पराग गोडबोले
आबा आणि आम्ही म्हणजे एक वेगळंच समीकरण. आबा घोळ घालणार आणि मग तो आम्ही निस्तरत बसणार, हा आमचा उंदरा-मांजराचा खेळ अव्याहत सुरू असतो. आबा कधी कुठे काय करतील आणि आम्ही गोत्यात येऊ… याचा नेम नसतो, कधीच. खूप सावध राहावं लागतं आम्हाला, नाहीतर, ‘नजर हटी, दुर्घटना घटी‘ याचा प्रत्यय कधी येईल, हे सांगणं कठीण!
तसं तर अगदी शहाणे असतात ते. नीट विचार करून बोलतात आणि कृती करतात, फार विवेकाने वागतात. सकाळी फिरून येताना रिक्षावाले, सोसायटीचे रखवालदार, गाडी पुसणारे यांच्याशी दोन शब्द बोलल्याशिवाय त्यांचे पाय घराकडे वळतच नाहीत मुळी… प्रत्येकाला आवर्जून फराळाचे जिन्नस दिल्याशिवाय त्यांची दिवाळी साजरी होतच नाही कधी. चार नग जास्त करावे लागतात मला त्यांच्या या सवयीपायी… पण ही जोडलेली माणसं म्हणजेच संपत्ती आहे त्यांची आणि आमची सुद्धा!
मागे एकदा, संध्याकाळच्या वेळी ते रस्ता चुकले होते, अगदी सैरभैर झाले होते नुसते. त्यावेळी एका अशाच जोडलेल्या रिक्षावाल्याने त्यांना सुखरूप घरी आणून सोडलं होतं. सासूबाई गेल्यापासून, एकटेपणाच्या जाणीवेने ते हळवे होतात कधीकधी, पण एकटेपण झटकून परत आमच्या उत्साहात सामील होतात, मनापासून.
हेही वाचा – दूरदर्शन… कृष्ण-धवल आठवणींना उजाळा!
कधीकधी मात्र ते फार विचित्र वागतात, चिडचिड करतात, बडबड करतात आणि घरच्या मंडळींना वात आणतात. ऐकू कमी येतं, त्यामुळे कधी मजेशीर, तर कधी मनस्ताप देणारे प्रसंग घडतात आणि मग आम्ही कधी हसतो, तर कधी डोक्याला हात लावून बसतो.
तशीच एक आठवण… मजेशीर.
आमचे राजस्थानला फिरायला जायचे बेत सुरू होते. आबांना विचारलं, ‘येणार ना तुम्ही आमच्या सोबत?’ तर, एका पायावर तयार ते! का कोणास ठाऊक, पण त्यांचा तोवर विमान प्रवास झाला नव्हता, विविध कारणांमुळे. आबांना एक आगळीवेगळी भेट म्हणून आम्ही मुंबई जयपूर असा विमान प्रवास ठरवला होता. ते सोबत होते, त्यामुळे एका प्रसिद्ध पर्यटन कंपनीतर्फे जायचा आमचा बेत होता. चार पैसे जास्त जातात, पण डोक्याला ताप नसतो.
सगळं नियोजन झाल्यावर आम्ही आबांना सांगितलं आणि अगदी हरखून गेले ते. पहिल्यांदाच विमान प्रवास म्हंटल्यावर जी बालसुलभ उत्सुकता असते, ती जाणवत होती त्यांच्या बोलण्यातून. सगळं ठरलं आणि माशी शिंकली. आमच्या अहोंच्या ऑफिसमध्ये नेमके त्याच सुमारास परदेशी पाहुणे येणार, अशी बातमी आली आणि त्यांनी अंग काढून घेतलं… साळसूदपणे. “तुम्ही तिघे जा आणि फिरून या,” म्हणत आबांची जबाबदारी माझ्या गळ्यात बांधून ते मोकळे झाले. आबा म्हणजे वळलं तर सूत, नाहीतर भूत. त्यांना सांभाळणं म्हणजे येरा-गबाळ्याचं काम नव्हे, पण मी आणि माझ्या लेकाने हे आव्हान स्वीकारलं, अहोंच्या नाकावर टिच्चून!
त्यांना म्हणाले मी, तुम्ही फक्त विमानाची तिकीटं काढून द्या आमची, बाकी सगळं आम्ही बघतो. त्यांना काहीतरी सवलती असतात म्हणे. प्रवास थोडा स्वस्त पडतो इतकंच!
तिकिटं झाली, पर्यटन कंपनीचे पैसे भरून झाले आणि सगळं पक्कं झालं. आबा, मी आणि माझा लेक आता प्रत्यक्ष प्रवासाची वाट पाहायला लागलो. चार दिवस आधी सामानसुमानाची बांधाबांध सुरू झाली आणि आबांची बॅग सगळ्यात आधी भरून तयार. खूप उत्साहात होते आबा!
आमच्या आबांची ना, एक प्रेमळ सवय आहे. कोणीही त्यांना नमस्कार केला की, ते भरभरून आशीर्वाद तर देतातच, पण नमस्कार करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावरून, खांद्यावरून आणि पाठीवरून प्रेमाने हात फिरवतात. तशी निरुपद्रवी सवय, पण अहोंनी त्यांना बजावलं, “विमानात शिरताना दारात उभ्या असलेल्या मुली तुम्हाला नमस्कार करतील. त्यांच्या नमस्काराला नमस्कारानेच उत्तर द्या. उगीच पाठीवर वगैरे हात फिरवायला जाऊ नका, भलतं काहीतरी होऊन बसायचं आणि मग निस्तरणं कठीण जायचं!!”
लेकाकडे मारक्या म्हशीसारखे बघत आबा उत्तरले, “कळतंय तेवढं मला. उगाच काहीतरी सांगू नकोस.” ही जुगलबंदी ऐकून मी खुसूखुसू हसले, आबांचा पारा आणखीनच चढला आणि निघून गेले ते तरातरा, त्यांच्या खोलीत.
लेकाची सामान भरण्याची तयारी जायच्या दिवशी सकाळी आणि आबांची नुसती चिडचिड… जाताना अहो लेकाला बजावून गेले होते, “पॉवर बँक तुझ्या जवळच्या सामानात ठेव. पट्ट्यावरून जाणाऱ्या चेक इन सामानाच्या बॅगेत नको. तसे नियम आहेत.” लेकाने ते ऐकून, पॉवर बँक त्याच्या सॅकमध्ये ठेवली आणि तो आवरायला गेला.
आम्ही निघालो, अगदी वेळेत विमानतळावर पोहोचलो. आमचं सामान पट्ट्यावर टाकलं. ते टाकताना तिथल्या मुलीने लेकाला विचारलं, ‘सामानात पॉवर बँक नाहीये ना?’ लेक अगदी छातीठोकपणे ‘नाहीये’ म्हणाला आणि बोर्डिंग पास घेऊन, आम्ही ‘सुरक्षा जांच’ नावाचा जाच सहन करायला निघालो… तिथे सगळं सामान काढून तपासणी झाली, पण लेकाला पॉवर बँक काही दिसली नाही सामानात. तो म्हणाला सुद्धा मला, ‘घरी राहिली असेल,’ म्हणून आम्ही त्याकडे काणाडोळा केला.
बाकी सर्व व्यवस्थित पार पडलं आणि आम्ही जवळजवळ तासभर आधीच मोकळे होऊन, दिलेल्या द्वार क्रमांकापाशी जाऊन बसलो. मी छानपैकी मेथीचे ठेपले करून आणले होते. ते खायला आम्ही सुरुवात केली आणि तेवढ्यात माझा फोन वाजला. यांचा फोन होता. मला आश्चर्यच वाटलं, चक्क चौकशी करायला फोन? क्या बात!
मी फोन घेतला आणि थेट खेकसणंच सुरू झालं पलीकडून… “काही अक्कल आहे का तुम्हाला? मी बजावून सांगितलं होतं ना की, पॉवर बँक स्वतःजवळ ठेवा म्हणून, मग ती तुमच्या चेक इन सामानात कशी गेली? काय घोळ घालून ठेवता यार तुम्ही! मी काम करू, का हे निस्तरत बसू आता?” नुसत्या फैरी सटासट… “माझ्या ID वरून तिकिटं काढली आहेत, मला फोन येतायत सारखे. कुठे आहेत चिरंजीव? द्या त्यांना फोन,” वगैरे वगैरे वगैरे…
लेकाशी बोलणं झालं आणि लेक धावला सुरक्षा अधिकाऱ्याकडे. तिथे पन्नास प्रश्नांना तोंड देत, त्यांना कसंबसं समजावत, तो वेळेच्या अगदी काही मिनिटं आधी आला धावतपळत, पॉवर बँक घेऊन आणि आम्ही विमानात चढलो. आबांना कळतच नव्हतं, काय चाललंय नक्की ते! तो येईपर्यंत माझा जीव मात्र टांगणीला. घरी असते, तर नक्कीच देव पाण्यात घालून बसले असते.
लेक जाम हैराण. पॉवर बँक तिकडे गेलीच कशी, हा प्रश्न त्याला सतावत होता, पण उत्तर सापडत नव्हतं. मांडीवर पॉवर बँक ठेवून, मान मागे टाकून त्याने डोळे मिटले आणि तेवढ्यात आबांनी विचारलं, “हे काय आहे आणि तुझ्याकडे कसं आलं?”
“मी तुझ्या सॅकमधून काढून बॅगेत टाकलं होतं, निघताना! मला वाटलं महाग वस्तू असेल, उगाच का वागवत बसा सोबत. हरवली, गहाळ झाली, तर ताप नको…”
हेही वाचा – पुस्तकांमध्ये रमलेला माणूस
हे ऐकलं मात्र, आम्हा दोघांनाही हसावं का रडावं कळेना. त्यांना ओरडावसं खूप वाटत होतं, पण त्यांचा निष्पाप आणि निरागस चेहरा बघून, सगळा राग मुकाट्याने गिळला आम्ही. एवढं सगळं रामायण झालं आणि ते आपल्यामुळे झालं, याचा यत्किंचितही लवलेश त्यांच्या मुखावर नव्हता… मी लेकाचा हात दाबून त्याला शांत केलं आणि मग त्याने आबांना कोपरापासून नमस्कार करत, बुचं कानात घालून विषय संपवला.
नंतर मात्र एक केलं मी. ते मार्गिकेच्या बाजूला बसले होते, त्यांना उठवून, खिडकीची लालूच दाखवून, जागांची अदलाबदल केली आणि निश्चिन्त झाले… न जाणो, एखाद्या लाल कपड्यांमधल्या, त्यांच्या नाती एवढ्या वयाच्या मुलीने त्यांना नमस्कार करावा आणि परत नको ते रामायण घडावं…!
एकदा तोंड पोळल्यावर, काळजी घेणं हाच पर्याय होता माझ्याकडे, नाही का?
आबांचा हा पहिलावहिला प्रवास त्यांच्या नसेल, पण आम्हा सगळ्यांच्या मात्र आयुष्यभर लक्षात राहिला… अनुभवांची पॉवर बँक चार्ज करत…
मोबाइल – 9323277620


