संगीता भिडे (कमल महाबळ)
माझ्या वयाचा पैलतीर जसजसा जवळ सरकतोय तसतसा अनेक आठवणींचा, प्रसंगांचा पिंगा मनात आणि मस्तकातही का सुरू झाला आहे, कळत नाही. काही आठवणी सुखद, काही दुःखद तर काही विचार करायला लावणाऱ्या… अंथरुणाला पाठ टेकली की, आठवणींचा पिंगा सुरू होतो आणि मग ते व्यक्त केल्याखेरीज चैन पडत नाही.
असाच एक प्रसंग – रोज दाराशी पेपर टाकणाच्या मुलाचा. या घटनेला आता 30-40 वर्षे झाली. पण अजूनही ती विसरता येत नाही.
साधारण 22-23 वर्षांचा हा मुलगा, नित्यनेमाने आमच्या घरी पेपर टाकत असे. हा मुलगा वर्णाने गोरा, दिसायला उमदा आणि हुशार बाटेल असा… ब्राह्मण कुळातला वाटेल असा. मला प्रश्न पडे, हा गरीब कुटुंबातला असावा का? याला आपण काही आर्थिक मदत देऊ शकू का? पण त्याला विचारायचं कसं? हाही मोठा प्रश्न! बरं, याची सवय अशी की थांबायला एक सेकंदाचीही सवड नाही. कधीतरी वाटे, याला चहा-पाणी विचाराचे का? पण स्वारी थांबायला उभी राहील तर ना? संवाद साधायचा प्रयत्न करावा तर, त्याच्याकडून कधीच प्रतिसाद मिळायचा नाही. बिल वसुलीला आला तरी, आम्ही पैसे किती देणार आणि पैसे परत किती करायचे, त्याचा आधीच अंदाज घेऊन बाल्कनीच्या कट्ट्यावर बिल आणि परतीचे पैसे ठेवून स्वारी पसार झालेली असायची. एकूण त्याच्या वर्तनाने हळूहळू माझ्याही मनात त्याच्याविषयी चीड निर्माण होऊ लागली, रागही येऊ लागला.
अखेरीस न राहवून पेपर एजंटला घरी बोलावून घेतले आणि तक्रारीच्या सूरांत त्याच्या वर्तनाची माहिती एजटला दिली… तो असं का वागतो, अशी त्यांच्याकडे पृच्छा केली. त्यांनी दिलेले उत्तर ऐकल्यावर मात्र मला जबरदस्त धक्का बसला आणि मलाच माझ्या विचारांची लाज वाटली.
तो मुलगा M.Sc. प्रथम श्रेणीत पास झाला होता. पण वाचेने तोतरा असल्याने त्याला कुठेही नोकरी मिळत नव्हती. वाचा दोषामुळे हुशार असूनही शिकवण्यासुद्धा घेऊ शकत नव्हता. गरीब कुटुंब असल्याने आपल्या आई-वडिलांवरही आपली आर्थिक जबाबदारी टाकू इच्छित नव्हता. आपल्या तोतरेपणामुळे आपले हसू होईल आणि आपण एक चेष्टेचा विषय बनू या विचाराने आणि भीतीने तो प्रत्येकाशी संवाद टाळत होता.
हे सारे कळल्यावर माझे डोळे पाणावले आणि वाटलं, किती घाईने आपण एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाविषयी निष्कर्ष काढून मोकळे होतो आणि निष्कारण गैरसमज करून घेतो.
अजूनही त्या मुलाची आठवण आली मन हळवं होतं… आता तो कुठे आणि कसा असेल ही चिंता मात्र मन पोखरत राहते.