दत्तात्रय पांडुरंग मानुगडे
वेळ सकाळची होती… त्या दिवशी रविवार असल्यामुळे शाळेला सुट्टी होती. गेला आठवडाभर अभ्यास करून कंटाळा आला होता. वर्गामध्ये खेळातून झालेली भांडणे… भांडणांमध्ये फुटलेल्या पाट्या. त्याच्यासाठी हातावर खाल्लेल्या दोन दोन छ्डया… या राहून राहून आठवत होत्या. आज रविवार म्हणून आईने गावातील घर सारवण्यासाठी बेत आखला होता. आई मला म्हणाली, “आज शाळेला सुट्टी आहे तर, माझ्याबरोबर आपल्या गावाकडच्या घराकडे चल. मी शिडीवर बसून भिंत सारवून घेते. तू फक्त सारण्याचा कपडा खालून माझ्या हातात दे. मी सारवून घेते…”
“अगं आई, मला कसे जमणार?” मी म्हणालो.
“तुला न जमाय काय झाले? शाळेला सुट्टी आहे म्हणून तुला काम सांगते. रानात बसून काय करणार आहेस? तुला सुट्टी असली की, खेळायची सवय जरा बंद कर. काल दुपारपर्यंत तू तुझा अभ्यास केलायस… तुला काम करायला नको, इकडच्या तिकडच्या गप्पागोष्टी कराय तुझ्याकडे वेळ आहे आणि काम कराय वेळ नाही…” बोलता बोलता आईचं लक्ष माझ्या हाताकडे गेलं… “तुझा उजवा हात लाल कशाने झालाय?”
आता मी आईला काय सांगू असा प्रश्न पडला. मी भीतभीत आईला म्हणालो, “काही नाही… खेळताना हातावर पडलो…”
“हे खरे आहे का? की गुरुजींनी तुला शाळेत मारले?”
“ते का म्हणून मला मारतील?”
“कारण वर्गात तू ‘एकदम हुशार’ मुलगा आहेस म्हणून म्हटलं…”
“तुझं काहीतरीच… बरं बाकीचे राहू दे, चल मी तुझ्याबरोबर गावाकडे येतो…”
आईने चार भाकरी, झुणका, लोणचे हे सारे पदार्थ एका फडक्यामध्ये बांधले आणि जेवणाची पिशवी माझ्या हातात दिली. आईने दोन बादल्या हातात घेतल्या अन् गावाकडचा रस्ता धरला… आई पुढे आणि मी मागे…
काही वेळातच मी आणि आई गावातल्या घराकडे गेलो. आईने घराचे कुलूप काढले. घरातील सारवणं करायचे म्हणून आदल्या दिवशी एक बॅरेल पाणी भरून ठेवले होतं. आम्ही दोघांनी घरामध्ये अगोदर जेवण केले आणि आई पांढरीची माती बादलीमध्ये घालून पाणी ओतू लागली. घड्याळात सकाळचे दहा वाजले होते आणि घरामध्ये सारवणं सुरू झालं. आई शिडीवर चढली आणि मी खालून कपड्याचा बोळा त्या कालवलेल्या मातीत भिजवून आईच्या हाताकडे फेकू लागलो.
हे घरातील सारवणं सुरू असताना आमच्या घराच्या पुढच्या बाजूला कडकलक्ष्मी आलीय, असं वाटलं. मी आईला म्हणालो, “बाहेर कडकलक्ष्मीचा खेळ आलाय, मी जाऊ का?”
“तुला सुद्धा हेच पाहिजे होतं… ती लोक पोटासाठी गाव-गावभर फिरतात. पण तुला एक काम सरळ करता येत नाही. शाळेचा अभ्यास कमी, पण तरी वहीमध्ये सारखा काहीतरी लिहित बसतोस. मला तरी काही सूचेना असं झालंय. पुढे तुझे कसे होणार? हे मला माहीत नाही… जा बघून ये कडकलक्ष्मीचा खेळ…” आई असे म्हणताच मी हात धुतले आणि घरापुढे जाऊन उभा राहिलो. कडकलक्ष्मीचा खेळ चालू होणार होता. तिच्याबरोबर नवरा आणि लहान बाळ होतं. भीक मागण्यासाठी मोठी झोळी होती आणि त्या झोळीजवळ लहान मुलगा बसला होता. तो रडत होता, त्याला काहीतरी खायला हवे होते, असे मला वाटत होतं.
हेही वाचा – सुलू… हवी मायेची गुंतवणूक!
कडकलक्ष्मी झालेला माणूस कपाळावर हळदी कुंकवाचा मळवट भरलेला, केस वाढलेला आणि वेगवेगळ्या रंगाचे झंपर पीस त्यांनी कमरेभोवती गुंडाळले होते. कडकलक्ष्मी देवीची मूर्ती त्या लाकडाच्या पेटीमध्ये मला दिसत होती. देवीच्या उजव्या बाजूला दोन-तीन मोरपीस होते. ती कडकलक्ष्मीची मूर्ती पाहून मी थोडा घाबरलो… कारण, तिथे डोळे फार मोठे होते. ती माझ्याकडे रागाने पाहत आहे, असे वाटत होते. ढोलकीचा आवाज ऐकून आमच्या आळीतील बायका सुपात धान्य, हळदी कुंकवाचा करंडा, दोन-तीन उदबत्त्या आणि देवीच्या दक्षिणेसाठी काही नाणी घेऊन कडकलक्ष्मीकडे येत होत्या. कडकलक्ष्मीजवळ बायकांची गर्दी वाढू लागली… धान्य घेऊन आलेल्या बायका लक्ष्मीच्या पेटीजवळ थांबून धान्य त्या बाईच्या हातात देत होत्या आणि ती बाई ते झोळीत टाकत होती. त्यातील थोडे धान्य सुपात ठेवून सूप बायकांच्या हातात देत होती. कडकलक्ष्मी बाई प्रत्येक बाईला हळद-कुंकू लावत होती थोड्या वेळाने कडकलक्ष्मी झालेल्या माणसाने अंगावर आसूड मारून झाल्यावर आसूड पेटीवर ठेवला आणि राक्षसाचा मुकूट घालून ढोलकीच्या तालावर नाचू लागला. कडकलक्ष्मीचा खेळ सुरू होता गर्दी वाढत होती. काही वेळाने कडकलक्ष्मीने तो राक्षसाचा परिधान केलेला मुकूट खाली काढून ठेवला व लगेचच हातात दाभण घेऊन हाताच्या दंडावर टोचून रक्त काढू लागला. हा भयानक प्रकार पाहून मी भ्यालो होतो. पोटासाठी ही मंडळी काय करतील, याचा अंदाज बांधणे फार कठीण आहे. कडकलक्ष्मी बाई वाजवत असलेल्या ढोलामुळे परिसर निनादून गेला होता…
गावात एखादा नवीन खेळ अथवा गारुडी किंवा कडकलक्ष्मी आली की, गावातील लोकांना नवीन नवीन काहीतरी पाहायला मिळत असे. कारण त्यावेळी ग्रामीण भागामध्ये करमणुकीचे कोणतेच साधन नव्हते. वर्षातून एकदा गावची यात्रा असायची. त्या यात्रेत तमाशा किंवा गावातील नाटक मंडळीचे नाटक असायचे. याशिवाय, प्रत्येक एकादशीला लक्ष्मीच्या देवळामध्ये एकतारी भजन आणि कधी कधी संगीत संप्रदाय भजन… इतकेच कार्यक्रम होत असत. एवढंच काय, त्यावेळी गावामध्ये लाइटही नव्हते. सूर्य मावळला की सारागाव अंधारामध्ये गडप व्हायचा. रॉकेलचा मिणमिणता दिवा किंवा रॉकेलचा कंदीलचाच प्रकाश प्रत्येकाच्या घरामध्ये दिसायचा. त्यावेळी गावामध्ये सुविधा नव्हत्या, पण माणसं मात्र प्रेमळ स्वभावाची होती.
म्हणूनच कडकलक्ष्मीचा खेळ पाहण्यासाठी गर्दी झाली होती. याच गर्दीमध्ये तुका अण्णा आपल्या नातवाला खांद्यावर घेऊन दुकानाकडे येऊ लागला… हा तुका अण्णा साडेसात फूट उंचीचा, गोरा रंग… त्याच्या घरची शेती बऱ्यापैकी होती. तुका अण्णाचं नातवावर खूप प्रेम होतं. कारण मुलाला खूप काळाने मुलगा झाला होता. हा आनंद तुका अण्णा आणि त्यांच्या कुटुंबीयांना झाला होता. तो नातू तुका अण्णा हा कडकलक्ष्मीचा खेळ पहायला उभे होते. तो नातू आजोबाला काही ना काही तरी प्रश्न विचारत होता. तेवढ्यात एका गावकऱ्याचे मेलेले कुत्रे पोत्यावर घेऊन घरातील लोक पुरण्यासाठी चालले होते. तुका अण्णांच्या नातवाने हे पाहिले आणि त्याने विचारले, “आजोबा, या कुत्र्याला कुठे घेऊन चालले आहेत?” त्यावर तुका अण्णा म्हणाला, “भाऊंचे कुत्रे मेले आहे.” त्यावर नातू म्हणाला, “आजोबा, तुम्ही कधी मरणार?” हे ऐकून तुका अण्णा म्हणाले, “ए गप बस पोरा, तू फक्त कडकलक्ष्मीचा खेळ बघत बस. हा खेळ संपल्यानंतर मी तुला दुकानातून दोन गोळ्या देणार आहे.”
हेही वाचा – पंचनामा : झाडाकडे पाहून धनगर दिनूची बोबडीच वळली…
गावातून आई आणि मी आमच्या शेताकडे गेलो. आजीने आईला विचारलं, “घरातील सारवणं संपलं का?” आई म्हणाली “होय.” आजी पुढे म्हणाली, “मुलानं मदत केली की नाही?” यावर आई म्हणाली “होय, म्हणूनच लवकर आपल्या घरचे सारवण झाले.” आईला मी थोडीच मदत केली. पण आईने आजीला, मी मदत केली आहे, म्हणून सांगते… आईची माया किती मोठी आहे, हे जाणवलं.
गावातील घर आईने सारवले होते. कडकलक्ष्मीचा खेळ संपला आम्ही घरीही आलो. परंतु तुका अण्णा आणि त्याचा नातू हा विषय मात्र माझ्या डोक्यात घर करून राहिला होता. रात्री जेवण करून रानामध्ये आम्ही सर्वजण झोपलो.. परंतु तुका अण्णाच्या नातवाने विचारलेला, ‘तुम्ही कधी मरणार?” हा प्रश्न काही डोक्यातून जात नव्हता…


