सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय दहावा
देशियेचेनि नागरपणें । शांतु शृंगारातें जिणें । तरि ओंविया होती लेणें । साहित्यासी ॥42॥ मूळग्रंथींचिया संस्कृता । वरि मऱ्हाटी नीट पढतां । अभिप्राय मानलिया उचिता । कवण भूमी हें न चोजवे ॥43॥ जैसें अंगाचेनि सुंदरपणें । लेणियासी आंगचि होय लेणें । अळंकारिलें कवण कवणें । हें निर्वचेना ॥44॥ तैसी देशी आणि संस्कृत वाणी । एका भावार्थाचां सोकासनीं । शोभती आयणी । चोखट आइका ॥45॥ उठावलिया भावा रूप । करितां रसवृत्तीचें लागे वडप । चातुर्य म्हणे पडप । जोडलें आम्हां ॥46॥ तैसें देशियेचें लावण्य । हिरोनि आणिलें तारुण्य । मग रचिलें अगण्य । गीतातत्त्व ॥47॥ तैसा चराचरपरमगुरु । चतुरचित्तचमत्कारु । तो ऐका यादवेश्वरु । बोलता जाहला ॥48॥ ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे । काई बोलिलें श्रीहरी तेणें । अर्जुना आघवियाची मातू अंतःकरणें । धडौता आहासि ॥49॥
श्रीभगवानुवाच – भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः । यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ॥1॥
आम्हीं मागील जें निरूपण केलें । तें तुझें अवधानचि पाहिलें । तंव टांचें नव्हे भलें । पुरतें आहे ॥50॥ घटीं थोडेसें उदक घालिजे । तेणें न गळे तरी वरिता भरिजे । तैसा परिसौनि पाहिलासि तंव परिसविजे । ऐसेंचि होतसे ॥51॥ अवचितयावरी सर्वस्व सांडिजे । चोख तरी तोचि भांडारी कीजे । तैसा तूं आतां माझें । निजधाम कीं ॥52॥ तैसें अर्जुना येउतें सर्वेश्वरें । पाहोनि बोलिलें आदरें । गिरी देखोनि सुभरे । मेघु जैसा ॥53॥ तैसा कृपाळुवांचा रावो । म्हणे आइकें गा महाबाहो । सांगितलाचि अभिप्रावो । सांगेन पुढती ॥54॥
हेही वाचा – Dnyaneshwari : आतां आपुलेनि कृपाप्रसादें, मिया भगवद्गीता वोवीप्रबंधें…
अर्थ
मराठी भाषेतील सौंदर्याने शांतरस शृंगाररसाला जिंकील आणि ओव्या तर अलंकारशास्त्राला भूषण होतील. ॥42॥ मूळ संस्कृत गीताग्रंथावर माझी असणारी मराठी टीका जर चांगली वाचली आणि योग्य रीतीने दोन्हींचा अभिप्राय जर चांगला पटला तर, कोणता ग्रंथ मूळ आहे, हे कळणार नाही. ॥43॥ ज्याप्रमाणे शरीराच्या सौंदर्याने शरीर हेच अलंकारास भूषण होते, अशा स्थितीत कोणी कोणाला शोभा आणली, याची निवड होत नाही. ॥44॥ त्याचप्रमाणे माझी मराठी भाषा आणि संस्कृत भाषा या दोन्हीही एकाच अभिप्रायाच्या पालखीत शोभतात, त्या तुम्ही चांगल्या बुद्धीने ऐका. ॥45॥ गीतेचा पुढे आलेला अभिप्राय सांगत असता शृंगारादी नवरसांचा वर्षाव होतो आणि चातुर्य म्हणते, आम्हाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. ॥46॥ (वरच्या ओवीत सांगितलेला परिणाम ज्याच्या योगाने होईल,) तसे मराठी भाषेचे सौंदर्य घेऊन (नवरसांना) तारुण्य आणले आणि मग अमर्याद गीतातत्व रचले. (म्हणजे गीतेवर टीका केली). ॥47॥ याप्रमाणे संपूर्ण जगाचे श्रेष्ठ गुरु असलेले आणि शहाण्यांच्या चित्ताला आश्चर्यभूत असणारे, असे जो यादवातील श्रेष्ठ श्रीकृष्ण, ते बोलले, ते ऐका. ॥48॥ निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, त्या श्रीकृष्णांनी काय भाषण केले (ते ऐका). श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना तू सर्व गोष्टींनी अंत:करणाचा धड आहेस. ॥49॥
श्रीकृष्ण म्हणाले, हे महाबाहो, (माझ्या भाषणाने) संतोष पावणार्या तुला, तुझ्या हिताच्या इच्छेने जे मी आणखी देखील सांगत आहे, ते माझे श्रेष्ठ भाषण ऐक. ॥1॥
आम्ही पूर्वी जे व्याख्यान केले, त्यामुळे तुझे लक्ष किती आहे, हेच आजमावून पाहिले, त्यात ते अपुरे नाही, तर चांगले पूर्ण आहे (असे आढळून आले). ॥50॥ ज्याप्रमाणे घागरीत थोडेसे पाणी घालावे आणि ते गळाले नाही तर, आणखी जास्त भरावे, त्याप्रमाणे तू ऐकावे म्हणून सांगितले, तेव्हा तुला आणखी ऐकावे असेच वाटू लागले. ॥51॥ एखाद्या अकस्मात आलेल्या मनुष्यावर आपले सर्वस्व सोपवावे आणि तो प्रामाणिक आहे, असे आढळून आले, तर त्यालाच खजिनदार करावा. त्याप्रमाणे (आम्ही तुला सांगितलेले तू लक्षपूर्वक ऐकतोस, अशी आमची खात्री झाल्यामुळे) तू आता आमचे राहण्याचे ठिकाण झाला आहेस. ॥52॥ याप्रमाणे सर्वांचा प्रभू जे श्रीकृष्ण, ते अर्जुनाला एवढ्या योग्यतेचा पाहून (त्याजबरोबर) प्रेमाने बोलावयास लागले. ज्याप्रमाणे डोंगर पाहून मेघांची दाट फळी येते, ॥53॥ त्याप्रमाणे (मोठ्या प्रेमभराने) कृपाळूंचे राजे श्रीकृष्ण म्हणाले, अरे, आजानुबाहू अर्जुना, ऐक, सांगितलेलाच मतलब आम्ही पुन्हा सांगतो. ॥54॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…


