हेही वाचा – Dnyaneshwari : वेदाआंतु सामवेदु, तो मी म्हणे गोविंदु…
अर्थ
जगाची शुभाशुभे (पुण्यपापे) जे लिहितात, प्राण्यांच्या मनाचा जे झाडा घेतात, मग जशी कर्मे केली असतील त्याला अनुरूप जे भोगाचे नियन्ते होतात (कर्मानुरूप सुखदु:खाचा जे भोग देतात) ॥245॥ त्या निग्रहानुग्रह करणारांमध्ये, सर्व कर्मांचा साक्षी जो यमधर्म तो मी आहे, असे लक्ष्मीपती आत्माराम म्हणाले. ॥246॥
आणि दैत्यांमध्ये प्रल्हाद मी आहे, हरण करणार्यात काल मी आहे, पशूंमध्ये सिंह मी आहे, पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे. ॥30॥
अरे, राक्षसांच्या कुळामध्ये जो प्रल्हाद आहे, ती माझी विभूती होय, असे समज आणि म्हणूनच तो आसुरी स्वभावादिकांच्या संसार्गाने लिप्त झाला नाही. ॥247॥ ग्रासणाऱ्यांमध्ये महाकाळ, ती माझी विभूती आहे, असे श्रीकृष्ण म्हणाले, आणि हिंस्र पशूंमध्ये जो सिंह, ती माझी विभूती आहे, असे समज. ॥248॥ अर्जुना ऐक. सर्व पक्ष्यांमध्ये गरुड ही माझी विभूती आहे आणि म्हणूनच तो आपल्या पाठीवर मला धारण करू शकतो. ॥249॥
वेगवान वस्तूंमध्ये वायू मी आहे. शस्त्रधार्यांमध्ये राम मी आहे. मत्स्यांमध्ये मकर मी आहे, नद्यांत भागीरथी नदी मी आहे. ॥31॥
पृथ्वीच्या विस्तारामध्ये एक क्षण देखील न लावता अर्जुना, एका उडीसरशी पृथ्वीच्या विस्तारातील सातही समुद्रांना जो प्रदक्षिणा करतो, ॥250॥ (असे जे आहेत) त्या अत्यंत वेग असलेल्यांमध्ये जो वारा आहे अर्जुना, तो माझी विभूती आहे. सर्व शस्त्रधाऱ्यांमध्ये जो श्रीराम, तो माझी विभूती आहे. ॥251॥ ज्या रामचंद्राने संकटात पडलेल्या धर्माचा कैवार घेऊन, आपल्यास काय ते दुसरे धनुष्यच मदतीला घेऊन त्रेतायुगात विजयरूप लक्ष्मीस आपल्या एकाकडेच वळविले ॥252॥ नंतर ज्या रामचंद्राने सुवेळ पर्वताच्या माथ्यावर उभे राहून प्रतापवान असा जो लंकेचा राजा रावण, त्याची मस्तके आकशात ‘उदो उदो’ म्हणाणारी जी पिशाच्चे त्यांचे हातात बळी म्हणून दिली. ॥253॥ ज्या रामचंद्राने देवांचा गेलेला मान शोधून काढला आणि धर्माचा जीर्णोद्धार केला, सूर्यवंशात जो प्रतिसूर्यच उदयास आला, ॥254॥ असा जो जानकीनाथ रामचंद्र, तो शस्त्र धरण करणाऱ्यांमध्ये माझी विभूती आहे. जलचरांमध्ये शेपूट असलेला मकर, ही माझी विभूती आहे. ॥255॥ सर्वही जलप्रवाहांमध्ये जी गंगा, तिला भगीरथ आणीत असता, मधे जह्नु नावाच्या ऋषीने गिळाली आणि नंतर भगीरथाच्याच प्रार्थनेवरून आपली मांडी फाडून परत त्याची त्यास मोकळी करून दिली अशी, ॥256॥ तिन्ही लोकात एकच असलेली जान्हवी नावाची जी नदी, ती सर्व जलप्रवाहांमध्ये अर्जुना, माझी विभूती आहे, असे समज. ॥257॥ अशा प्रकाराने जगातील वेगवेगळ्या विभूतींची एक एक नावे घेऊ लागले असता पूर्ण आयुष्य असलेल्या हजारो जन्मांमध्ये त्या अर्ध्या देखील सांगून व्हावयाच्या नाहीत. हे पक्के समज. ॥258॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : ययां नरांमाजीं राजा, तो विभूतिविशेष माझा…


