नमस्कार मी हर्षा गुप्ते. पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलेय.
3 मार्च 2000. रविवार होता. आज त्याला 25 वर्षं झाली.
घरात कामाची लगबग सुरू होती. दुपारची वेळ आमची पाणी भरायची, जेवणाची. त्यात टीव्हीवर क्रिकेटची मॅच सुरू होती. माझी मुलगी लक्ष्मी तीन वर्षांची आणि मुलगा अद्वैत 10 वर्षांचा. त्याच्या मित्राचा वाढदिवस होता. त्याला लवकर आवरून तिथे जायचं होतं… आणि लेकीला कार्टून बघायचं होतं. बाप-लेकीमध्ये भांडण सुरू होतं. बाबाला मॅच बघायची होती आणि हिला कार्टून.
तेव्हा माझं म्हाडाचं घर होतं. छप्पर म्हणून सिमेंटचा पत्रा (asbestos) होता. एसीचे कूलिंग जाणवत नसल्याने आम्ही सिमेंटच्या पत्र्यावर लाल कौलं घातली होती.
माझ्या शेजारी रीकन्स्ट्रक्टचं काम सुरू होतं. मी किचनमधून बाहेर येत होते आणि अचानक (अपघात अचानकच होतात) काही कळायच्या आत बांधकाम सुरू असलेलं शेजारचं घर, म्हणजे घराची भिंत माझ्या घरावर पडली. माझ्या घराचे सिमेंटचे पत्रे आणि कौलं तोडून भिंत माझ्या घरात आली. ‘वेलकम’ करायला मी खालीच उभी होते.
भसाभस विटा, रेती, सिमेंटच्या पत्र्याचे तसेच कौलांचे तुकडे कोसळले… आणि माझं डोकं फुटून रक्त वाहू लागलं… दोन ते अडीच फूट ढिगाऱ्याखाली मी गाडली गेले होते. माझे दोन्ही हात फक्त बाहेर होते. माझ्या नवऱ्याला काहीच सुचलं नाही. त्याने माझे दोन्ही हात धरून मला ढिगाऱ्यातून खेचून बाहेर काढलं. मी दारात येऊन उभी राहिले… पाहिलं तर, सगळी सोसायटी जमा झाली होती. माझ्याच वयाच्या किंवा वयाने थोड्या लहान-मोठ्या शेजारणी मला पाहून, घरची अवस्था पाहून रडत होत्या. एकीने लक्ष्मीला कडेवर घेतलं होतं. बहुदा तिला काही समजलंच नसावं. केवढीशी होती ती… अद्वैत नेमका दोन सोसायटी सोडून राहणाऱ्या माझ्या वडिलांकडे गेला होता.
(ज्या ठिकाणी माझा अपघात झाला, त्याच ठिकाणी लक्ष्मी तिच्या बाबाशी भांडून झोपली होती. अद्वैतने तिला उचलून बेडवर ठेवले आणि तो निघून गेला… अन् दुसऱ्या मिनिटाला हा प्रपात झाला. 25 वर्षं झाली, पण आजही त्या आठवणीनं भीती वाटते. लक्ष्मी तिथेच असती तर? पण माझे स्वामी आहेत. त्यांनी तसे काही घडूच दिलं नाही.)
घाबरलेल्या, रडणाऱ्या माझ्या शेजारणींना मीच कसंबसं शांत केलं. तेवढ्यात एकाने स्वत:ची रिक्षा आणली. मी त्यात जाऊन बसले. शेजारी एकजण बसली आणि आम्ही निघालो… डॉक्टर वारी करत. मी दोन्ही हाताने डोकं घट्ट धरून रक्तस्राव थांबवायचा प्रयत्न करत होते. डॉक्टर काही मिळेनात… अखेर मंगलमूर्ती हॉस्पिटलमध्ये आमची वरात जाऊन धडकली.
मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले… 10 मिनिटांत बातमी चारकोपभर झाली. 150-200 माणसं तिथे जमा झाली होती. नुकत्याच महापालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या. मी शिवसेनेची कट्टर कार्यकर्ती. आमच्या नगरसेविका शुभदा गुडेकर वहिनी डॉक्टरांच्या आधी थेट ऑपरेशन थिएटरमध्ये हजर होत्या.
डॉ. कसबेकर ऑपरेशन थिएटरमध्ये आले. माझं चेकअप झालं. डोक्याचे थोडे केस शेव्ह केले. डोक्याला टाके घातले गेले. एक्सरे, स्कॅनिंग सगळं झालं. 24 तास अंडर-ऑब्झर्व्हेशन ठेवून डिस्चार्ज दिला. घरी जणू जत्राच लागली होती. सतत कोणी ना कोणी तरी मला भेटायला येत होतं.
पुढल्या कितीतरी रात्र मी आणि राजेश झोपू शकत नव्हतो. एकमेकांचा हात धरून झोपायचो. खूप भीती, कसली तरी धास्ती… राजेश हळूहळू सावरला. मी मात्र रात्रीची झोपूच शकत नाही. पहाटेला झोप लागते. 25 वर्षं झाली तरी ही स्थिती आहे. आज तेच घर मी छान बांधून घेतलं. दोन मजली घर. भीती कमी झाली आहे. पण झोपही कमी झाली आहे. बरेचसे मेडिकल इश्यू आहेत. वाढत्या वयामुळे अजून वाढत आहेत. पण माझ्या डॉक्टर जाऊबाईंनी एक सल्ला दिला की, ‘हर्षा तुझे हे सगळे प्रॉब्लेम डोक्यात ठेव, मनात ठेवू नकोस. नाहीतर तू कधीच सावरू शकणार नाहीस.’ मी त्यांचं ऐकलं आणि आज 25 वर्षं झाली, तग धरून आहे. आनंदाने जगतेय. दिवस ढकलत नाही.
हॅट्स ऑफ टू मेडिकल सायन्स! त्याचबरोबर माझे शेजारी, डॉक्टर, चारकोपवासी… मी सगळ्यांची खूप ऋणी आहे.