सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय दहावा
मुनींआंत व्यासदेवो । तो मी म्हणे यादवरावो । कवीश्वरांमाजीं धैर्या रावो । उशनाचार्य मी ॥295॥
दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम् । मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् ॥38॥
अगा दमितयांमाझारीं । अनिवार दंडु तो मी अवधारीं । जो मुंगियेलागोनि ब्रह्मावेरीं । नियमित पावे ॥296॥ पैं सारासार निर्धारितयां । धर्मज्ञानाचा पक्षु धरितयां । सकळशास्त्रांमाजीं ययां । नीतिशास्त्र तें मी ॥297॥ आघवियाचि गूढां- । आंतु मौन तें मी सुहाडा । म्हणोनि न बोलतयां पुढां । स्त्रष्टाही नेण होय ॥298॥ अगा ज्ञानियांचां ठायीं । ज्ञान तें मी पाहीं । आतां असो हें ययां कांहीं । पार न देखों ॥299॥
यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन । न तदस्ति विना यत् स्यान् मया भूतं चराचरम् ॥39॥ नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप । एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ॥40॥
पैं पर्जन्याचिया धारां । वरी लेख करवेल धनुर्धरा । कां पृथ्वीचिया तृणांकुरां । होईल ठी ॥300॥ पैं महोदधीचिया तरंगां । व्यवस्था धरूं नये जेवीं गा । तेवीं माझिया विशेष लिंगां । नाहीं मिती ॥301॥ ऐशियाही सातपांच प्रधाना । विभूती सांगितलिया तुज अर्जुना । तो हा उद्देशु जो गा मना । आहाच गमला ॥302॥ येरां विभूतिविस्तारांसि कांहीं । एथ सर्वथा लेख नाहीं । म्हणौनि परिससीं तूं काई । आम्हीं सांगों किती ॥303॥ यालागीं एकिहेळां तुज । दाऊं आतां वर्म निज । सर्वभूतांकुरें बीज । विरूढत असे तें मी ॥304॥ म्हणोनि सानें थोर न म्हणावें । उंच नीच भाव सांडावे । एक मीचि ऐसें मानावें । वस्तुजातातें ॥305॥ तरी यावरी साधारण । आईक पां आणिकही खुण । तरी अर्जुना ते तूं जाण । विभूति माझी ॥306॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जो प्रळयतेजा देत मिठी, सगळिया पवनातें गिळी किरीटी…
अर्थ
मुनींमध्ये जे व्यासदेव, ती माझी विभूती आहे, असे यादवश्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले. मोठमोठाल्या पारदर्शी लोकांमध्ये धैर्यवान शुक्राचार्य माझी विभूती आहे. ॥295॥
दमन करणारांचा (दमनाला साधनीभूत) दंड मी आहे, जयाची इच्छा करणारांचे नीतिशास्त्र मी आहे. (सर्व) गुह्य वस्तूंमध्ये मौन मी आहे, ज्ञानी माणसांचे ज्ञान मी आहे. ॥38॥
अर्जुना, नियमन करणार्यांमध्ये जे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे सारखे नियमन करते, ते अनिवार्य शासन, ही माझी विभूती आहे. असे समज. ॥296॥ सारासार विचार करणार्या आणि धर्माच्या ज्ञानाचा पक्ष धरणार्या सगळ्या शास्त्रांमध्ये नीतिशास्त्र ते मी आहे. ॥297॥ हे राजा अर्जुना, सर्व गुह्यांमध्ये मौन, ते मी आहे, म्हणून न बोलणारांपुढे ब्रह्मदेवही अज्ञानी होतो. ॥298॥ अर्जुना, ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी असणारे जे ज्ञान, ती माझी विभूती आहे, असे समज. आता हे राहू दे. या विभूतींचा काही अंतच दिसत नाही. ॥299॥
हे अर्जुना सर्व भूतांचे जे बीज ते मी आहे, स्थावर-जंगम अशी कोणतीही वस्तू नाही की, जी माझ्यावाचून (अस्तित्वात) असू शकेल. ॥39॥ हे शत्रुतापना, माझ्या दिव्य विभूतींचा अंत नाही. विभूतींचा विस्तार तर मी केवळ संक्षेपार्थ सांगितला आहे. ॥40॥
अर्जुना पावसाच्या धारांची गणना करता येईल काय? अथवा पृथ्वीवर उगवणार्या गवताचे अंकुर किती आहेत, याचा निश्चय करता येईल काय? ॥300॥ अर्जुना महासागराच्या लाटांची गणती ज्याप्रमाणे ठेवता येणार नाही, त्याप्रमाणे माझ्या विशेष विभूतींना मोजमाप नाही. ॥301॥ माझ्या मुख्य विभूतींना पार नाही असे जरी आहे, तरी तुझ्या विचारण्यावरून आम्ही तुला पंच्याहत्तर मुख्य विभूती सांगितल्या; पण हे आमचे जे थोडक्यात विभूती सांगणे, ते अर्जुना, आमच्या मनाला वरवरचे वाटले. ॥302॥ बाकीच्या आमच्या विभूती-विस्ताराला येथे मुळीच काही मर्यादा नाही. म्हणून आम्ही सांगणार किती आणि तू ऐकणार काय? ॥303॥ याकरिता आम्ही आपले वर्म आता तुला एकदम सांगतो. ते असे की, सर्व प्राणिरूप अंकुराने वाढणारे जे बीज, ते मी आहे. ॥304॥ एवढ्याकरिता लहानमोठे अशी निवड करू नये. अधिक-उणी योग्यतेची कल्पना सोडून द्यावी आणि जेवढ्या म्हणून वस्तू आहेत, त्या मीच एक आहे, असे समजावे. ॥305॥ अर्जुना, यापेक्षाही सर्वसामान्य आणखी खूण आहे ती ऐक. त्यावरून ती माझी विभूती आहे असे तू समज. ॥306॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : सत्त्वाथिलियांआंतु, सत्त्व मी म्हणे अनंतु…


