सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय दहावा
महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा । मद्भवा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः ॥6॥
तरी आघवांचि गुणीं वृद्ध । जे महर्षींमाजि प्रबुद्ध । कश्यपादि प्रसिद्ध । सप्त ऋषी ॥92॥ आणिकही सांगिजतील । जे चौदा आंतील । स्वायंभू मुख्य मुदल । चारी मनु ॥93॥ ऐसे हे अकरा । माझां मनीं जाहाले धनुर्धरा । सृष्टीचिया व्यापारा- । लागोनिया ॥94॥ जैं लोकांची ये व्यवस्था न पडे । जैं या त्रिभुवनाचें कांहीं न मांडे । तैं महाभूतांचे दळवाडें । अचुंबित असे ॥95॥ तैंचि जे जाहाले । इहीं लोकपाळ केले । अध्यक्ष रचुनि ठेविले । इहीं जन ॥96॥ म्हणोनि अकरा हे राजा । मग येर लोक यांचिया प्रजा । ऐसा हा विस्तारु माझा । ओळख तूं ॥97॥ पाहें पां आरंभीं बीज एकलें । मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें । बुडीं कोंभ निघाले । खांदियांचे ॥98॥ खांदियांपासूनि अनेका । पसरलिया शाखोपशाखा । शाखांस्तव देखा । पल्लव पानें ॥99॥ पल्लवीं फूल फळ । एवं वृक्षत्व जाहालें सकळ । तें निर्धारितां केवळ । बीजचि तें ॥100॥ ऐसें मी एकचि पहिलें । मग मी तें मनातें व्यालें । तेथ सप्त ऋषि जाहाले । आणि चारी मनु ॥101॥ इहीं लोकपाळ केले । लोकपाळीं विविध लोक स्रजिले । लोकांपासूनि निपजले । प्रजाजात ॥102॥ ऐसेनि हें विश्व येथें । मीचि प्रसवलाना निरुतें । परि भावाचेनि हातें । माने जया ॥103॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तो चालतें ज्ञानाचें बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ
अर्थ
प्राचीन (कश्यपादी) सात महर्षी, तसेच चार (स्वायंभूआदी) मनु हे भाव माझ्या मनापासून उत्पन्न झाले. ही (सर्व) प्रजा यांची सृष्टी आहे. ॥6॥
तरी अर्जुना, सर्व गुणांनी श्रेष्ठ, मोठमोठ्या ऋषींमध्ये प्रसिद्ध असलेले ज्ञाते, जे कश्यपादी सात ऋषी ॥92॥ चौदा मनूंपैकी स्वयंभू आदीकरून मुख्य मूळ जे चार मनु, तेही आणखी सांगितले जातील. ॥93॥ अगा अर्जुना, सृष्टीची घडामोड चालावावी म्हणून वर सांगितल्याप्रमाणे हे अकराजण माझ्या मनापासून उत्पन्न झाले. ॥94॥ ज्यावेळी (स्वर्गादी) लोकांची काही व्यवस्था लागली नव्हती आणि या त्रैलोक्याचा काही मांड मांडलेला नव्हता आणि महाभूतांचे समुदाय उपयोगात आले नव्हते ॥95॥ त्याचवेळी हे कश्यपादी अकराजण उत्पन्न झाले. मग त्या अकरा जणांनी इंद्रादी आठ लोकांना (दिशांच्या स्वामींना) उत्पन्न केले, त्यांना दिशांचे स्वामी नेमून ठेवले आणि त्या लोकपालांनी नाना प्रकारचे लोक उत्पन्न केले. ॥96॥ म्हणून वर सांगितलेले महर्षी इत्यादीक हे अकरा राजे आहेत आणि बाकीचे लोकपालादीक हे यांची प्रजा आहेत. असा हा माझा विस्तार आहे, असे समज. ॥97॥ अर्जुना पाहा, पहिल्या प्रथम फक्त एक बी असते, मग त्यालाच अंकुर फुटल्यावर ते बुंधा होते आणि बुंध्यातून फांद्यांचे अंकुर निघतात. ॥98॥ पाहा, त्या फांद्यांपासून पुढे लहानमोठ्या शाखा पसरतात आणि त्या फांद्यांपासून कोवळी पालवी आणि पाने फुटतात. ॥99॥ पालवीपासून फूल आणि फळ उत्पन्न होते; याप्रमाणे सर्व झाड तयार होते. विचार करून पाहिले तर ते झाड म्हणजे केवळ बीच आहे. ॥100॥ त्याप्रमाणे प्रथम एकटाच मी होतो, मग (ते) ‘मी’ मनाला उत्पन्न करते झाले आणि त्या मनापासून कश्यपादी सात ऋषी आणि स्वयंभू आदी चार मनु उत्पन्न झाले. ॥101॥ त्यांनी (इंद्र, अग्नी, यम, वरुण, नैर्ऋती, वायू, कुबेर आणि ईशान असे हे) लोकपाल उत्पन्न केले. त्या लोकपालांनी अनेक प्रकारच्या (स्वर्गादी) लोकांची रचना केली आणि त्या लोकांपासून ही सर्व प्रजा उत्पन्न झाली. ॥102॥ या प्रमाणे हे दिसत असलेले विश्व खरोखर माझ्यापासूनच (निर्माण) झाले नाही काय? परंतु हा सर्व माझाच विस्तार आहे, अशा दृष्टीने जो पाहील, त्याला पटेल. ॥103॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : अगा प्रकाश आणि कडवसें, सूर्याचिस्तव जैसें


