Sunday, October 26, 2025

banner 468x60

Homeललितपुस्तकांमध्ये रमलेला माणूस

पुस्तकांमध्ये रमलेला माणूस

पराग गोडबोले

साधारणपणे पाचएक महिन्यापूर्वीची ही गोष्ट. माझ्या तीन दिवसांच्या धावत्या दौऱ्याची सांगता, पुणे ते मुंबई या शेवटच्या टप्प्यात इंद्रायणी एक्स्प्रेसच्या प्रवासाने झाली. तत्कालमध्ये अगदी खिडकी मिळाली, चेअर-कारची! विमान असो, बस असो वा रेल्वे, खिडकी मिळाली की, मी अजूनही हरखतो, लहान मुलासारखा… पळती झाडे, इमारती, घाटातले बोगदे… हे सगळं नजरेत साठवून ठेवण्याचा मोह अजूनही न आवरता येण्यासारखा… एकटा असलो तरीही प्रवासाचा आनंद घेतोच मी, मनसोक्त! यावेळी माझ्यासमोर टेबल पण आलं. अगदी खास वाटलं…

सहा पस्तीस वाजता अगदी वेळेवर गाडी हलली. शिवाजीनगर गेलं आणि हळूहळू अंधार पडायला लागला. बंद काचांच्या पलीकडली, बाहेरची दृश्यं धूसर व्हायला लागली आणि माझा हिरमोड झाला. बाहेरचं लक्ष आता आत वळलं. कटलेट, ऑम्लेट, चिक्की, चहा, कॉफी, गोळ्या, बिस्किटं, पाण्याच्या बाटल्या, थंड पेय विकणारे विक्रेते, त्यांच्या विशिष्ट पद्धतीच्या ओरडण्यामुळे लक्ष वेधून घेऊ लागले… लोकांची ‘चरंती’ सुरूच होती. समोर येईल त्याचा फन्ना उडत होता. मी आपला एक कप चहा घेऊन निवांत होतो.

पुस्तक होतं समोरच. दोन कथा वाचून पूर्ण झालेल्या कथासंग्रहातली तिसरी कथा वाचायचा प्रयत्न करत होतो… तेवढ्यात तिकीट तपासनीस आला, नाव विचारून त्याच्या हातातल्या टॅबवर माझी हजेरी नोंदवून गेला. बऱ्याच दिवसांनी हा असा गाडीचा प्रवास मनसोक्त अनुभवत होतो मी, त्यातल्या कंगोऱ्यांसह… दमलो होतो बराच, पण पेंगलो असतो तर, या नामी अनुभवांना मुकलो असतो, म्हणून जागा राहून ते शोषून घेत होतो सगळेच, टिपकागदाप्रमाणे!

हे सगळं असं सुरू असतानाच, पुस्तकांचा एक डोलारा तोल सावरीत येताना दिसला. जवळजवळ पंचवीस ते तीस पुस्तकं तरी त्या डोलाऱ्यात नक्कीच असावीत. पोटाची भूक शमवणाऱ्या असंख्य लोकांच्या भाऊगर्दीत, बौद्धिक भूक भागवणारं ते आक्रीत माझ्या आसनासमोरच्या मेजावर येऊन थबकलं आणि सगळी पुस्तकं माझ्या समोरच उतरवली गेली.

हेही वाचा – तो डंख कुरवाळला अन्…

वेगळीच काहीतरी अनुभूती, कधीही न अनुभवलेली… वेगवेगळ्या प्रसिद्ध लेखकांची नावाजलेली पुस्तकं माझ्या अगदी नजरेसमोर, इंग्रजी आणि मराठी… अधाशासारखा मी ती नजरेत साठवून घेऊ लागलो… पुस्तकांच्या डोलाऱ्यामागे ती विकणारे विक्रेते माझ्या टप्प्यात आले आणि मी उठून माझी जागा त्यांना देऊ केली. अर्थात, माझा स्वार्थ होताच त्यात!

ते बसलेले असताना ती पुस्तकं मनमुराद चाळण्याची संधी मला मिळणार होती. टेकले काही वेळ ते आसनावर, पण म्हणाले, “असा बसून राहिलो तर, धंदा कसा होणार माझा? तुम्ही चाळत बसा दोन-चार पुस्तकं. मी येतो जरा फिरून…”

डोलाऱ्यातली काही पुस्तकं उचलली त्यांनी आणि गेले पुढे विक्री करायला. मी माझ्या हातात अवचित गवसलेला तो खजिना चाळू लागलो. मोहातच पडलो त्या पुस्तकांच्या! बायकोचे शब्द आठवले, “तुला चार पुस्तकं दिली की, जेवणाचीही भ्रांत नसते, किती तो वेडगळपणा करायचा?”

आहे मी वेडा पुस्तकांचा, काय करू त्याला?

एक चक्कर मारून, काही पुस्तकं विकून काका परत मी बसलो होतो तिथे आले. मी त्यांना म्हणालो, “खूप छान पुस्तकं आहेत तुमच्याकडे. चोखंदळ आहात… पण त्रास नाही होत एवढं ओझं घेऊन फिरायचा? ”

ते मनापासून हसले अन् म्हणाले, “बराच अनुभव आहे मला पुस्तकविक्रीचा. स्टेशनवर स्टॉल आहे, तिथेही विकतो पुस्तकं, पण घेणारे खूप कमी असतात… आज दिवसभरात फक्त चार पुस्तकं विकली गेली. लोकांना वेळ नसतो तिथे पुस्तकं चाळायला… इथे गाडीत भरपूर वेळ असतो. निदान वीस तरी विकली जातात रोज… पुणे ते लोणावळा जातो आणि लोणावळ्याहून परत येतो, मिळेल त्या गाडीने. रोजचा परिपाठ आहे माझा. कधी गाडी बदलतो. या अशाच गाड्यांमध्ये विक्री होते छान!”

हेही वाचा – केल्याने होत आहे रे!

पुस्तकांच्या त्या राशीतली बरीचशी पुस्तकं माझ्या संग्रही होती… बाकीची मला नाही आवडली विशेष. तसं सांगितलं मी त्यांना. ते म्हणाले, “काही हरकत नाही, पुढच्या वेळी वेगळी पुस्तकं असतील, तेव्हा नक्की घ्या…”

“हरकत नसेल तर नाव सांगाल?”

“हरकत काय त्यात? मी सुरेश नाझरे, पुण्यातच राहतो.”

त्यांचे चष्म्याआडचे मिश्किल डोळे, हसरा चेहरा, खाकी डगला आणि डाव्या हाताच्या मनगटावरचा तिरंगी बंद… हे सगळं नजेरत साठवून घेतलं मी. आवडून गेलं ते प्रसन्न व्यक्तिमत्व मला! मी पुस्तक विकत न घेताही, त्यांच्या स्वरात आपुलकी होती. माझं पुस्तकप्रेम आवडून गेलं असावं बहुतेक त्यांना, बायकोला आवडत नसलं तरीही!

खूप गप्पा मारल्या आम्ही, हाताशी असलेल्या मर्यादित वेळेत. सुखावला जीव माझा, माझ्यासारख्याच पुस्तकप्रेमी व्यक्तीच्या संगतीत. लोणावळा जवळ येत होतं आणि ते आवराआवरी करायला लागले. विखुरलेली पुस्तकं अगदी सहजपणे रचली त्यांनी सुबक रचनेत, उचलून घेण्यासाठी आणि सावरण्यासाठी… त्यांना छायाचित्रात बंदिस्त करायचा मोह नाही आवरला मला आणि मी परत एकदा त्यांना अनुमती विचारली…

“विचारायचा प्रश्नच नाही, बिनधास्त काढा फोटो…” असं त्यांनी म्हटल्यावर, त्यांची हसरी छबी मी बंदिस्त केली माझ्या फोनमध्ये, लोणावळा यायच्या काही क्षण आधी! निरोप घेतला त्यांनी माझा आणि मी त्यांचा…

ते, त्यांचे मिश्किल डोळे आणि पुस्तकांचं गोड ओझं सावरत होणारा सहज वावर, घर करून राहिला माझ्या मनात.

मी हात हलवला निरोपाचा, पुन्हा भेटू म्हणत… पुढच्या वेळी पुणे-मुंबई-पुणे प्रवासात त्यांचा शोध नक्कीच घ्यावा लागेल!

वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार त्यांच्या नकळतच करणारी अशी माणसं दुर्मीळ असतात, नाही का?

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!