सुहास गोखले
सर्वसाधारणपणे आकाशातील ताऱ्यांच्या विविध गटांना, मांडण्यांना नक्षत्र असे म्हणण्याची रूढी होती. परंतु, आकाशातील अशा 88 मांडण्यांना आता जागतिक स्तरावर ‘तारकासमूह’ (Constellations) म्हणून ओळखले जाते. एकूण 27 नक्षत्रे आहेत, अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती अशी त्यांची नावे आहेत. ही सगळी नक्षत्रे चंद्राच्या आकाशातील मार्गावरच अचूकपणे येतात असे नाही. काही नक्षत्रे या मार्गापासून प्रत्यक्षात बरीच दूर आहेत. उदाहरणार्थ हस्त, स्वाती, श्रवण, धनिष्ठा. या विषयीच्या लेखमालेत आतापर्यंत आपण 18 नक्षत्रांची माहिती घेतली. या लेखात आपण मूळ, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा या नक्षत्रांबाबत जाणून घेऊ.
मूळ : वृश्चिक राशीची सुरुवात अनुराधा नक्षत्राने होते तर शेवट मूळ नक्षत्राने. वृश्चिक राशीमधील विंचवाची नांगी म्हणजे मूळ नक्षत्र. विंचवाची नांगी अर्ध गोलाकार असते त्याच प्रमाणे हे नक्षत्र देखील अर्ध गोलाकार आकाराचेच आहे. दुसऱ्या प्रकारे ओळख सांगायची म्हणजे छत्रीची मूठ आणि इंग्रजीतील जे (J) आकाराप्रमाणे हे नक्षत्र दिसते. एखादा नवखा अवकाश निरीक्षक देखील हे नक्षत्र ओळखू शकतो.
सूर्य ज्या वेळेस मूळ नक्षत्रात येतो. त्या वेळेस साधारणपणे हिवाळा सुरू झालेला असतो. विंचवाचे विष त्याच्या नांगीमध्ये असल्यामुळे काही ठिकाणी या नक्षत्रास विषारी समजण्यात येते. म्हणून या नक्षत्रावरील जन्म अशुभ मानला जातो.
हेही वाचा – आकाशातील चित्रा आणि स्वाती नक्षत्र
मूळ नक्षत्राचे नाव वैशिष्ट्यपूर्ण आहे, असेच म्हणावे लागेल. कारण आपल्या आकाशगंगेचे मूळही या मूळ नक्षत्राजवळच आहे, असा उल्लेख काही शास्त्रीय पुस्तकांमध्ये आढळतो. मूळ नक्षत्रामध्ये नऊ ते अकरा तारकांचा समावेश केला जातो.
पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा : पूर्वा फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रांप्रमाणे या नक्षत्रांचा उच्चार देखील सर्वसाधारणपणे एकत्रच केला जातो. ही नक्षत्रे शोधण्यासाठी वृश्चिक राशीतील अनुराधा आणि मूळ नक्षत्रांना जोडून थोडे पुढे पूर्वेकडे एक रेषा काढली तर ती ज्या तारकासमूहामधून जाते, तीच पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा नक्षत्र. साधारणत: पूर्वाषाढा नक्षत्रात चार आणि उत्तराषाढा नक्षत्रात चार असे दोन मोठे चौकोन मिळून एक मोठा तारकासमूह तयार होतो. हा मोठा तारकासमूह म्हणजेच धनु रास. धनु रास म्हणजे पुरुष आणि पशू यांची मिश्र आकृती. पुढील तोंड पुरुषाचे आणि मागील शरीर घोड्याचे. या पुरुषाच्या हातामध्ये धनुष्य आहे. एका कल्पनेनुसार या धनुर्धारी पुरुषाने आपल्या बाणाचा नेम त्याच्या पुढील विंचवावर रोखला आहे.
दुसर्या एका कथेनुसार यास ‘वृषभारी’ (बैलांना मारणारा) असेही म्हटले जाते. कारण सर्वसाधारणपणे आकाशात जेव्हा वृषभ रास मावळत असते. त्याच वेळेस धनुरास उगवत असते, हेच त्याचे कारण आहे. खगोलशास्त्रामध्ये धनुराशीच्या विभागास सर्वात समृद्ध भाग असे म्हणतात. सूर्य आणि धनुरास यांना जोडणारी रेषा काढली तर, ती आपल्या आकाशगंगेच्या केंद्रातून जाईल, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
क्रमश:
हेही वाचा – नक्षत्र… मघा, फाल्गुनी, हस्त!
(लेखक निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष)