पूर्वार्ध
ऑफिसमधून कविता बाहेर पडली. आपल्या कायनेटीकवर बसता बसता मनात म्हणाली… या महिन्यात तरी ते ‘चार दिवस’ येऊ नयेत. गेली अठरा वर्षे आपण हेच म्हणतोय… पण ते ‘चार दिवस’ पाठ सोडत नाहीत. आता आपला धीर सुटत चाललंय… किती वर्षे वाट पाहायची?
लग्न होऊन इतकी वर्षे झाली… आता वयाची 41 वर्षे संपली. घरी सासू, नणंद… माहेरी आईबाबा वाट पहातायत… काही बातमी येईल म्हणून! पण महिन्याचे चार दिवस पाठ सोडतं नाहीत. डॉक्टर सल्ला घेऊन झाला… उपाय करून झाले… सासूबाई नवस बोलतात… पण व्यर्थ!
गाडी घरासमोर उभी करून ती घरात आली. वॉशरूममध्ये गेली. पण ती बाहेर आली… निराश झालेली. या महिन्यात सुद्धा… पुण्याच्या डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू होती. सहा महिने झाले, पण उपयोग नाही. आपण कधी आई होऊ याची शक्यता तिला वाटेना… आणि यानंतर मूल झाल्यावर त्याला मोठं कधी करणार? त्याचं शिक्षण, नोकरी, लग्न… तोपर्यंत आपण असू किंवा नसू…
काहीतरी निर्णय घ्यायला हवा… निरंजनशी बोलायला हवे… त्याची आई, ती तर डोळे लावून बसलेली. तिला पण विश्वासात घ्यायला हवे.
रात्री जेवणे झाली. कविता बेडरूममध्ये आली… निरंजन लॅपटॉपवर काम करत होता. त्याच्या बाजूला कविता बसली. एक नजर कविताकडे टाकून तो म्हणाला,
“आज चेहेरा का पडलेला?”
“आज ‘पाळी’ आलीच… मुंबईच्या विरचंदानी डॉक्टरची ट्रीटमेंट सुरू होती सहा महिने… पण उपयोग नाही…”
खांदे उडवून निरंजनने डोके लॅपटॉपमध्ये घातले.
हेही वाचा – …अन् वन्स मोअरने अर्जुनचं भाग्यच पालटलं!
“निरंजन, नुसते खांदे उडवून नाही चालणार… काहीतरी निर्णय घ्यायला हवा. तुझी आई, बहीण, माझे आईबाबा वाट पाहात आहेत… नातवंडाची आणि… आपण त्याना निराश करतोय.”
“मग काय करायचं म्हणतेस? उपाय तर करतोय ना!”
“उपाय झाले… गेली अनेक वर्षे उपाय करतोय… उपयोग नाही. आता पुढे पहायला हवे.”
“काय पुढे पहायला हवे?”
“माझी चाळीशी दोन वर्षांपूर्वी संपली. आणखी पाच वर्षांनी मोनोपॉज येईल. आता मूल होण्याची शक्यता नाही रे…”
“मग?”
“आपण मूल दत्तक घेऊया का? छानसा मुलगा.. आत्ता घेतला तर आपली साठी येईल, तेव्हा तो विशीत असेल! जास्त काळ थांबून नाही चालणार… आपली वये पण वाढतायत ना? ती आपण थांबवू शकत नाही. निर्णय तातडीने घ्यायला हवा.”
“दत्तक! पण आईला ते नाही पटणार.”
“…आणि तुला?”
“मलाही! पण काही इलाजच नसेल तर…”
“इलाज नाही म्हणूनच… एखादं मूल असावं घरात, असे प्रत्येकाला वाटतं. मला पण वाटतं ना… आयुष्य पुढे पुढे जातंय… तू 45 क्रॉस केलंस… अजून वाट पाहात राहिलो, तर काय म्हातारपणी दत्तक घेणार? आईचं पण किती आयुष्य राहिलंय… त्यांना पण पाहूदे ना मूल मोठे होताना…”
“पण दत्तक म्हणजे… कोण कुणाचं, कुणाच्या रक्ताचे असेल कोण जाणे?”
“रक्ताचे कुणाच्या पण असूदे… पण आपले संस्कार महत्त्वाचे…”
“पण आईला कसं सांगणार?”
“सुरुवातीला सांगायचेच नाही… घरी आणल्यावर पाहूदे.”
“बरं…. तुझा हट्टच आहे तर होऊदे तुझ्या मनासारखे…”
“माझा हट्ट असं म्हणू नकोस… आपल्या सर्वांसाठी!”
“बरं… मग कुठे शोधायचं बाळ?”
“पुण्यात एक अनाथाश्रम आहे; खूप मोठा… माझी मैत्रीण सांगत होती, तिथे बरीच मुलं असतात… तिथेच जाऊ.”
“पण मुलगा की मुलगी बघायची?”
“मुलगा! तुमच्या आईला, माझ्या आईला नातूच हवा असणार! म्हणून मुलगा बघू.”
“ठीक. शनिवार, रविवारी जाऊ. आपल्याला दोघांनाही रजा असते.”
“चालेल.”
कविताने आनंदाने उशीवर मान टेकली.
0000
निरंजनने गाडी काढली आणि दोघे पुण्याला पोहोचले. सकाळी दोन अनाथाश्रम पाहिले, पण हवा तसा मुलगा दिसेना. दुपारनंतर एका अनाथाश्रमात एक गोरा मुलगा दिसला. तिथल्या बाईने त्याला दाखवताच, तो गालातल्या गालात हसला… कविताला तो आवडला! तिने त्याला उचलून घेतले आणि निरंजनकडे पाहिले. त्याला पण तो आवडला… त्याला घेऊनच कविता ऑफिसमध्ये आली. तिने तिथल्या मुख्य बाईंना विचारले…
“हा मुलगा आम्हाला द्याल का?”
“देऊ शकते. पण तुम्ही दोन ओळखी आणा… कारण, आम्हाला खात्री वाटायला हवी की, मुलगा योग्य घरी जातोय. नाहीतर मुलांची विक्री करणारे पण असतात…”
दुसऱ्या दिवशी त्यानी निरंजनचा मित्र डॉ. सुमीत आणि त्याची पत्नी डॉ. माया यांना घेऊन गेले… मग व्यवस्थित फॉर्म भरून आणि सुमीत आणि माया यांच्या हमीवरून मुलाला कविताच्या आणि निरंजनच्या ताब्यात दिले.
त्या चार महिन्यांच्या बाळाला घेऊन कविता आणि निरंजन घरी आले. निरंजनाच्या आईला धक्काच होता… तिला हे अजिबात आवडल नव्हतं. ती न बोलता घरात निघून गेली… कविताने बाळाला प्रेमाने घरात घेतलं… ऑफिसमधून सहा महिने रजा घेतली. आपल्या आईला बोलावून घेतलं. तिची आई पण आली… घरातल्या घरात बारसं केलं. नाव ठेवलं – ‘आशू’!
आशू गुणी होता. कोण अभागी आई त्याला सोडून गेली होती कोण जाणे… पण तो कविताला त्रास देत नव्हता. रात्री व्यवस्थित झोपत होता. खातपीत होता. घरात त्याची जाग होती. कविताची नाराज सासू पण त्याला मांडीवर घेत होती… भरवत होती.
निरंजनला कधी घरी जातो आणि आशूला घेतो असे वाटतं होते… त्याला सोडून ऑफिसला जाताना जीवावर येत होते. निरंजनची बहीण पण दर रविवारी भाच्याला बघायला माहेरी येत होती. आशू म्हणजे सर्वांच्या गळ्यातला ताईत झाला होता.
कविताची रजा संपली पण आता तिला काळजी वाटत नव्हती… एक बाई होतीच लक्ष द्यायला… शिवाय सासूबाई पण होत्याच. आपण योग्य वेळी निर्णय घेतला, याचे तिला समाधान होते. निरंजन सुद्धा ‘तुझ्यामुळेच आपण योग्य निर्णय घेतला,’ हे वारंवार तिला सांगत होता.
आशू दोन वर्षांचा झाला. वयाच्या मानाने तो मोठा वाटत होता. सर्व काही छान होते… आणि…
स्वातंत्र्यदिन होता. कविताला ऑफिसमध्ये झेंडावंदनासाठी जायचं होतं. ती सकाळी लवकर उठली आणि बाथरूममध्ये जाताजाता तिला मळमळल्या सारखे झाले… आणि उलटी झाली. तिने तोंड स्वच्छ धुतले, पण तिचे पेटके कमी होईनात. भिंतीला धरून धरून ती बेडपाशी आली… आज आपल्याला अचानक काय झाले तिच्या लक्षात येईना. तिने नवऱ्याला उठविले… पित्त झाले असणारं म्हणून त्याने जेलुसिलची गोळी दिली… पण काही फरक पडेना! तिला काहीतरी चमत्कारीक वाटत होते.
निरंजनने तिला ऑफिसमध्ये सोडले आणि तो बाहेर वाट पाहात गाडीत बसून राहिला… एक तासात ती बाहेर पडली आणि गाडी डॉ. साने यांच्या हॉस्पिटलमध्ये! डॉ. मिसेस साने यांनी तिला तपासले आणि म्हणाल्या,
“कविता, गेली कित्येक वर्षे तू ज्यासाठी आसूसली होतीस, तेच तुझ्या पदरी येतंय… या महिन्यात पाळी होती?”
“नाही बहुतेक. मी मुलगा दत्तक घेतलाय आशू. त्याचे करता करता माझ्या लक्षातच रहात नाहीत या गोष्टी…”
“असं कसं? स्त्रीने या नैसगिक क्रिया लक्षात ठेवायच्या असतात… तू युरिन दे चेकिंगला… पण माझा अंदाज चुकायचा नाही. आशूला भावंड पाठवलंय देवाने…”
“काय? अरे देवा…! या वयात?”
“त्यात काय? जोपर्यत पाळी येत असते… तोपर्यत दिवस राहण्याची शक्यता असतेच… तुझ्याबाबतीत फार उशिरा होतंय हे…”
“पण डॉक्टर, एवढे प्रयत्न झाले, पण यश येत नव्हते… म्हणून मी मुलगा दत्तक घेतला आणि आता हे!”
“दत्तक मुलगा चांगल्या पायगुणाचा म्हणायचा. त्याला पण भावंड हवं का नको? तू बाहेर यरिन सॅम्पल दे. खात्री करूया.”
कविताने लॅबमध्ये जाऊन युरिन सॅम्पल दिले आणि बाहेर बसलेल्या नवऱ्याला डॉक्टरांचे म्हणणे सांगितले.
हेही वाचा – बुवा आणि अर्जुन साठे… गुरू-शिष्याचे अतूट नाते!
“अगं असू दे ना! आपल्याला काय कमी आहे? दोघेही नोकरी करतो… स्वतःचे घर आहे. आईला दोन नातवंडे होतील… खेळवील ती दोन मुलांना.”
0000
कविता आई होणार हे सर्वाना कळले. सासूबाई खूश. गेली कित्येक वर्षे ज्याची त्या वाट पाहात होत्या, तेच होणार होते. कविताला बाळ व्हावे म्हणून त्या किती नवस बोलले होत्या… पूजा केल्या होत्या! निरंजन खूश होता. त्याला आपल्या अंगामासाचे बाळ हवं होते. खूश नव्हती ती कविता! तिला पुढील पेच दिसत होते. तिला आशूची काळजी वाटत होती… अशात मुलगी झाली तर बरे, असे तिला वाटत होते. म्हणजे स्पर्धा होणार नव्हती.
दर महिन्याला व्यवस्थित तपासणी सुरू होती. नऊ महिने झाले आणि कविता प्रसूत झाली… मुलगा झाला!
घर बेहद्द खूश झाले… कविताची सासू अनेक नवस बोलली होती, ते फेडू लागली. निरंजन खूप आनंदी होता. आशू भांबवला होता… हे नवीन बाळ घरात येणार म्हणून खूश पण झाला होता. शेजारीपाजारी ‘हा आशूचा पायगुण बरं…’ असं सांगत होते. कविताची सासू पण आशूची पाठ थोपटत होती. नवीन बाळाचे बारसं हॉलमध्ये नातेवाईकांना, शेजाऱ्यांना बोलावून केलं. मुलाचे नाव ठेवले – ‘अधीर’!


