मंगला वाकोडे
नातेसंबंध म्हणजे जीवनातले धागे – काही धागे जाडसर, तर काही बारीक असतात… पण प्रत्येकाचे आपले स्वतःचे एक महत्त्व असते. या नात्यांमध्ये प्रेम असतं, विश्वास असतो, सामंजस्य असतं… पण काही वेळा या धाग्यांमध्ये गुंतागुंत निर्माण होते, ताण येतो आणि अखेर ते तुटतात.
तुटलेले नातेसंबंध हे नेहमीच वेदनादायी असतात. हे तुटणे अचानक असो किंवा हळूहळू दूर जाणं असो, यात एक रिक्तता निर्माण होते. जिथे एकेकाळी संवाद होता, हास्य होतं, आधार होता – तिथे आता शांतता असते, एक प्रकारचे प्रश्नचिन्ह असते. “काय चुकलं?” हा विचार मनात पुन्हा पुन्हा डोकावत राहतो.
कधीकधी नातं तुटतं.. कारण अपेक्षा पूर्ण होत नाहीत, कधी गैरसमजामुळे, तर कधी फक्त वेळ आणि परिस्थिती बदलल्यामुळे. कारण काहीही असू शकतं. दोष नेहमी एकाच व्यक्तीचा नसतो. टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. प्रत्येकाच्या नजरेत आपली बाजू बरोबर असते आणि समोरच्याची कायमच चुकीची. कधी कधी त्या दोन बाजू एकत्र येत नाहीत, म्हणून गुंता सुटत नाही.
तुटलेलं नातं सावरणं कठीण असतं, पण अशक्य नाही. संवाद, क्षमाशीलता, आणि एकमेकांना समजून घेण्याची तयारी असेल, तर नात्यांमध्ये नव्याने जीव येऊ शकतो. मात्र काही वेळा तुटलेलं नातं परत जुळवणं यापेक्षा त्या नात्याच्या फक्त आठवणी घेऊन पुढे जाणंच योग्य ठरतं.
हेही वाचा – आयुष्यातले सुगंध… सुगंधी आयुष्य
तुटलेले नातेसंबंध आपल्याला खूप काही शिकवून जातात – स्वतःकडे पाहायला भाग पाडतात, आपली मर्यादा, भावना आणि गरजा स्पष्ट करायला लावतात. हे अनुभव आपल्याला अधिक परिपक्व करतात, आणि पुढच्या नात्यांमध्ये अधिक सजग बनवतात.
शेवटी, नातेसंबंध जपण्यासाठी दोन्हीकडून संवाद, विश्वास आणि आदर कायम ठेवणं गरजेचं आहे. जे नातं तुटलं आहे, ते आपल्याला काही शिकवून गेलं – हीच त्याची खरी भेट.
हेही वाचा – व्यवहार तर एक पैशाचाही नाही, तरी बँकेचा ससेमिरा